लक्षणे : कंपवात हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा विकार आहे. मज्जारज्जूच्या वरच्या टोकाला त्याच्याशी सलग असा मेंदूचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन स्टेम) असतो. मस्तिष्क स्तंभातील कृष्णद्रव्य क्षेत्र (सबस्टॅंन्शिया नीग्रा) या भागातील चेतापेशींपासून डोपामाइन हे रसायन स्रवले जाते. कंपवातात या चेतापेशी हळूहळू मृत होत जातात. डोपामाइन हे चेतापारेषक रसायन असून एका चेतापेशीपासून दुस-या चेतापेशीकडे संवेद वाहून नेण्याचे कार्य करते. डोपामाइनमध्ये घट झाल्याने ज्या चेता शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करण्यास मदत करतात, त्या चेतांच्या संदेशाच्या मार्गात बिघाड होतो. जसजसे या चेतापेशी अधिक प्रमाणात मृत पावतात, तसतसे ठराविक हालाचालींवर नियंत्रण करणे अशक्य होते. कंपवात झालेल्या व्यक्ती ब-याचदा अडखळत चालताना दिसतात. तसेच या व्यक्तींना खाणे, पिणे किंवा लिहिणे कठिण जाते. त्यांच्या चेह-यावरचे स्नायू ताठरल्यामुळे चेहरा मुखवट्याप्रमाणे भासतो. खुर्चीतून एकदम उठताना तोल जाण्याची शक्यता असते. काही वेळा यामुळे रुग्णाला विषण्णता (डिप्रेशन) किंवा विस्मृती असे मानसिक आजार होऊ शकतात व त्यांतून गंभीर स्वरुपाची दुर्बलता उद्भवू शकते.
काही रुग्णांच्या बाबतीत, कंपवाताची स्थिती मेंदूच्या ज्या भागातील चेतापेशीमुळे उद्भवते तेवढा भाग शस्त्रक्रियेने निष्क्रिय केला जातो. मागील काही वर्षांत, रुग्णातील डोपामाइन स्रवणा-या चेतापेशींची कमतरता भरून काढण्यासाठी अन्य स्रोतापासून डोपामाइन स्रवणा-या पेशींचे प्रत्यारोपण मेंदूत करण्याचे प्रयत्न संशोधक करीत आहेत. काही वेळा मेंदूच्या अंतर्भागात मस्तिष्क उद्दीपन यंत्रिका बसवून तिच्यादवारे मेंदूच्या काही भागांना विद्युत् स्पंद देण्याचे तंत्रही वापरले जाते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...