অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सागरगोटे/गजगे

हा मुलींचा खेळ समजला जातो.

 

दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा. सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.

घरात कुठेही बसून खेळण्यासारखा


खूप मजेशीर आणि घरात कुठेही बसून खेळण्यासारखा हा खेळ ५०/५५ वर्षापूर्वी घराघरात खेळला जायचा. लहान मोठया मुली सर्व जण खेळतात. यामधे हात बोटे, डोळे, यांना उत्तम व्यायाम होतो झेल पकडायचे कौशल्यही असते.

लेखन : माधुरी अंतरकर

स्त्रोत : मराठी वर्ल्‍ड

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate