या योजनेतून सुरक्षित प्रसूतींचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ही योजना मुख्यत: गरीब व मागासवर्गीय कुटुंबांसाठी आहे. या योजनेचा तपशील या प्रकरणाच्या शेवटी दिला आहे. आरोग्य विमा योजना भारतातला आरोग्यावरचा बहुसंख्य खर्च लोक स्वत:च्या खिशातून करतात. यासाठी वेळप्रसंगी लागेल त्याप्रमाणे खर्च करावा लागतो. मात्र यासाठी चीजवस्तू विकणे किंवा कर्ज काढावे लागते. असे होऊ नये म्हणून आरोग्य विमा योजना उपयोगी आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला काही ठरावीक रक्कम देऊन आरोग्यसेवांचा विमा विकत घेता येतो. ग्रामीण आरोग्य मिशनमार्फत अशा आरोग्य विमा योजनांचा प्रसार व्हावा अशी योजना आहे. मात्र यासाठी थोडा निधी दिलेला आहे. गरीब कुटुंबांचा विमा उतरवण्यासाठी निधी उपलब्ध करावा लागेल. पण ज्यांना शक्य आहे अशी कुटुंबे स्वत:च हा विमा खरेदी करु शकतात.
ग्रामीण आरोग्य मिशनचा प्रयत्न खूप असला तरी यामध्ये काही अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत.
मुख्य समस्या म्हणजे आशा कार्यकर्त्यांना पुरेसे प्रशिक्षण,साधनसामग्री आणि औषधे दिली नसल्यामुळे गावपातळीवर आरोग्यसेवा वाढवण्याचा प्रयत्न खुंटला आहे. जोपर्यंत गावपातळीवर किमान आरोग्यसेवा उभ्या होत नाहीत तोपर्यंत एकूण आरोग्यव्यवस्था सुधारणे अवघड आहे.
मिशनचा मुख्य भर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणे वाढवण्यावरच आहे. या सेवांची गुणवत्ता अजून कमीच आहे. उपकेंद्रावर होणारे बाळंतपण फार गुणवत्तेचे नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणाची गर्दी वाढल्याने काही तासांतच बाळ- बाळंतीणीला घरी पाठवावे लागते. ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स मिळत नसल्याने तातडीक बाळंतपण- शस्त्रक्रियेच्या सेवा अद्याप कमी आहेत. यामुळे अनेकांना जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. यामुळे या रुग्णालयात गर्दी दिसली तरीही खरी सुधारणा नाही. जननी सुरक्षा योजनेच्या पैशाच्या आमिषाने ही गर्दी दिसते. या उलट एकूणसेवा सुधारुन आकर्षक केल्या असत्या तर हळूहळू बाळंतपणासाठी लोक आलेच असते. बाळंतपणाशिवाय इतर सेवांची वाढ फारशी झालेली नाही. खाजगी क्षेत्रातून उपचार घेणारे लोक सरकारी आरोग्यसेवांकडे यावे ही मिशनची अपेक्षा चांगली असली तरी आरोग्य मिशनला हे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे अजूनही लोक मोठया प्रमाणावर खाजगी डॉक्टरांवर अवलंबून आहेत. जननी सुरक्षा योजना कशासाठी? दरवर्षी भारतात, गरोदरपण व बाळंतपणासंबंधित समस्यांमुळे लाखभर स्त्रियांचे मृत्यू होतात. गरोदरपणात,बाळंतपणात तसेच बाळंतपणानंतर जर योग्य खबरदारी घेतली तर यातील बरेचसे मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी सुसज्ज रुग्णालयात बाळंतपण करणं चांगलं. मात्र ब-याचदा डॉक्टरांची फी, प्रवास खर्च, औषधांचा खर्च अशा आर्थिक अडचणींमुळे आणि इतरही कारणांकरता लोक घरीच बाळंतपण करतात. दारिद्रयरेषेखालील स्त्रियांसाठी भारत सरकारने जननी सुरक्षा योजना नावाची नवीन योजना सुरू केलेली आहे. योजनेकरता पात्रता आणि रोख रक्कम ही या योजनेची ठळक वैशिष्टये आहेत. ही मदत गरोदरपणापासूनच मिळायला पाहिजे. यात एकोणीस वर्षांपुढील वयाच्या आणि दारिद्रयरेषेखालच्या कुटुंबांमधल्या सर्व स्त्रियांना रोख मदत मिळते. तिस-या बाळंतपणाला आलेल्या स्त्रिया जर त्यानंतर खुशीने ऑपरेशन करून घ्यायला तयार असतील तर त्यांनाही ही मदत मिळेल. यात बाळंतिणीला 700 रु. ची मदत दिली जाईल. मदत करण्यासाठी आपल्याला येण्या-जाण्याच्या तसेच रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याच्या खर्चाकरता रोख 600 रु. दिले जातील. ही योजना घरी बाळंतपण करण्यासाठी लागू आहे. अशा स्त्रीला 7 दिवसांच्या आत 500 रु. साहाय्य मिळते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...