गिलायूच्याभोवती (टॉन्सिलच्याभोवती) झालेल्या विद्रधीला (पूयुक्त फोडाला) गळसुटे असे म्हणतात. गिलायु–गुहिकांतील (गिलायुतील खोलगट भागांतील) जंतुसंसर्गाने गिलायूच्या बाहेरच्या तंतुमय आवरणाचा भेद होऊन गिलायूभोवतीच्या अवकाशी ऊतकांत (एकमेकांत गुंतलेल्या तंतूंच्या संयोजी ऊतकांत, ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) पू तयार होतो व त्याला वाट न मिळाल्यामुळे गिलायु–अधिगुहेत (गिलायूच्या वरच्या भागातील खाचेत) असा विद्रधी होतो.
गिलायुशोथ (गिलायूची दाहयुक्त सूज, टॉन्सिलीटीज) वारंवार झाला, तर गिलायु-गुहिकांची तोंडे आकसल्यामुळे आतील पू गिलायूभोवती जमतो. तीव्र गिलायुशोथासाठी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे योग्य काळापर्यंत न घेतल्यास जंतुसंसर्गाच्या बीमोड न झाल्यामुळेही गळसुटे होऊ सकते.
या विकारात घसा सुजल्वयामुळे गिलणे अशक्य होतो. कोन, मान व घशात तीव्र ठणका मारणे, थंडी भरून ताप येणे, मानेतील गाठी सुजून मान सुजणे, तोंड उघडणे अशक्य होणे वगैरे लक्षणे दिसतात.
मृदुतालू फुगून लाल झालेली असून पडजिभेला शोफ (द्रवयुक्त सूज) येऊन ती जाड होऊन गिलायूला चिकटल्यासारखी दिसते.
प्रतिजैव औषधे दोन-तीन दिवस देऊन विद्रधी तयार झाल्याबरोबर विशिष्ट पद्धतीने तो फोडावा लागतो. त्याचा पूर्ण निचरा झाला म्हणजे रोग बरा होतो. एक-दीड महिन्यानंतर गिलायू काढून टाकणे इष्ट ठरते.
लेखक : वेणीमाधवशास्त्री जोशी / वा. रा. ढमढेरे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/17/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...