অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कावीळ


(कामला). रक्तात पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण (पित्ताला ज्या द्रव्यामुळे रंग येतो त्याचे प्रमाण) वाढल्यामुळे त्वचा,डोळयाच्या बुबळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी ते साठून राहते व त्यामुळे त्या ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ किंवा कामला असे म्हणतात. कावीळ हे एक लक्षण असून अनेक कारणांनी होऊ शकते.

काविळीसंबंधी निश्चित कल्पना येण्यासाठी पित्तरंजकद्रव्याची उत्पत्ती, स्थिती व विसर्जन यांची माहिती असणे आवश्यक आहे. रक्तातील तांबडया कोशिकांचे (पेशींचे) आयुर्मान (सु.१२० तास) संपल्यानंतर त्यांचा नाश होऊन त्यांच्यामध्ये असलेली रंजकद्रव्ये मोकळी होऊन रक्तमार्गात त्यांचे परिवहन होत असते. ह्या द्रव्याचे विभंजन मुख्यतः अस्थी व यकृतातील जालिका-अंतःस्तरी तंत्रातील (अस्तरातील आणि जाळीदार विशिष्टीभूत कोशिकांच्या समूहातील) कोशिका करतात व त्यांचे स्वरुप `पित्तरंजकद्रव्य'असे होते. हे पित्तरंजकद्रव्य मग रक्तमार्गेच यकृतातील कोशिकांमधून पित्तवाहिनीच्या व्दारे आतडयात जाते व तेथील जंतुक्रियेमुळे त्यातील काही भागाचे स्वरुप मूत्रपित्तरंजकजन (एक रंगहीन द्रव्य) असे होते व त्या स्वरुपात ते मूत्रावाटे बाहेर पडते. काही शोषिले जाऊन पुन्हा आतडयात जाते व त्याचा काही भाग रक्तातून मूत्रामार्गे बाहेर पडतो.

पित्तरंजकद्रव्य यकृतकोषिकांमधून जात असताना ते ग्लायक्युरॉनिक अम्लाशी संबंद्ध होऊन ते जास्त विद्राव्य होते. या पित्तरंजकद्रव्याचे रक्तातील प्रमाण जास्त झाल्यास या विद्राव्य स्थितीमुहे ते मुत्रमार्गे त्वरित बाहेर पडू शकते व त्यामुळे मूत्रासही पिवळा रंग येतो. उलट यकृतकोशिकांतून न गेलेले पित्तरंजक द्रव्य तितके विद्राव्य नसल्यामुळे मूत्रमार्गे बाहेर पडू शकत नाही,म्हणून या असंयोगित पित्तरंजकद्रव्यामुळे होणाऱ्या काविळीत मूत्राचा रंग लालसर पिवळा होत नाही. या स्थितीला `रंजकाभावी'कावीळ असे म्हणतात.

वर वर्णन केलेल्या पित्तरंजकद्रव्याच्या प्रकारावरुन कावीळ मुख्यतः दोन प्रकारांची असते हे लक्षात येईल. एक प्रकार पित्तरंजकद्रव्य यकृतकोशिकांमधून गेल्यानंतर दिसतो, तर दुसरा प्रकार ते पित्तरंजकद्रव्य यकृतकोशिकांमधून जाणपूर्वीच रक्तात पित्तरंजकद्रव्याचा प्रसार झाल्यामुळे होतो. दोन्ही तऱ्हेचे पित्तरंजकद्रव्य रक्तात असल्यास तिसऱ्या प्रकारची कावीळ दिसून येते. हे प्रकार खालीलप्रमाणे दर्शविता येतात (या प्रकारांसंबंधी अधिक माहिती पुढे दिली आहे).

(१) रक्तविलयजन्य कावीळ यकृतजन्य

(२) विषजन्य किंवा जंतुजन्य कावीळ रक्तजन्य.

(३) रोधजन्य कावीळ

ग्लायक्युरॉनिक अम्लाशी संबद्ध झालेले पित्तरंजकद्रव्य आणि असा संयोग न झालेले पित्तरंजकद्रव्य ओळखण्यासाठी व्हॅन डेन बर्ग प्रक्रियेचा उपयोग करतात. या प्रक्रियेमध्ये डाय-अ‍ॅझो विक्रियाकारक द्रव्य रक्तरसात (रक्तातील पिवळसर, न गोठणाऱ्या व कोशिकारहित द्रव भागात) मिसळल्याबरोबर जर ताबडतोब लाल रंग उत्पन्न झाला, तर ते पित्तरंजक द्रव्य संयोग झालेले आहे, असे समजावे आणि त्या प्रक्रियेला तत्काळ (किंवा प्रत्यक्ष) प्रक्रिया समजावी. रक्तरसात अल्कोहॉल (सुषव) मिसळल्यानंतर डाय-अ‍ॅझो विक्रियाकारक द्रव्य मिसळल्यास जर लाल रंग दिसू लागला, तर ते पित्तरंजकद्रव्य संयोग न झालेले असे समजावे आणि त्या प्रक्रियेला सुषवोत्तरी (किंवा अप्रत्यक्ष) प्रक्रिया समजावी. काही वेळा लाल रंग १० मिनिटानंतर दिसू लागतो त्यावेळी त्या प्रक्रियेला विलंबित प्रक्रिया म्हणतात व लगेच लाल रंग दिसून तो हळूहळू जास्त भडक होऊ लागला, तरी त्या प्रक्रियेला उभयास्थित प्रक्रिया असे म्हणतात.

प्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) रक्तरसातील पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण दर शेकडा ०.५ ते १.२ मिग्रॅ. इतके असते; ते दर शेकडा २ ते ३ मिग्रॅ. इतके वाढले असता तत्काळ प्रक्रिया व ३ ते ४ मिग्रॅ. इतके वाढले तर सुषवोत्तरी प्रक्रिया दिसू लागते.

कारणे

कावीळ उत्पन्न होण्याची मुख्यतः तीन कारणे आहेत.

(१) रक्तनाश जास्त झाल्यामुळे रक्तरंजकद्रव्यापासून जास्त पित्तरंजकद्रव्य उत्पन्न होणे,

(२) यकृतकोशिकांमध्ये विकृती उत्पन्न होणे व

(३) पित्तरसप्रवाहास रोध उत्पन्न होणे.

(१) रक्तनाशक पांडुरोगात (अ‍ॅनिमियात) रक्तातील रक्तकोशिकांचा फार मोठा प्रमाणात नाश होतो व त्या कोशिकांतील तांबडे रंजकद्रव्य रक्तात जासत प्रमाणात परिवाहित होत असते आणि जालिका-अंतःस्तरी तंत्रातील कोशिकांमुळे त्याचे स्वरुप पित्तरंजकद्रव्यात होते. पण यकृतामधून इतके जास्त पित्तरंजकद्रव्य पुढे जाऊ न शकल्यामुळे ते रक्तात जास्त प्रमाणात साठते व त्यामुळे कावीळ होते. शरीरात फार मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यासही याच तऱ्हेची कावीळ दिसून येते. उदा., अंडवाहिनीमध्ये गर्भधारणा होऊन काही काळाने त्या वाहिनीचा भेद झाल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, सर्पदंश, पर्युदरात (उदरातील इंद्रियांवरील आवरणात) झालेला रक्तस्त्राव वगैरे.

(२) यकृतकोशिकांवर विषांची अथवा जंतुविषांची क्रिया झाल्यामुळे त्या कोशिकांची कार्यक्षमता कमी होऊन हा प्रकार संभवतो. उदा.,विषाणू (व्हायरस) व जंतुसंसर्ग, फॉस्फरससारख्या रसायनांची यकृतावरील क्रिया, मद्य

(३) यकृतातून पित्त बाहेर पडल्यानंतर त्याच्या प्रवाहास रोध उत्पन्न झाला तर हा प्रकार दिसतो. पित्ताश्मरी (पित्ताचा बनलेला खडा), पित्ताशयाच्या किंवा त्याच्या जवळपासच्या कर्करोगात त्या रोगग्रस्त भागाचा दाब पित्तवाहिनीवर पडल्यामुळे पित्त आतडयात उतरु शकत नाही. त्यावेळी हा प्रकार दिसतो.

लहान अर्भकात कधीकधी जन्मल्यानंतर दुसऱ्या ते पाचव्या दिवसांमध्ये सौम्य प्रकाराची कावीळ आढळते. अशी कावीळ बहुधा एका आठवडयात नाहीशी होते. ती कोणत्याही रोगाचे लक्षण नसून केवळ पित्तरंजकद्रव्याचे संयुग्मन करणारी (दोन किंवा अधिक व्दिबंध असणारे व प्रत्येक दोन व्दिबंध एकबंधाने वेगळे करणारे संयुग तयार करणारी) एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) कार्यान्वित होण्यास विलंब लागल्यामुळे उद्‌भवते. अकाली जन्मलेल्या मुलांमध्ये या प्रकारच्या काविळीचे प्रमाण जास्त असते. मातेचे रक्त व अर्भकाचे रक्त निरनिराळया ऱ्हीसस प्रकारचे [ →ऱ्हीसस घटक] असल्यास अर्भकीय रक्तकोशिकाजनकाधिक्य (ज्यांच्यापासून तांबडया कोशिका तयार होतात अशा अर्भकीय कोशिकांची बेसुमार वाढ होणे),एरिथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस हा तीव्र रोग होतो. या रोगाचे कावीळ हे एक प्रमुख लक्षण असते. या रोगास प्रमाणापेक्षा जास्त तयार होणाऱ्या पित्तरंजकद्रव्याचे उत्सर्जन करण्यास अर्भकाचे यकृत असमर्थ असते. जन्मल्यानंतर चोवीस तासांच्या आत उद्भवणारी कावीळ हे या रोगाचे लक्षण समजून वैद्यकीय सल्ला ताबडतोब घेणे जरुर असते.

लक्षणे

सर्वसाधारण लक्षणे म्हणजे त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अरुची (अन्नाचा तिटकारा), क्वचित उलटया होणे ही होत. संसर्गजन्य काविळीत सुरुवातीस ज्वर, मूत्र गडद पिवळे किंवा लाल होणे, रोधजन्य काविळीत मलाचा रंग मातीसारखा असणे,त्वचेस खाज सुटणे, फार तीव्र प्रकारात त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाडी अतिशय मंद गतीने चालणे ही लक्षणे आढळतात. अतितीव्र काविळीत पित्तरंजकद्रव्याबरोबरच इतर विषारी पदार्थ रक्तात साठल्यामुळे बेशुध्दी व केव्हाकेव्हा मृत्यूही संभवतो.

उपचार

मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे केले असता कावीळ आपोआप कमी होत जाते. कर्करोगासारख्या असाध्य रोगात उपचार लक्षणानुसारच करावा लागतो. रोग्याला स्वस्थ निजवून ठेवणे व वसा (स्निग्ध पदार्थ) नसलेला आहार देणे ही पथ्ये आवश्यक आहेत. प्रतिजैव (अ‍ॅटिबायॉटिक) औषधे व कॉर्टिसोन, के जवनसत्व वगैरे औषधांचा उपयोग होतो. बेशुध्दी असल्यास द्राक्षशर्करा विद्राव (ग्लुकोज सलाइन) नीलेतून देतात.

आयुर्वेदीय चिकित्सा : पहा आतुर चिकित्सा.

भालेराव, य.ष्यं.

पशूंतील कावीळ

मानवाप्रमाणे पशूंच्या कित्येक रोगांमध्ये कावीळ झाल्याचे दिसून येते. सामान्यतः रक्तविलयजन्य, जंतुजन्य व रोधजन्य असे तीन प्रकार पशूंमध्येही आढळतात. रक्तविलयजन्य काविळीचा प्रकार पांडुरोग, प्रजीवांमुळे (प्रोटाझोआ संघातील जीवांमुळे) होणारा घोड्यातील सरा रोग कुत्र्यातील बबेसियासीस व गाईबलांमधील पर्णकृमीजन्य (एक प्रकारच्या चपट्या जंतांच्या जातीमुळे होणारा) रोग इत्यादींमध्ये आढळतो. तसेच नर व मादी यांच्या रक्तातील विभिन्नतेमुळे नवजात शिंगरे व डुकरांच्या पिल्लांत होणारी कावीळ ह्याच प्रकारात मोडते. जंतुजन्य काविळीचा प्रकार इन्प्ल्यूएंझा, डिस्टेंपर व लिव्होस्पायरोसीस ह्या कुत्र्यांच्या रोगांत त्याचप्रमाणे घोड्यातील कंठपीडनरोग ह्या विकारांमध्ये दिसतो. रोधजन्य प्रकाराची कारणे माणसातील रोधजन्य काविळीप्रमाणेच आहेत.

या व्यतिरिक्त जनावरांत गामण असताना, ऋतुकालामध्ये तसेच लसूणघास प्रमाणाबाहेर प्रथम खाण्यात येतो त्यावेळी कावीळ झाल्याचे दिसून आले आहे, पण त्याची कारणमीमांसा फारशी समजलेली नाही.

काविळीच्या आशुकारी (तीव्र) प्रकारात जनावर एकदम मलूल होते; डोळे, नाक, तोंड व जननेंद्रियांची श्लेष्मकला (बुळबुळीत अस्तर) एकाएकी पिवळट दिसू लागते, ताप बराच वाढतो, अशक्तता वाढत जाते व कधीकधी जनावर दगावते. कुष्यातील आशुकारी काविळीच्या प्रकारात वरील क्षणांव्यतिरिक्त ओकाऱ्या, आचके येणे हेही दिसून येते. चिरकारी (जुनाट) प्रकारात बद्धकोष्ठ, काळपट रंगाची विष्ठा, पांडुरोग, अशक्तता इ. लक्षणे दिसतात.

काविळीचे कारण शोधून त्याप्रमाणे उपचार करतात.

 

दीक्षित, श्री.गं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate