रोगाचा परिपाक काल (जंतू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसून येईपर्यंतचा काळ) २ ते १२ दिवसांचा असतो. रोगाची सुरुवात एकाएकीच डोकेदुखी सर्वांगदुखी, मळमळणे व उलट्या शक्तिपात व ज्वर या लक्षणांनी होते. ज्वर ४०० से .पर्यंत वाढतो व नंतर टिकून राहतो. त्वक्रक्तिमा (त्वचेची लाली), डोळे लालभडक होणे, नासा-रक्तस्रवण (नाकातून रक्त वाहू लागणे किंवा घोळणा फुटणे), त्वचेवर रंजिकामय (रंग बदललेल्या व पृष्ठभागाच्या वर न उचलल्या गेलेल्या ठिपक्यांनी युक्त) पुरळ उमटणे इ. लक्षणे दिसू लागतात. पुष्कळ वेळा या रंजिका रक्तस्रावी असतात. यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) तसेच कावीळ होते. सर्वसाधारणपणे वरील लक्षणांचा जोर एक आठवडा टिकतो आणि त्यानंतर ज्वरासहित सर्व लक्षणे एकदमच नाहीशी होतात. काही दिवस ते तीन आठवड्यांपर्यंत रोग्यास बरे वाटून ज्वररहित काळानंतर सर्व लक्षणे पुन्हा उद्भशवतात. यावरूनच या रोगास ‘पुनरावर्ती ज्वर’ असे नाव दिले गेले आहे. दुसर्याह वेळी पहिल्यापेक्षा लक्षणांचा जोर कमी असतो. कधीकधी अशी दहा आवर्तनेही होतात व नंतर रोगी बरा होतो. सर्वसाधारणपणे आवर्तनांचे प्रमाण फक्त दोनच असते. एकदा रोग होऊन गेलेल्या रोग्यामध्ये प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) उत्पन्न होते; परंतु ती एक वर्षभरच टिकते. यामुळे हा रोग नेहमी आढळणार्या प्रदेशात रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दर दोन किंवा तीन वर्षांनी संभवते.
निदानाकरिता ज्वरावस्थेतील रक्ततपासणीच उपयुक्त असते कारण फक्त याच अवस्थेत सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. हे सूक्ष्मजंतू
सर्वसाधारणपणे १५ मायक्रॉन (१ मायक्रॉन =१० -६ मी.) लांब व ०.३ ते ०.५ मायक्रॉन जाड असून प्रत्येकास ६ ते ८ नागमोड असतात.
उपचाराकरिता रोग्यास रुग्णालयात ठेवावे लागते. उवांच्या नाशाकरिता डी डी टी (क्लोरोफिनोथेन) व सर्वांग स्वच्छ धुणे हे उपाय उपयुक्त असतात. लक्षणानुरूप इलाजाशिवाय टेट्रासायक्लीन व क्लोरँफिनिकॉल ही प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे गुणकारी ठरली आहेत. इथिओपियात पहिल्या दिवशी ५०० मिग्रॅ. टेट्रासायक्लीन नीलेतून अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. व दुसर्या दिवशी तेवढीच मात्रा त्याच पद्धतीने देतात. मूळ रोगावर आणि आवर्तन प्रतिबंधक म्हणून ही पद्धत उपयुक्त ठरली आहे. मात्र प्रतिजैव औषधांच्या वापरानंतर ए. यारिश व के. हर्क्सहायमर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखली जाणारी गंभीर प्रतिक्रिया (मूळ रोगाची सर्व लक्षणे अधिक बळावणे) उद्भमवण्याचा धोका लक्षात घ्यावा लागतो.
तीन ते सहा दिवसांच्या परिपाक कालानंतर ऊ-वाहित प्रकारासारखीच रोगलक्षणे उद्भसवतात. रक्तातील एकूण सूक्ष्मजंतूंचे प्रमाण पहिल्या प्रकारापेक्षा बरेच कमी असते आणि ते फक्त ज्वरावस्थेतील रक्ततपासणीतच दिसतात. आवर्तन संख्या अधिक (३ ते ६)असते; परंतु मृत्यूसंख्या पुष्कळच कमी (२ ते ५%)असते. औषधोपचार पहिल्या प्रकारासारखेच असतात.
संदर्भः 1.Davidson, S, Macleod, j Ed. Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.
2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, Tokyo, 1961.
रानडे, म. आ.; भालेराव,य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
डोळे येणे (कंजक्टीव्हायटीस) या स्थितीमधे डोळ्याचा ...
मुलांमध्ये व मोठयांमध्ये झटके येण्याची कारणे बहुधा...
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...
'चक्कर येणे' म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या...