सध्या भारतात जागोजागी स्वाईन फ्लू ची साथ आहे, अनेक मृत्यू (५८५) झाले आहेत. दर २-३ वर्षांनी स्वाईन फ्लूची साथ जोर पकडते. अनेक साथी थोड्याफार चक्राकार गतीने चालतात याची संसर्गशास्त्रीय कारणे आहेत. (डेंग्यू वगैरे आजारही २-३ वर्षांच्या चक्रात चालतात.) स्वाईन फ्लू बद्दल काही मुलभूत माहिती परत द्यायला हरकत नाही. हा एक विषाणू संसर्ग असून सर्दी, ताप व क्वचित जीवाला धोका असे याचे स्वरूप आहे.
हा मूलत: डुकरांपासून आला असला तरी माणसांमधे संसर्गाने पसरतो. श्वाकसोच्छवास, निकट संपर्क, वापरलेल्या वस्तू हा फ्लू पसरण्याचा मुख्य मार्ग आहे. फ्लू चे अनेक प्रकार व जाती-उपजाती आहेत. सध्याच्या स्वाईन फ्लू ची मारकता इतर फ्लू च्या तुलनेत किंचित जास्त आहे हे खरे. परंतु एवढ्या मोठ्या देशात बहुसंख्य लोक फ्लू च्या निरनिराळ्या विषाणूंना प्रतिकारशक्ती बाळगून असतात, त्यामुळे एका रुग्णाचा विषाणू दुसर्याफकडे गेला तरी त्याला तो आजार होईल ही शक्यता हजारात एखादीच असेल. त्यातही लहान मुले (त्यांची प्रतिकार शक्ती विकसित व्हायची असते) कमजोर प्रतिकार शक्तीच्या तसेच वृद्ध व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता थोडी जास्त असते. हवामानाचा स्वाईन फ्लू च्या साथीशी निकटचा संबंध आहे.
थंडी आणि पाऊस या काळात हे विषाणू अधिक काळ जिवंत राहतात म्हणून संसर्ग वाढतो. परंतु उन्हाळ्यात विषाणू प्रसार लक्षणीय रित्या कमी होतो, म्हणूनच आता वाढत्या उष्णतेत स्वाईन फ्लू ची साथ वाढली तर ते एक आश्चनर्य असेल. मुंबईच्या लोकलच्या गर्दीमुळे हा आजार मुंबईभर पसरायला पाहिजे, पण तो पसरला नाही हे सिद्ध झालेले आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी हजारात एखाद्याला प्रत्यक्ष सर्दीताप होतो, अशा हजारांपैकी एखाद्यालाच न्युमोनिया व मेंदू संसर्गाचा धोका होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर आपल्याला घाबरून जायचे काहीच कारण नाही, एकतर उन्हाळा त्याला थांबवेल आणि उरलेले काम प्रतिकार शक्ती करेल. थोडे काम आपले उरते ते म्हणजे पुढीलप्रमाणे -
सर्दीताप आहे त्या रुग्णांशी आठवडाभर संपर्क टाळावा. रुग्णांनी निदान शिंकताना, खोकताना हातरुमाल तोंडाशी धरावा व घरी राहून पॅरासिटामॉल या तापशामक औषधाचा उपचार घ्यावा. आयुर्वेदिक व होमिओपथिक उपचार पण उपलब्ध आहेत. यापैकी ज्यांना तीव्र लक्षणे दिसतात त्यांनी डॉक्टरकडे जाव, व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील उपचार घ्यावेत. यापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यासाठी स्वतंत्र कक्ष असतो. टॅमिफ्लू हे औषध खपवण्यासाठी काही परदेशी कंपन्यांनी कट रचून स्वाईन फ्लू चा बागुलबुवा तीन वर्षांपूर्वी भारतात पसरवला आणि स्वत:ची चांदी करून घेतली.
टॅमिफ्लू या औषधाचे दुष्परिणामही आहेत त्यामुळे ते फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. स्वाईन फ्लू च्या तपासण्या डॉक्टर सांगतील तेव्हाच व त्यांनीच करायच्या आहेत. त्यात घशाचा स्वॅब (नमुना) घेऊन विषाणू चाचणीसाठी पाठवावा लागतो. याचा अहवाल २-३ दिवसांनी मिळतो. याऐवजी रक्ताची अँटीबॉडी तपासणी लवकर होते पण ती थोडी खर्चिक आणि कमी भरवशाची असते. पण उगाचच हजारो रुपये अशा तपासणीसाठी घालवण्याची गरज नाही. त्या त्या शहरात उपलब्ध सरकारी/मनपा व्यवस्थेने हे काम करायचे असते, कारण साथ नियंत्रण हे मूलत: सार्वजनिक आरोग्यसेवेचे काम आहे.
रुग्णांची ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. ए म्हणजे साधा सर्दी ताप. बी म्हणजे जास्त ताप आणि घसादुखी. ब वर्गात स्वॅब तपासणीची गरज नाही पण टॅमिफ्लू लागू शकेल. सी वर्गात अ आणि ब पेक्षा अधिक लक्षणे - दम लागणे, छातीत दुखणे, गुंगी, झटके, रक्तदाब कमी होणे, थुंकीत रक्त, नखांवर निळसर झाक वगैरे. यात स्वॅब तपासणी लागते, शिवाय रुग्णालयात दाखल करावे लागते.
स्वाईन फ्लू साठी लस देऊन उपयोग नाही, त्याची गरजही नाही, कारण नव्या विषाणू प्रजातीची लस तयार करेपर्यंत ती साथ जाऊन नव्या प्रजाती येतात, त्यांना जुनी लस चालत नाही.
एकूणच साथींमध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची असते तशीच कौटुंबिक व सामाजिक पातळीवर प्रत्येक साथीसाठी वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. (उदा. स्वाईन फ्लू साठी श्वरसन संपर्क कमी करणे, डेंग्यूसाठी ईडस डासांचे उत्पत्तीस्थान नष्ट करणे, हिवतापासाठी ऍनाफिलीसची वस्तीस्थाने घटवणे वगैरे.) ईबोला आजार भारतात एखाद-दुसरी केस सोडता आलेला नाही पण त्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केवळ विमानतळांवर किंवा बंदरांवर करावी लागते. सार्वजनिक स्वच्छता ही सर्व सांसर्गिक आजारांसाठी कमीअधिक महत्त्वाची असतेच.
लशींचा उपयोग काही साथींमध्ये होतो तर काहींमध्ये नाही. व्यक्तिगत प्रतिकारशक्ती ही बहुतांशी प्रथिन पोषणामुळे आणि जीवनसत्वादि घटकांमुळे शाबूत राहते. लोकांनी सर्व जबाबदारी सरकार किंवा मनपावर टाकून दिली तर कोणत्याही साथीचे नियंत्रण होणार नाही. बहुतेक प्रगत देशांमध्ये साथ नियंत्रणात सामाजिक व व्यक्तिगत सहभाग कळीचा असतो, सरकार केवळ पूरक भूमिका करते. विशेषत: जिथे सामूहिक युक्त्यांचा वापर करावा लागतो तिथे सरकारी उपायांचा आणि कायदेकानूंचा उपयोग होईल. विसावे शतक संपताना एडस् आजाराची प्रचंड भीती पसरली होती, रुग्णालये या आजारानेच भरून जातील असा बागुलबुवा निर्माण केला गेला होता.
हल्लीच्या जगात साथी पसरण्याला देखील मुलभूत मर्यादा असतात. शास्त्रज्ञांनी एडस्वर तोपर्यंत काही उपायही शोधले. एडस्चे प्रमाण आज शेकडा एक पेक्षाही कमी प्रमाणात आहे. आफ्रिकेतली एडस् साथीची कारणे वेगळी होती, भारतात वेगळ्या सामाजिक परिस्थितीमुळे एडस् फार पसरला नाही. सुशिक्षित समाजाने आजारांच्या साथींबद्दल समतोल व सावधगिरीची भूमिका घेणे हेच चांगले.
लेखक - डॉ. शाम अष्टेकर
स्त्रोत: आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/29/2020
वर्षभर येणा-या रुग्णांच्या नोंदी करीत गेल्यावर वर्...
हा आजार विषाणूंमुळे होतो. बर्ड फ्लू चे नाव आपण ऐकल...
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. ...
बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच...