অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कसरतीचे खेळ

कसरतीचे खेळ

कसरतीचे खेळ प्राचीन काळापासून लोकप्रिय आहेत. त्यांत दोरावरील वा तारेवरील कसरती, उलट्या सुलट्या कोलांट-उड्या, हातावर चालणे, एका व दोनही हातांवरील तोलाची कामे करणे, डोक्यावर तोल सांभाळून कसरती करणे वगैरे प्रकार येतात. कसरतीचे खेळ करणाऱ्यांना शरीरावर ताबा ठेवून, चापल्याने हवे तसे शरीर वाकवून व वळवून अचाट कामे करावी लागतात. त्यासाठी लहानपणापासून शरीर लवचिक व काटक बनविण्याचे शिक्षण घ्यावे लागते. आपल्याकडील डोंबारी, गारूडी लोकांप्रमाणेच पश्चिमी देशांतही कसरतीचे खेळ करून उपजीविका करणाऱ्या जमाती होत्या. अठराव्या शतकापासून कसरतीच्या खेळांना चालना मिळाली व सर्कशीमध्ये कसरतीचे खेळ प्रामुख्याने होऊ लागले. हे कसरतीचे खेळ विशेष लोकप्रिय होऊन त्यांत आता खूपच विविधता निर्माण झाली आहे.

विविध कौशल्यांच्या खेळांत शारीरिक कसरतींच्या खेळांना बरेच प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यांत प्रामुख्याने ताणलेल्या दोरावरील कामे, ताणलेल्या तारेवरील कामे, झुल्यावरील कामे, एक वा अनेक आडव्या दंडावरील कामे, दोन समांतर आडव्या दंडावरील कामे, सायकलीवरील कामे असे अनेक प्रकार येतात. उभ्या शिडीवरील तोलांची कामे, टांगत्या कड्यांवरील कामे, बांबूवरील तोलांची कामे, खुर्च्या, टेबले, बाटल्या, स्टुले इ. विविध प्रकारची साधने वापरून करावयाच्या तोलांच्या कसरती, हालत्या स्थितीत करावयाच्या तोलांच्या कसरती, रोलर बॅलन्सिंग, उलट्या सुलट्या कोलांट-उड्या, डोंबाऱ्याच्या उड्या, एकावर एक माणसांना उभे करून विविध प्रकारचे मानवी मनोरे बनविणे, पळत्या घोड्याच्या पाठीवरून अनेक प्रकारच्या कसरती, कोलांट-उड्या इ. मारणे, अशी शारीरिक कसरतींची कामे अलीकडील सर्कशीत पहावयास मिळतात.

कसरतीच्या खेळांपैकी काही खेळ अगदी आधुनिक असून त्यांचा उगम गेल्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेला आहे. इ. स. १८६० साली ज्युलेस लिओटार्ड या फ्रेंच युवकाने झुल्यावरील कसरतीचे खेळ करून दाखविले. तो एकटाच झुल्यावरील ही कसरत करीत असे. सर्कशीतील तंबूत ९ ते ११ मी. उंचावर आणि ८ ते १० मी.अंतरावर असलेल्या टांगत्या झुल्यांना झोके देऊन एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर तो उड्डाण मारून दाखवी. आता झुल्यांच्या प्रकारात बरीच प्रगती झाली असून अनेक कसरतपटू विविध उड्डाणांच्या कसरती करून दाखवितात. उडते झुले व त्यांवरील कौशल्याची कामे, हे एक सर्कशीतील खेळांचे आज महत्त्वाच अंग बनले आहे. झुल्यांचे हे प्रयोग हवेत १३ मी. ते १५ मी. उंचीवर होत असल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी खाली जाड दोऱ्यांचे जाळे ताणून ठेवलेले असते. या जाळ्यावरही झुल्यातील एखादा कसरतपटू उताणा पडून उशी घेतो व हवेत एक वा अनेक उलट्या सुलट्या कोलांट-उड्या मारून दाखवितो. दोरावरील कसरती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत, परंतु इ. स. १८५९ साली ब्‍लाँडिन हा फ्रेंच कसरतपटू फार अद्‍भुत व रोमांचकारी अशी दोरावरील कामे करण्याबद्दल प्रसिद्ध होता. इ. स. १८६० साली तर त्याने अमेरिका व कॅनडा यांच्या सरहद्दीवर असलेल्या नायगारा धबधब्यावर टांगता दोर बांधून त्यावरून प्रथम डोळे बांधून नंतर पाठीवर माणूस घेऊन चालून दाखविले. तिसऱ्या खेपेस त्याने एका लहान गाडीत माणूस बसवून ती गाडी दोरावरून ढकलीत नेऊन चालून दाखविली व शेवटी बरोबर स्टोव्ह, भांडे व अंडी नेऊन दोराच्या मध्यावर आमलेट बनवून व खाऊन दोर पार करून दाखविला.

व्यायामी खेळांचा प्रकार प्राचीन ग्रीक परंपरेतून आलेला आहे. व्यायामाने शरीरसौष्ठव कमावून, बाह्यसाधनांसह व साधनांशिवाय करावयाच्या अनेक कसरतींचे खेळ ग्रीक समाजात रूढ होते. यांत दोन प्रकारचे घोडे, उडीचा घोडा, व कडीचा घोडा, आडवा दंड व दुहेरी समांतर आडवे दंड, टांगत्या कड्या व जमिनीवरील पुढल्या व मागच्या कोलांट-उड्या, हातापायांचे चक्र वगैरे नवनवीन कसरतींचे खेळ व प्रयोग फारच वरच्या दर्जाचे केले जातात. या शारीरिक कसरतींचा ऑलिंपिक सामन्यात अंतर्भाव झाल्याने त्यास बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. यात पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा असतात. रशिया, जपान, चेकोस्लोव्हाकिया इ. देश या कसरतींच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

आपल्याकडील डोंबारी व कोल्हाटी लोकही अनेक प्रकारचे कसरतीचे खेळ करतात. हे लोक सामान्यतः दोरावरील, तारेवरील कसरतींची आणि तोलांची कामे, अनेक प्रकारच्या कसरतींच्या उलट्या सुलट्या कोलांट-उड्या, शरीर वाकवून, वळवून आणिमुडपून दाखविणे, उंच काठीला पाय ठेवण्यासाठी ठोकळे लावून त्यांच्या साहाय्याने चालणे, शिडीवरील तोलांची कामे, उंच बांबू छातीवर, कपाळावर अगर दातांवर उभा तोलून त्यावर लहान मुलामुलींनी अलगद कसरतीचे खेळ करणे इ. कसरतींची कामे करीत गावोगाव हिंडत असतात. त्यांच्यातील कसरतीचे कसब जसे आनुवंशिक तसेच मेहनतीचे व सरावाने कमावलेले असते. अलीकडील सर्कशीत ताणफळीवर उड्या मारून उशी घेऊन, अनेक घोड्यांच्या पाठीवरून अगर हत्तीच्या पाठीवरून सूर उड्या मारण्याचे प्रयोगही केले जातात. त्याचप्रमाणे एकाने ताणफळीवरून उडी मारून उशी घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावर उभे राहणे, नंतर दुसऱ्याने आणखी मोठी उशी घेऊन पहिल्याच्या खांद्यावर उभे राहणे व असे करीत तीन-चार-पाच माणसांचा मनोरा तयार करणे, असलेही कसरतीचे प्रयोग करण्यात येतात.

पुरलेल्या, टांगत्या, वेताच्या व बाटलीवरील तोलाच्या मल्लखांबांवर शरीरास जंबिया, सुरे इ. शस्त्रे बांधून कसरतीच्या उड्या करणे, शरीर वाकवून वळवून करावयाचे विविध खेळ, दसरंग, मुठ्यावरील हाताने करावयाची विविध तोलांची कामे व आसने इ. अनेक प्रकारच्या मल्लखांबावरील कामांचा शारीरिक कसरतीच्या खेळात समावेश होतो.

कसरतीच्या खेळांत आता फारच विविधता व वैचित्र्य आलेले आहे. चिनी, जपानी तसेच आपल्याकडील म्हैसूरी, केरळी, डोंबारी व कोल्हाटी लोक यांच्या कसरतींच्या खेळांचे खास स्वतंत्र वैशिष्ट्य त्यांच्या प्रयोगात प्रकर्षाने प्रत्ययास येते.

 

 

संदर्भ : 1. Prestige, Pauline and Jim, Your Book of Gymnastics, London, 1964.

2. Amateur Gymanstic Association, Simple Gymnastics, London, 1955.

लेखक: शि. शं. कार्लेकर ; शा. वि. शहाणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate