तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !
संक्रांत आली की वेगवेगळ्या राज्यात गोड लहर उठते. आपल्या राज्यात ''तिळगुळ घ्या व गोड गोड बोला'' अशा शुभेच्छांचा वर्षाव होतो...
कोणत्याही गोष्टीची सुरुवात गोड असावी असे म्हणतात आणि भारताला यासाठी लाभलेले वरदान म्हणजे मकर संक्रांतीचा सण होय. पौष महिन्यात असणारा हा सण म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात. विविधता असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक राज्यात हा सण साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो. त्यामुळे वर्षाची सुरुवात अगदी गोड होते. हा गोडवा माणसं एकत्र येण्याचा, गोडवा त्या सणाच्या पावित्र्याचा, गोडवा पतंगाने नटलेल्या त्या आकाशाचा तर गोडवा तिळगुळाचा. राज्य कुठलेही असो, वातावरण मात्र एकच असते. कुणी लहान असो, मोठा असो उत्साह मात्र एकच असतो आणि हीच गंमत संक्रांतीच्या सणाला दिसून येते.
या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. आंध्रप्रदेश व तेलंगणामध्ये भोगी व मुक्कनुमा या नावाने, हिमाचल प्रदेशामध्ये मघासाजी, उत्तराखंडमध्ये घुघुति, ओडिसामध्ये मकर बसोबा, तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने हा सण साजरा केला जातो. या सणाची विविधता नावापुरतीच मर्यादित नसून ती खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. बिहार आणि झारखंडमध्ये तीळबर्फी, हरियाणामध्ये चुरमा, गुजरातमध्ये उंधीयु आणि चिक्की, हिमाचलमध्ये तूप खिचडी व ताक, कर्नाटकमध्ये इल्लुबेल्ला, तामिळनाडूमध्येही थिरुवाथिरयी कुट्टू, कळी, सक्कराई, गोड पोंगल बनवून हा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात तिळगुळ व तिळगुळाचे लाडू बनविले जातात.
सूर्याचा प्रवास उत्तर दिशेकडे सुरु होतो. अर्थातच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते. लोकांच्या मनात स्नेह, आदर व प्रेमाची भावना असावी त्याकरिता आपण तिळगुळ वाटून आपल्या नात्यांना आणखी मजबूत बनवितो. जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात. त्यामुळे काळ्या रंगाचे पोशाख विशेषत: स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या घालतात. काळा रंग ऊन शोषून घेतो व त्यामुळे शरीर गरम ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तिळाचेही तितकेच महत्व आहे. तिळगुळाचे लाडू शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यास मदत करतात.
अशा या नाविण्यपूर्ण मकरसंक्रांतीच्या सणाला आपण सर्व एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊया आणि आपल्या नात्यांना जपूया.
सण संक्रांतीचा आला आपला,
द्वेषाचे दार बंद करुन, प्रेमाचे दार खोला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
अंतिम सुधारित : 8/7/2023
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.