অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुपोषण ( Malnutrition )

कुपोषण ( Malnutrition )

योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक प्रमाणात मिळणे, शरीराची अन्न-शोषणाची क्षमता कमी होणे किंवा शरीरातून अन्न-घटकांची मोठ्या प्रमाणात क्षती होणे या संदर्भात वापरली जाते.

क्वाशिओरकोर रोग (प्राथिनन्यूनताजन्य रोग )  हे याचे एक उदाहरण म्हणता येईल. शरीराला १,२०० कॅलरीपेक्षा कमी ऊर्जा सातत्याने मिळाल्यास कुपोषण उद्‍भवते. या स्थितीत शरीराला ऊर्जेशिवाय पोषकद्रव्येही कमी मिळतात. अतिपोषण हासुद्धा कुपोषणाचा एक प्रकार आहे. अति-पोषणापासून स्थूलता (ओबेसिटी) उद्‍भवते. स्थूलतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात असे विकार होण्याची संभाव्यता वाढते. जगात, विशेषत: विकसित देशांत, स्थूलतेचे प्रमाण वाढते आहे. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इ. स. २,००० मध्ये ६५% प्रौढ आणि १६ % मुले स्थूल असल्याचे आढळले आहे.

सामान्यपणे ६० किग्रॅ. वजनाच्या प्रौढास साधारण श्रमाचे काम करण्यासाठी २,५०० ते ३,००० कॅ. आणि अतिश्रमाचे काम करणार्‍यासाठी ३,६०० ते ४,००० कॅ. ऊर्जेचा आहार लागतो. वयात येताना ३,००० कॅ. व गरोदरपणी २,८०० ते ३,२०० कॅ. ऊर्जेचा आहार लागतो. प्रथिने, कर्बोदके व मेदयुक्त हे अन्नाचे मुख्य घटक आहेत. १ ग्रॅ. प्रथिनापासून ४ कॅ., १ ग्रॅ., कर्बोदकापासून ४ कॅ. आणि १ ग्रॅ. मेदापासून ९ कॅ. ऊर्जा मिळते. प्रतिदिवशी प्रथिने ३० ते ५० ग्रॅ., मेदयुक्त पदार्थ ३० ते ७० ग्रॅ. व कर्बोदके ४०० ते ४५० ग्रॅ. आहारात असावी लागतात.

प्रथिने आणि कॅलरी या दोन्हींची कमतरता झाल्यास प्रथिने-ऊर्जा कुपोषण उद्‍भवते. आहारातील कॅलरी कुपोषणाची अवस्था मुडदूस, तर प्रथिन कुपोषणाची अवस्था क्वाशिओरकोर म्हणून ओळखली जाते. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळेही कुपोषण होते आणि त्यातून बेरीबेरी, स्कर्व्ही व वल्कचर्म (पेलाग्रा) असे आजार संभवतात. कुपोषणाच्या परिणामी मेदपेशीतील मेदाम्ले व स्नायूतील प्रथिने शरीराला (विशेषत: मेंदूला) लागणार्‍या ऊर्जेसाठी वापरली जातात.

त्यामुळे जडणघडणीसाठी प्रथिने उपलब्ध होत नाहीत व वजन कमी होते. कुपोषणाच्या स्थितीत ४० % प्रथिने व २५ % मेदांचे ज्वलन होते. परिणामी स्नायूंचा आकार कमी होतो. कालांतराने हृदयाचा आकारही कमी होतो. प्रथिने कमी झाल्यामुळे अंगावर सूज येते व थकवा वाटू लागतो. मेदयुक्त पदार्थ कमी झाल्यामुळे ओमेगा-३, आणि कोलीन हे मेंदूला आवश्यक असणारे घटक कमी होतात. लोह किंवा तांबे अशा खनिजाच्या कमतरतेमुळे पांडुरोग (अ‍ॅनिमिया) होऊ शकतो.

कुपोषणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्यामुळे खाण्याचे योग्य पदार्थ घेणे परवडत नाही. विशेषत: प्रथिने कमी पडतात. कमी खाणे, जास्त काम या चक्रात सापडून हळूहळू कुपोषणाचे दृश्य परिणाम दिसू लागतात. पौगंडावस्थेत (वाढत्या वयात) मुलांना ऊर्जा जास्त लागते. अशा वेळी पुरेसे अन्न न मिळाल्यास कुपोषणास सुरुवात होते. तसेच या वयात संसर्गजन्य रोग व पोटाचे विकार जास्त होतात. त्यामुळे अन्नाचे पचन व शोषण नीट होत नाही. परिणामी कुपोषण होते. सामाजिक आणि आर्थिक स्थितीशिवाय अवर्षण व अतिवर्षण अशा पर्यावरणीय आपत्तींमुळे समाजात कुपोषणाचे प्रमाण वाढते, युद्ध, रोगराई व समतोल आहाराविषयीचे अज्ञान हीदेखील कुपोषणाची कारणे आहेत.

कुपोषण ही जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार इ.स. २००६ मध्ये जगात दर बारा व्यक्तींमागे एक व्यक्ती कुपोषित होती. साडे-तीन कोटीपेक्षा जास्त मृत्यू कुपोषणामुळे किंवा त्यामुळे उद्‍भवणार्‍या रोगांमुळे होत होते. संयुक्त राष्ट्रांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार इ.स. २००१ मध्ये जगात सर्वाधिक कुपोषित व्यक्ती (२१ कोटी) भारतात होत्या.

कुपोषित व्यक्तीला सामान्यपणे प्रथिनयुक्त आहार दिला जातो. तिळात प्रथिने व मेद (विशेषत: ओमेगा-३) असते. अंडी, मासे, मटण, कोंबडीचे मांस यांतून प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो. डाळी, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, बाजरी यांपासून लोह व कॅल्शियम मिळतात. खनिज-क्षारांसाठी, तसेच फॉलिक आम्ल आणि अन्य जीवनसत्त्वांसाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा लागतो.


लेखक - शशिकांत प्रधान

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate