(एग्रॅन्युलोसायटोसिस). रक्तामधील श्वेतकोशिकांपैकी (पांढऱ्या कोशिकांपैकी) कणकोशिकांची (विशिष्ट लहान कणांनी युक्त असलेल्या पेशींची) संख्या एकाएकी कमी होऊन अशक्तपणा, मुखव्रण (तोंडाच्या आतील बाजूस झालेल्या जखमा), ज्वरादी लक्षणयुक्त रोगाला कणकोशिकान्यूनत्व असे म्हणतात.
संप्राप्ती
काही व्यक्ती विशिष्ट औषधांना संवेदनाक्षम असल्यामुळे ती औषधे सूक्ष्म प्रमाणात घेतली असताही त्या व्यक्तींच्या रक्तातील कणकोशिकांची संख्या व प्रमाण एकदम कमी होते. त्या व्यक्तींमध्ये या कोशिकांची उत्पत्ती कमी झाल्यामुळे ही अवस्था येते. प्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) दर घ. मिमी. मध्ये पाच ते सात हजार श्वेतकोशिका असून त्यांपैकी ६० ते ७० टक्के कोशिका कणकोशिका असतात. या रोगाच्या तीव्र प्रकारात एकूण श्वेतकोशिकांची संख्या दोन हजारपर्यंतही उतरते व त्यांतील कणकोशिकांचे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत कमी होते.
संसर्गजंतुनाशक सल्फा औषधे, शूलनाशक (वेदनाशामक) अमायडोपायरीन, तत्सम औषधे आणि अपस्मारावरील (आकडीवरील) ट्रॉक्सिडोनासारखी औषधे या औषधांमुळे संवेदनाक्षम व्यक्तींत हा रोग होतो.
श्वेतकोशिकांचे मुख्य कार्य म्हणजे संसर्गप्रतिकार हे होय. या कोशिकांची संख्या कमी पडल्यामुळे अशा व्यक्तींना जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिकार न झाल्यामुळे जंतुसंसर्ग फार तीव्र व प्रसंगी मारकही ठरतो.
लक्षणे
अशक्तपणा वाटतो, तोंडात, जिभेवर व घशात तीव्र व्रण उत्पन्न होतात, मानेतील गाठी वाढतात वगैरे प्राथमिक लक्षणे दिसतात. थोडयाच वेळानंतर थंडी भरून ताप येतो. ताप ४०० ते ४१० से. इतका चढतो. प्लीहा (पांथरी) व यकृत वाढून क्वचित कावीळ होते. सर्वांग ठणकू लागते. वेळीच रोगकारक औषघे बंद करून योग्य उपचार न झाल्यास रोग मारकही ठरतो.
निदान
वर सांगितलेली औषधे घेत असल्याचे पूर्ववृत्त व रक्तपरीक्षा यांमुळे निदान कठीण नाही. मात्र अलीकडे ही औषधे घेण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, खोदून खोदून विचारल्याखेरीज पूर्ववृत्त मिळत नाही.
चिकित्सा
मूळ कारण असलेली औषधे ताबडतोब बंद करून पेनिसिलीन वगैरे संसर्गनाशक प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात. ⇨ कॉर्टिसोन, रक्ताधान (शिरेतून रक्त देणे) वगैरे गोष्टींचाही उपयोग होतो.
ढमढेरे, वा. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश