অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंटरफेरॉने

(व्यत्ययकारके). प्रयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात एकदा विषाणू [→ व्हायरस] टोचल्यानंतर जर त्यांना दुसऱ्या वेळी विषाणुबाधा झाली तर पोषक कोशिकांमध्ये (शरीराच्या सूक्ष्म घटकांमध्ये) संरक्षण शक्ती तयार असलेली आढळून येते. ह्या संरक्षणामुळे दुसऱ्यांदा शिरलेल्या विषाणुवाढीत व्यत्यय (अडथळा) येतो. ह्या घटनेकडे सु. ३५ वर्षांपूर्वीच शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले होते. आयझाक्स व लिंडेनमान या शास्त्रज्ञांनी १९५७ मध्ये ह्या व्यत्ययकारकांस (अडथळा करणाऱ्या पदार्थांस) 'इंटरफेरॉने' असे नाव दिले आहे. जिवंत प्राणी किंवा संवर्धित कोशिका-समूहात विषाणुजन्य रोग होताच २४ ते २८ तासांतही व्यत्ययकारके निर्माण होतात. ज्या सुमारास विषाणूंची जास्तीत जास्त वाढ होते त्याचवेळी (२४ ते २८ तास) व्यत्ययकारकांची कमाल निर्मिती होऊन विषाणुवाढ कमी होऊ लागते. विषाणु-प्रतिपिंड [→प्रतिपिंड] व्यत्ययकारकांच्या निर्मितीनंतर काही दिवसांनी सापडतो. विषाणु-उत्पादन आणि व्यत्ययकारके यांमधील कालिक संबंधावरून तसेच प्रतिपिंडाच्या उशिरा सापडण्यावरून विषाणुजन्य रोगांच्या प्रतिकारात व्यत्ययकारके महत्त्वाचे कार्य करीत असावीत असे अनुमान बांधता येते.

गुणधर्म

व्यत्ययकारके विजातीय प्रथिनांचे गट आहेत. त्यांचा रेणुभार २०,००० ते ३४,००० असून रेणूमध्ये कार्बोहायड्रेटे अत्यल्प प्रमाणात असतात. ती अपोहन अक्षम म्हणजे पारगम्य पटलांमुळे लहान रेणू मोठ्या रेणूंपासून अलग न होणारी व ट्रिप्सीन या एंझाइमाच्या बाबतीत संवेदनशील असून विशिष्ट पद्धतीने ती रंगविल्यास अम्‍लांनी वा तत्सम पदार्थांनी त्यांचा रंग नाहीसा होत नाही. न्यूक्‍लिइक अम्‍लांचा त्यांच्यात अभाव असतो असे १९६३ साली लॅम्पसन यांना आढळून आले. विषाणूंच्या गोळ्या बनू शकतील अशा तीव्र केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेनेही व्यत्ययकारकांचे अवसादन (साचण्याची क्रिया) होऊ शकत नाही. काही महत्त्वाची उदाहरणे वगळल्यास, व्यत्ययकारक ज्या जातीच्या प्राणिशरीरात उत्पन्न झाले असेल त्याच जातीच्या प्राणिशरीरात विषाणूंच्या वाढीत व्यत्यय आणू शकेल. इतर प्राण्यांत ते निष्प्रभ ठरते. व्यत्ययकारकांची विशिष्टता प्राणिजातीपुरतीच मर्यादित आहे. एक प्रकारच्या विषाणूंमुळे निर्माण झालेले व्यत्ययकारक अनेक प्रकारच्या विषाणूंच्या वाढीत व्यत्यय आणू शकते. व्यत्ययकारकांचा कोशिकांबाहेरील विषाणूंवर परिणाम होत नाही. तसेच त्यांचा विषाणूंच्या कोशिका-अधिशोषणावरही (कोशिकांच्या पृष्ठभागावरील शोषणाच्या क्रियेवरही) परिणाम होत नाही. ती बाधा झालेल्या कोशिकांतील विषाणूंच्या वाढीतच व्यत्यय आणतात.

निर्मिती व क्रिया

व्यत्ययकारकांची निर्मिती कोशिकांत होते व ती कोशिकाबाह्य द्रवात मिसळतात. विषाणूंच्या अस्तित्वाशिवाय त्यांच्या निर्मितीचे इतरही प्रेरक आहेत. विषयुक्त रक्त प्लाविका (रक्तातील कोशिका ज्यात लोंबकळत असतात असा रक्ताचा द्रव भाग), रिकेट्‌सिया व क्लॅमिडी (विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजंतू), नैसर्गिक अगर संश्लेषित (कृत्रिमरीत्या तयार केलेल) रिबोन्यूक्लिइक अम्‍ल ही व्यत्ययकारक प्रेरकांचे कार्य करतात. बुरशीतील (उदा., स्टॅटोलोन अगर हेलेनाइन) विषाणु-व्यत्यय-शक्ती ही त्यामधील रिबोन्यूक्लिइक अम्‍लाशी (आरएनएशी) संबंधित असते. रिओव्हायरसमधून काढलेले आरएनए हे व्यत्ययकारकाला चेतना देणारे सर्वांत प्रभावी प्रेरक आहे. चेतना मिळताच पोषक कोशिकांतील जीन [आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणारे गुणसूत्रामधील एकक, →जीन] व्यत्ययकारकांचे संश्लेषण करण्याचे निर्देशन करतात व ते बाधित कोशिकांत मुक्त होते. प्राण्यांमध्ये व संवर्धित भक्षिकोशिका (सूक्ष्मजंतूंचे भक्षण करणाऱ्या मुद्दाम वाढविलेल्या मोठ्या कोशिका) समूहात अंतर्विष (कोशिकांच्या आत राहणारे विष) व्यत्ययकारकांची निर्मिती करू शकते; पण इतर संवर्धित ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांत) करू शकत नाही. व्यत्ययकारके व त्यांचे प्रेरक आंतरकोशिकीय परजीवींमुळे (दुसऱ्यावर उपजिविका करणाऱ्या जीवांमुळे) होणाऱ्या रोगांविरुद्ध प्रतिरक्षणाचे कार्य करू शकतात (उदा., मलेरिया, टॉक्सोप्लाझ्मा). व्यत्ययकारक उपचारित कोशिका लॅक्टिक अम्‍ल जादा प्रमाणात उत्पन्न करतात तसेच ऑक्सिजन अधिक घेतात. विषाणुप्रकार कोणताही असला तरी ठराविक प्राणिजातीत एकाच प्रकारच्या व्यत्ययकारकाची निर्मिती होते. संवर्धित ऊतक किंवा सबंध प्राणी यामध्ये ती कार्यक्षम असतात. ती कार्यक्षमता काही दिवसच टिकणारी असते. व्यत्ययकारकांचे कल्प (व्यत्ययकारकांनी युक्त असे तयार केलेले पदार्थ) पाण्याच्या गोठणबिंदूच्या खालील तपमानात टिकतात. ते हिमशुष्क (गोठवून व वाळवून) केल्यास ४० से. तपमानात साठविता येतात.

व्यत्ययकारकांचे प्रकार

निरनिराळे पदार्थ प्रेरक म्हणून वापरले असता व्यत्ययकारके दोन प्रकारची आहेत असे आढळून आले आहे. एका प्रकारचे व्यत्ययकारक पूर्वनिर्मित असते; स्टॅटोलोन किंवा अंतर्विष अंत:क्षेपण (इंजेक्शन) रूपाने देताच दोन तासांच्या आत ते रक्तप्रवाहात मिसळते. दुसऱ्या प्रकारचे व्यत्ययकारक अठरा तासांनंतर रक्तरसात (कोशिकाविरहित व न गोठणाऱ्या रक्ताच्या द्रव भागात) सापडते. पहिल्या प्रकारच्या व्यत्ययकारकाचा रेणुभार दुसऱ्यापेक्षा अधिक असतो. निरनिराळ्या रेणुभार असलेली आणखी काही व्यत्ययकारके सापडली आहेत. त्यांची विषाणुवाढीत व्यत्यय आणण्याची शक्ती कोशिका-चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक भौतिक घडामोडीतील) बदल घडविण्याच्या जैवधर्माचा भाग असावी, असे दिसते.

व्यत्ययकारके व रोगनियंत्रण

मंद प्रतिजनकता (जनन न होण्याची क्षमता) आणि विषाणुवाढीत व्यत्यय आणणारी प्रभावी शक्ती यांमुळे व्यत्ययकारके विषाणुजन्य रोगांच्या नियंत्रणात वापरली जाण्याची शक्यता आहे. प्रायोगिक प्राण्यामध्ये बहिर्जात व्यत्ययकारकांचा विषाणुजन्य रोग-प्रतिबंधक म्हणून किंवा रोगांचा जोर कमी करण्याकरिता उपयोग होतो, असे आढळून आले आहे. इन्फ्ल्यूएंझामध्ये न्युमोनिया होऊन मरण पावलेल्यांच्या फुप्फुस-ऊतकांत व्यत्ययकारकाचा अभाव असल्याचे आढळते. ह्यावरून या रोगापासून जे बचावले त्यांच्या शरीरात व्यत्ययकारकाने महत्त्वाचे कार्य केले असावे असे अनुमान बांधता येते.

उत्पादनातील अनेक अडचणींमुळे व्यवहारोपयोग्य व पुरेशी व्यत्ययकारके तयार करणे अद्याप शक्य झालेले नाही. व्यत्ययकारक प्रेरकाचे उत्पादन सुलभ झाल्यास विषाणुजन्य रोगांच्या नियंत्रण कार्यास अधिक चालना मिळेल. कृत्रिम पॉलिन्यक्लिओटाइडे ही व्यत्ययकारक प्रेरके म्हणून मानवातही यशस्वी ठरतील असे संशोधनावरून आढळून आले आहे. हे प्रेरक पदार्थ अंत:क्षेपणानेच देता येण्यासारखे आहेत. तोंडाने देता येण्यासारखा पदार्थ अजून सापडलेला नाही. असे पदार्थ अंत:क्षेपणाद्वारे देण्यात धोका आहे कारण ते विषारी ठरण्याची फार शक्यता आहे. मानवी ऊतक-कोशिकांपासून व्यत्ययकारके तयार करण्याचा प्रयत्‍न करण्याच येत असून त्याकरिता रक्तातील पांढऱ्या पेशींचा उपयोग करून पाहण्यात आला आहे. प्रत्यक्ष व्यत्ययकाराकांचा उपयोग करताना ती रक्तप्रवाहातून अतिजलद नाहीशी होतात, असे आढळून आले आहे. वारंवार अंतःक्षेपण करूनही पाहिजे तेवढा व्यत्ययकारकांचा संचय ऊतक-कोशिकांत होऊ शकत नाही.


संदर्भ : 1. Cruckshank, R. Ed. Medical Microbiology, Edinburgh, 1965.

2. Finter, N. B. Ed. Interferons, Amsterdam, 1966.

3. Miyakawa, M.; Luhey, T. D. Eds. Advances in Germfree Research and Gnotobiology, Cleveland, Ohio,1968.

भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate