सामान्यत: होमिओपथीची औषधे सर्व मोठया शहरांत सहज उपलब्ध होतात. ती स्वस्त व घेण्यास सोपी असतात. शिवाय ते रोग्याच्या लक्षणांशी सहीसही जुळणारे नेमके औषध निवडल्यास दुष्परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र नेमके औषध काळजीपूर्वक निवडले पाहिजे.
प्रखर प्रकाश किंवा उष्णता,तीव्र वास यांपासून मात्र औषधांचे रक्षण करणे आवश्यक आहे. बाजारात औषध ठेवण्यास योग्य अशा बाटल्या,लाकडी पेटया, इत्यादी उपलब्ध आहेत. 30 नं. आकाराच्या एक ड्राम गोळया, रोज 4गोळया 3 वेळा, अशा मात्रेत घेतल्या तर सुमारे पंधरा दिवस पुरतात.
संधिवात, दमा, इसब अशा जुनाट प्रकारच्या रोगांकरता योग्य औषध निवडून ते (दोनशे सूक्ष्मतेचे) रोज एक मात्रा याप्रमाणे दिले जावे. एक मात्रा म्हणजे नं 30आकाराच्या चार गोळया. औषध घेण्याआधी व नंतर सुमारे एक तासपर्यंत काहीही खाणे-पिणे बंद ठेवावे म्हणजे औषधाचा चांगला उपयोग होतो.
नवीन किंवा तात्कालिक रोगलक्षणे तीव्र असताना औषध दिवसातून 3-4 वेळा द्यावे. रोगलक्षणांची तीव्रता कमी होईल तशा औषधांच्या मात्रा कमी कराव्या. रोज दोन वेळा, रोज एक वेळ असे करीत औषध बंद करावे.
होमिओपथीचे औषध चालू असताना कोणत्याही खास आहारविहाराची गरज नसते. गरज असते ती खाणेपिणे, झोपणे, व्यायाम करणे, काम करणे, इत्यादी सर्व बेतात ठेवण्याची. कोणताही अतिरेक हा उपचारांना अडथळाच ठरतो. दारू, तंबाखू, तीव्र वासाचे पदार्थ,मसालेदार जेवण, जागरणे करणे हे सर्व कटाक्षाने टाळले गेले पाहिजे.
होमिओपथीच्या योग्य औषधाची निवड हा अर्थातच या शास्त्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. योग्य औषध निवडीकरता गरज असते ती मुख्यत:औषधांच्या लक्षणांची. कोणत्या औषधाखालील लक्षणांमध्ये सदर लक्षणे आहेत ह्याची माहिती होमिओपथी औषधनिवडीसाठी लागते.
या प्रकरणात काही निवडक औषधांचे काही लक्षणसमूह (औषधवर्णन) दिलेले आहेत. ही लक्षणे लक्षात ठेवून जेव्हा रुग्णाच्या लक्षणांशी आपण ताडून पाहतो, तेव्हा नेमक्या औषधाचे नाव आपल्याला समजते. जी 'खुणेची लक्षणे'असतात त्यांच्या साहाय्याने आपण तात्काळ उपाययोजनाही करू शकतो - मग ही लक्षणे मानसिक असोत की शारीरिक. होमिओपथीमध्ये अनेकदा शारीरिक लक्षणांपेक्षा मानसिक लक्षणांना अधिक महत्त्व असते.
होमिओपथीने कोणत्या अवस्थेतील रुग्ण बरा होऊ शकतो, कोणत्या अवस्थेतला होत नाही, याला होमिओपथीतही अर्थात मर्यादा आहेत. याकरता उपमा दिली जाते ती जहाजाची. जहाज वारा, वादळाने कलले तर आपोआप पुन्हा सरळ होतेच. समजा जहाज कलले, त्यातील सामान एका बाजूला गोळा झाले, त्यामुळे ते वाकडेच राहू लागले तरी कुशल खलाशी ते परत संतुलित आणि सरळ करू शकतो. पण जहाज कलू लागताच काळजी घेतलीच नाही किंवा दुस-या बाजूने कशीही ताकद लावून ते सरळ करू गेले तर अनर्थ ओढवू शकतो. माणसाच्या प्रकृतीचेही तसेच आहे . त्या मर्यादा ओलांडून झाल्यावर होमिओपथी काय करू शकते हे नेहमी प्रत्येक केसमध्ये वेगवेगळया प्रकाराने ठरते.
एकदा औषध सुचले, की आपण होमिओपथीच्या 'औषध वर्णन' (Materia Medica) पुस्तकात वाचून ते निश्चित करू शकतो. इंग्रजीमध्ये अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठीत मात्र फार कमी आहेत. (डॉ. फाटक यांची काही पुस्तके आहेत.)
लक्षणांवरून औषध शोधण्यासाठी मदत करणारी पुस्तकेही असतात. यांना'औषध सूचक '(Repertory)म्हणू या. यामध्ये लक्षणे व भावनेखाली औषधांची यादी दिलेली असते. उदा. डोकेदुखी-ठोके पडणारी,आडवे पडल्याने वाढणारी-याखाली औषधाचा एक गट सापडेल. समजा, याच माणसाला पोटात आम्लतेचा त्रास असेल तर त्याखालील औषधांचा दुसरा गट सापडेल. या दोन गटांतील दोन्हींकडे असणारी जी औषधे असतील त्यांतून त्या रुग्णाने औषध शोधायला हवे. मग त्याने सांगितलेली आणखी लक्षणे विचारात घेऊन त्याचे औषध शोधता येईल. अशा रीतीने जेव्हा सर्व लक्षणे किंवा जास्तीत जास्त लक्षणे विचारात घेऊन औषधयोजना केली जाते तेव्हा त्या औषधाला खरे होमिओपथिक औषध म्हणता येईल. होमिओपथिक औषध निवडताना रोग्याच्या लक्षणांकडेच लक्ष द्यावे लागते. प्रत्येक लक्षणासाठी नवीन औषध या पध्दतीत नसून आजाराचे संपूर्ण एकत्रित चित्र पाहून त्याच्याशी जुळणारे औषध निवडावे लागते. हे एकत्रित चित्र तयार करण्याच्या सोयीसाठी आपल्याला मिळणा-या लक्षणांचे आपण पुढीलप्रमाणे गट करू शकतो.
यापैकी वैशिष्टयपूर्ण लक्षणे आणि सार्वत्रिक लक्षणे ही औषध ठरवण्याकरता उपयोगी ठरतात. यांतील मानसिक लक्षणे फार उपयुक्त असतात. चिडखोरपणा, रडकेपणा,खोटारडेपणा, अतिसंवेदनशीलता ही सर्व लक्षणे औषध शोधण्याकरता आपण वापरू शकतो. कारण औषध सिध्द करणारांनी त्यांच्या मनात निर्माण झालेली लक्षणे, स्वप्ने, संवेदना या प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवलेली आहे. यानंतर एकेका अवयवात उद्भवणारी लक्षणे लक्षात घेऊन औषध सूचकाचा उपयोग करून एकदा आपण एका औषधाच्या गटापर्यंत येतो. यानंतर शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे एक औषध निश्चित करण्याचा. याकरता औषध वर्णनाचा वापर करता येईल. सर्व किंवा बहुतेक सांगितलेली लक्षणे आपण शोधलेल्या औषधाखाली सापडतात, तेव्हा आपण खात्रीने ते औषध रुग्णास देऊ शकतो.
परंतु सामान्यत: रुग्णांकडून पुरेशी लक्षणे मिळत नाहीत. त्यामुळे 'सर्व लक्षणे'विचारात घेऊन औषध देणे अवघड ठरते. पण अनेक वर्षे होमिओपथी वापरात असल्याने काही ठोकताळे केले आहेत. यासाठी पुढील एक किंवा अनेक प्रकार वापरून औषधयोजना यशस्वीपणे करू शकतो.
औषध देण्यास सुरुवात सामान्यत:30 (सूक्ष्मता) शक्तीपासून केली जाते. जुन्या रोगांमध्ये 200 शक्तीचे औषध वापरणे योग्य असते. तीव्र आणि नवीन लक्षणे असल्यास मूलद्रावण किंवा 3 अथवा 6 शक्तीचे औषधही द्यावे लागते. केव्हा किती शक्तीचे औषध द्यावे ही गोष्ट वादग्रस्त आहे. तथापि 30 किंवा 200 शक्तीचे औषधच सामान्यत: वापरले जाते. जर औषधांची निवड योग्य आहे अशी आपली खात्री असेल पण गुण येत नसेल तर1000, 10,000 शक्तीचे औषधही देऊन पहावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/27/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...