आपण आपल्या मातृभाषेतील व्यवहार, विचारांची देवाण-घेवाण इत्यादी कामे, ज्याप्रकारे बोलून करतो, तसाच लिहूनही करतो, त्या लिहिण्याच्या प्रक्रियेत “लिपी” महत्वाची असते. म्हणून जगातील कोणत्याही भाषेमध्ये ‘भाषण’ आणि ‘लेखन’ या दोहोंचा समावेश होतो.
लिपी हा शब्द “लिप्” (लिंपणे, माखणे, सारवणे) या मुळ शब्दापासून तयार झाला आहे. कागदावर शाईने काहीही लिंपले की त्याला ‘लिपी’ म्हणतात. शाईचा शोध लागण्याअगोदर पूर्वीचे लोकं त्यांचे विचार, भावना, गुप्त दस्ताऐवज इत्यादी दगड, गुहेच्या भिंती, ताम्रपट, ताडपत्र यांवर कोरून ठेवत असत. “लिख्” (कोरणे) असा मुळ शब्द आहे, त्यामुळे नंतर अशा प्रकारच्या कोरून खुणा करून ठेवण्याच्या क्रियेला ‘लेखन’ असे क्रियापद सर्वमान्य झाले. आपण मराठी लिहिण्यासाठी सध्या जी लिपी वापरतो ती म्हणजे “बालबोध लिपी”. तीलाच “देवनागरी लिपी” असेही म्हणतात. आर्य लोकांची असलेली ही लिपी, त्यांनी ती भारतात आणली. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी, येथे द्राविड शासकांचे राज्य होते. पण आर्य लोक हे येथील मुळ द्राविड लोकांपेक्षा वर्णाने अतिशय तेजस्वी आणि गोरे असल्यामुळे त्यांना “देव” म्हटले जाऊ लागले. हे आर्य लोक नगर (शहर) करून वास्तव्य करीत असत, म्हणून ते “नागरी” आणि त्यांच्या लिपीला “देवनागरी लिपी” असे नाव पडले. देवनागरी लिपी नंतर बहुतेक भारतीय भाषांमध्ये लेखन करण्यासाठी वापरली जाऊ लागली. आताच्या काही मुख्य भारतीय भाषांची (उदा. संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराथी) लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपी मध्ये प्रत्येक ध्वनी (स्वर) दर्शविण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत, तसेच प्रत्येक वर्णाला (स्वर, व्यंजन) एकापेक्षा जास्त ध्वनी नाहीत, म्हणून ही लिपी “आदर्श लिपी” म्हणून ओळखली जाते.
थोडासा वेगळा विचार केला तर, आपली देवनागरी लिपी ही इतर लिप्यांपेक्षा पुष्कळशी पूर्ण (काही त्रुटी आहेत) आहे. पुष्कळशी म्हणण्यामागचा हेतू हाच की, या लिपीतील ‘इ’ आणि ‘उ’ हे दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार (लांबट उच्चार) दर्शवण्याची यात सुविधा नाही, याशिवाय ‘च’, ‘ज’, ‘झ’ हे वर्ण दोन तर्हांनी (उदा. च/च्य) उच्चारले जातात. हे थोडेफार दोष सोडले, तर मराठी देवनागरीतील बहुतेक ध्वनींना स्वतंत्र चिन्हे (वर्ण) आहेत.
देवनागरी लिपीतील चिन्हे (वर्ण) हे उभ्या, आडव्या तसेच गोलाकार, वक्र आणि तिरप्या अशा रेषाखंडांनी बनलेले आहेत. ही लिपी (पृष्ठाच्या) डावीकडून उजवीकडे ओळींनुसार (आडव्या), अशा प्रकारे लिहीली जाते. ओळ संपली की पुन्हा त्याच पद्धतीने एकाखाली एक अशा ओळींत वाक्ये (शब्द-समुह) लिहिली जातात. वर्ण एकमेकांना जोडायचे असल्यास ते एकापुढे-एक किंवा एकाखाली एक, अशा दोन्ही प्रकारे जोडतात. कालांतराने लिहिण्यात सुलभता यावी यासाठी झालेल्या बदलांमुळे या लिपीतील बरीचशी अक्षरे (चिन्हे) आज बरीचशी बदललेली दिसतात. ही लिपी जलद रीतीने लिहिता यावी म्हणून या लिपीतील काही अक्षरांना थोडी मुरड घालून घसरत्या पद्धतीने (cursive style) लिहिण्याची प्रथा काही काळ प्रचलित होती, तीला “मोडी लिपी” असे प्रचलित नाव आहे. ही मोडी लिपी लिहिण्यास जरा अवघड जात असल्याने कालांतराने नामशेष होण्याच्या मार्गावर होती, पण आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तीला पुन्हा दैनंदिन व्यवहारात आणण्याचे कसोशीचे प्रयत्न काही मराठी प्रेमींकडून चालू आहे. मोडी लिपीसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती खालील दुव्यांवर आपणांस मिळू शकेल.
दुवे:
स्त्रोत : मराठी मंडळी
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 7/26/2020
महा ऑनलाईन संस्थेमार्फत आपल्या विभागाची संपूर्ण मा...
सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजा...