অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाजकार्य

समाजकार्य

समाजकार्य : रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा. विसाव्या शतकात सामाजिक बांधीलकीच्या कल्पना प्रसृत व  विकसित झाल्यानंतर, ही संकल्पना प्रामुख्याने भरभराटीस आली व विकसित झाली; तथापि यूरोपमध्ये खासगी औदार्याला संघटित आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न इंग्लिश पुअर लॉव्दारे इ. स.१६०१ मध्ये करण्यात आले. ही कृती रास्त आणि न्याय असली, तरी तिचा प्रत्यक्षात विकास गेट बिटन, जर्मनी आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत एकोणिसाव्या शतकात झाला. समाजाच्या हितासाठी व विकासार्थ असलेली ही संकल्पना मोठी व व्यापक आहे.

तीत समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य अभिप्रेत असून विविध प्रकारे हे सेवाकार्य करण्यात येते. केवळ स्वत:ला पुण्य मिळावे, म्हणून समाजातील वंचित गटांना साहाय्य करणे किंवा भूतदयेपोटी दीनदुबळ्यांची सेवा करणे, म्हणजे समाजकार्य नव्हे. विसाव्या शतकात समाजकार्य ह्या संकल्पनेवर साधकबाधक विचारविनिमय झालेला आहे आणि अनेक समाजशास्त्रज्ञांनी या संकल्पनेची व्याख्या केली असून तिचा ऊहापोहही केला आहे. या व्याख्यांपैकी फीडलँडर पुढील शब्दांत समाजकार्य वा सेवा या संज्ञेची व्याख्या करतात. ‘ समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे. हा व्यवसाय शास्त्रीय ज्ञानावर  व मानवी संबंधांच्या कौशल्यांवर आधारित आहे. एखादया व्यक्तीला किंवा गटाला अशी मदत केली जाते, जेणेकरून सामाजिक व वैयक्तिक समाधान निर्माण होऊन स्वावलंबनाची प्रकिया सुरू होईल.

समाजकार्य हे एखादया संस्थेमार्फत किंवा संघटनेमार्फत केले जाते ’; तर स्ट्नाऊपच्या मते (१९६०) ‘ समाजकार्य हे जसे शास्त्र आहे, तशीच ती एक कलाही आहे ’. त्याच्या मते व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सर्व प्रकारच्या साधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्यास सक्षम करणे, म्हणजे समाजकार्य होय. सामाजिक कार्य करणाऱ्या भारतीय परिषदेने देखील समाजकार्याची केलेली १९५७ मधील व्याख्या आजही समाजकार्य क्षेत्रात मान्य आहे. समाजकार्य ही कल्याणकारी कृती आहे. समाजकार्य हे मानवतावाद, शास्त्रीय ज्ञान व तांत्रिक कौशल्ये ह्यांवर आधारित आहे. व्यक्ती, गट किंवा समुदायाचे आयुष्य अधिक परिपूर्ण करण्याचा त्यात प्रयत्न आहे. ह्या सर्व व्याख्यांचा साकल्याने विचार केल्यास त्यांतील काही प्रमुख उद्देशांची तसेच कार्यपद्धतीची कल्पना येते.

  1. समाजकार्य ही एक संघटित व्यावसायिक सेवा आहे. त्याकरिता प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले जातात. असे प्रशिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत.
  2. मानवी वर्तनातून व सामाजिक परिस्थितीतून जे प्रश्न निर्माण होतात, त्या संदर्भात काम करण्यासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्ये लागतात.
  3. मानवी वर्तणुकीचे व सामाजिक परिस्थितीचे विश्र्लेषण करणे, हे महत्त्वाचे असते.
  4. वैयक्तिक किंवा सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विशिष्ट तंत्र व पद्धती वापरल्या जातात.
  5. सामाजिक समायोजनावर अधिक भर दिला जातो.
  6. फक्त प्रश्र्न सोडविण्यावर भर नसून असे प्रश्न पुन:पुन्हा निर्माण होऊ नयेत, म्हणूनही प्रयत्न केले जातात.
  7. समाजाच्या विकासासाठी सर्व साधनांचा उपयोग करण्याचा प्रयत्न असतो.

समाजकार्याचे मुख्य ध्येय, सामाजिक कार्यक्षमता वाढविणे हे होय. समाजकार्यांची तत्त्वप्रणाली ही लोकशाही तत्त्वांवर आधारित असून सामाजिक न्याय, समता, समानता व विकास ही तत्त्वे महत्त्वाची मानली आहेत. समाजकार्य तीन घटकांनी बनले आहे:

  1. ज्ञान-मानवी वर्तणुकीचे ज्ञान हा पाया आहे. समाजरचना, समाजजीवन, सामाजिक प्रथा, रूढी-परंपरा, समस्या का निर्माण होतात, ह्याचे ज्ञान अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे ह्या समस्या सोडविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व संसाधनांची माहिती असणे महत्त्वाचे आहे
  2. कौशल्ये-समाजातील सर्व स्तरांतील लोकांबरोबर समस्या निरा-करणाचे काम करताना संवाद साधण्याचे कौशल्य सर्वांत महत्त्वाचे आहे. लोकसंपर्क व लोकांचा विश्र्वास संपादन करण्याची क्षमता महत्त्वाची आहे.
  3. तत्त्वप्रणाली-व्यक्तींवर विश्र्वास, प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेवर विश्र्वास, व्यक्तीचा माणूस म्हणून आदर. कुठल्याही बाबीवर भेदाभेद अमान्य असून प्रत्येक व्यक्तींमध्ये अनेक क्षमता असतात व योग्य संधी मिळाल्यास, त्या विकसित होऊन व्यक्ती संपूर्ण स्वावलंबी बनू शकते ह्यावर दृढविश्वास.

समाजकार्य करण्याच्या विशिष्ट पद्धती विकसित झालेल्या आहेत. व्यक्तिसहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाजकल्याण प्रशासन, समाजकार्य संशोधन व सामाजिक कृती ह्या समाजकार्याच्या पद्धती आहेत.

 

संदर्भ : 1. Cooper, Joan, Social Workers : Their Role and Tasks, 1982.

2. Misra, P. D. Philosophy and Methods, 1936.

3. Mukharjee, Radhakamal, Social Work in India, 1971.

4. Wadia, A. R. History and Philosophy of Social Work in India, New Delhi, 1961.

 

लेखक - रूमा बावीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate