राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत विविध आजारांवर उपचार करुन तब्बल 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च झाला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 15 हजार 299 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
दारिद्र्य रेषेखालील आणि 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी 2013 पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी दीड लाख रुपयापर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखापर्यंतचा खर्च शासनाच्या वतीने केला जातो. परभणी जिल्ह्यात 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत 15 हजार 299 लाभार्थ्यांनी जिल्ह्यातील रुग्णालयासह परजिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात या योजनेचा लाभ घेतला आहे.
या सर्व लाभार्थ्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी एकंदरीत 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील आठ रुग्णालयांमध्ये 22 जून 2016 पर्यंत जिल्हा रुग्णालयात 703 रुग्णांवर उपचार करुन 64 लाख 93 हजार 900 रुपयांचा खर्च झाला आहे. स्वाती क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त 1092 रुग्णांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे. त्यावर 81 लाख 37 हजार 500 रुपयांचा खर्च झाला आहे, चिरायू हॉस्पिटलमध्ये 478 रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत.
या रुग्णांवर 1 कोटी 10 लाख 37 हजार 250 रुपयांचा खर्च झाला आहे, स्पर्श हॉस्पिटलमध्ये 831 रुग्णांनी उपचार घेतले असून त्यावर 1 कोटी 24 लाख 75 हजार 400 रुपयांचा खर्च झाला आहे. सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 24 लाख 24 हजार, करीम हॉस्पिटलमध्ये 66 रुग्णांवर 13 लाख 2 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच सेलू येथील नव्याने समाविष्ट झालेल्या माणिक हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 5 रुग्णांनी लाभ घेतला असून त्यांच्यावर 63 हजार 750 रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच काही रुग्णांनी परजिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयासह परभणी शहरातील स्वाती क्रिटीकेअर हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, सेलू येथील माणिक हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
सध्या जिल्ह्यात पाच रुग्णालय या योजनेमध्ये कार्यरत आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थीव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत, स्त्री रोग, बालरोग, त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, सांधा व फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार होतात. एन्डोक्रॉईन व इंटरव्हेशनल, रेडिओलॉजी या उपचार सुविधांसह शस्त्रक्रियाही होतात.
अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा यासह 27 जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी पर जिल्ह्याच्या रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त 12 हजार 148 लाभार्थ्यांनी उपचारासाठी नोंदणी केली असून त्यापैकी 5 हजार 754 लाभार्थी उपचारासाठी पात्र ठरले आहेत.
सर्वच शेतकऱ्यांना मिळणार लाभ
या योजनेत आता शेतकऱ्यांचाही समावेश केला आहे. राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या आजारांचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाने 28 एप्रिल 2016 पासून राज्यातील 14 जिल्ह्यांमधील शुभ्र शिधापत्रिका धारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला या योजनेअंतर्गत समाविष्ट केले असून, शेतकऱ्यांनाही आता राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, परभणी