অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गावपातळीवरील आरोग्यसेवा

अंगणवाडी

प्रत्येक गावात 1000वस्तीला एक अंगणवाडी असते. अंगणवाडीत जरी 3-6 वयोगटातली मुले येत असली तरी त्यापेक्षा लहान बालकांनाही सेवा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. याचबरोबर गरोदर व स्तनदा माता अंगणवाडीत तपासणीसाठी आणि पोषक आहारासाठी येतात. पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण,लसीकरण, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य तपासणी ही अंगणवाडीची महत्त्वाची कामे आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस हा आरोग्य दिन म्हणून पाळला जातो.

आशा

2007 पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे. सुरुवातीस ही योजना फक्त आदिवासी भागात होती. 2009 पासून इतर ग्रामीण भागातही ही योजना लागू झालेली आहे. लवकरच शहरी भागात आरोग्य कार्यकर्त्या नेमल्या जातील. मात्र त्यांना आशा ऐवजी 'उषा' असे नाव असेल. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गावपातळीवर आशा कार्यकर्तीचे खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात आशाची निवड ग्रामपंचायत/ग्रामसभेकडून होते. 10वी झालेल्या स्त्रियांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना निरनिराळया कामांसाठी मोबदला मिळतो. त्यातून त्यांना महिन्याला सुमारे 1000 ते 1500 रु. मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची कामे अपेक्षित आहेत.

आरोग्य उपकेंद्र

आपण आरोग्य उपकेंद्राची अधिक माहिती करून घेऊ या. कदाचित हेच गावाला सगळयात जवळचे उपचाराची सोय असलेले ठिकाण असेल. आपल्या उपकेंद्रात एक नर्सताई आणि एक बहुउद्देशीय कार्यकर्ता असतो.

त्यांची मुख्य कामे अशी

  • जीवघेण्या सहा आजारांपासून बाळाचा बचाव करण्याकरता लसीकरण.
  • गरोदर स्त्रियांची तपासणी, सोपी बाळंतपणे आणि बाळंतपणानंतरची योग्य काळजी.
  • जोडप्यांना पाळणा लांबविण्याची आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांची माहिती देणे.
  • मलेरिया, टी.बी. कुष्ठरोग यावर उपचार करणे.
  • साध्या-मध्यम आजारांवर उपचार करणे.
  • अंगणवाडया आणि शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करणे.
  • हगवण, न्यूमोनिया, यांसारख्या घातक आजारांवर उपचार आणि लहान मुलांची इतर काळजी.
  • स्वच्छता आणि पाणी शुध्दीकरण याबाबत सल्ला देणे.

नर्सताई आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता यांचे काम कठीण असते. त्यांच्याकडची गावे ही 8-10 कि.मी च्या क्षेत्रात पसरलेली असतात. ब-याचदा त्यांना चालत ठिकठिकाणी पोचावे लागते. ते घरोघर भेटी देऊन काही सेवा देतात तर अंगणवाडीत लसीकरण करतात. ते आरोग्य कार्यक्रमांचा मासिक अहवाल तयार करतात. त्यांना दरमहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते. आता प्रत्येक उपकेंद्रास आणखी एक नर्सताई नेमलेली असते

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate