कम्युनिस्ट जाहीरनामा : कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिख एंगेल्स या दोघांनी १८४८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याने राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात एक नवे युग निर्माण केले. ‘आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व समाजाचा इतिहास हा वर्गयुद्धांचा इतिहास आहे ’, या वाक्याने कम्युनिस्ट जाहीरनाम्याचा आरंभ झाला आहे आणि वर्गयुद्धाचे कारण असलेली वर्गीय समाजरचना नष्ट करून वर्गविहीन समाजरचना निर्माण करण्यासाठी, जगातील ‘सर्व कामगारांनो एक व्हा’ हा त्या प्रबंधात शेवटचा आदेश दिला आहे. मार्क्सच्या इतिहासविषयक आणि समाजक्रांतिसंबंधीच्या तत्त्वज्ञानाचे सर्व सार या जाहीरनाम्यात सामावलेले आहे. समाजाचा विकास, राज्यसंस्था, अर्थपद्धती, नैतिक कल्पना इ. बाबतींत कम्युनिस्ट जाहीरनाम्यातील विचार क्रांतिकारक आहेत. सामाजिक व्यथांचे, विशेषतः सामाजिक शोषणाचे दिग्दर्शन आणि त्या नष्ट करण्यासाठी योजावयाचे क्रांतितंत्र, या दोन्हींची रूपरेषा या जाहीरनाम्यात सांगितली आहे.
कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध झाला ते वर्ष यूरोपच्या इतिहासात अनेक घटनांमुळे प्रक्षोभक मानले जाते. त्या वर्षी अनेक ठिकाणी राजकीय उठाव झाले. हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच आठवड्यांमध्ये पॅरिस शहरात क्रांती झाली. त्यात सुप्रसिद्ध पॅरिस कम्यूनची स्थापना झाली. पोलंड,इटली,बोहेमिया,हंगेरी इ. राष्ट्रांत राजकीय आंदोलने झाली. परकीय सत्तेच्या दडपणापासून स्वतंत्र होण्यासाठी राष्ट्रीय चळवळी झाल्या. कारखानदारांच्या नफेबाजीविरुद्ध कामगारांनी लढे दिले. या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट जाहीरनाम्याची तपासणी केली म्हणजे,त्याचे महत्त्व व वैशिष्ट्य लक्षात येऊ शकते. यंत्रोत्पादनामुळे भांडवलशाही आली आणि पर्यायाने सत्तेची सूत्रे थोड्या लोकांच्या हाती केंद्रित होत होती. जुना सरंजामदार वर्ग मागे पडला. जुना कारागीर वर्ग साधनविहीन बनला. इंग्लं डमध्ये चार्टिस्ट चळवळ याच सुमारास विशेष गाजली. पार्लमेंटमध्ये सामान्य जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधींना प्रवेश मिळावा,अशी या चळवळीची मागणी होती
या सर्व बदलत्या परिस्थितीमुळे सामाजिक,राजकीय व आर्थिक क्षेत्रांत यूरोपमध्ये अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले होते. मार्क्स आणि एंगेल्स यांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या कम्युनिस्ट जाहीरनाम्यात विषम समाजस्थितीचे विश्लेषण करून त्यावर क्रांतीचा मार्ग सुचविला. या जाहीरनाम्याची चार प्रकरणे आहेत: (१) भांडवलशाही व कामगार, (२) कामगार व कम्युनिस्ट, (३) समाजवादी व साम्यवादी साहित्य आणि(४) अस्तित्वातील भिन्नभिन्न विरुद्ध पक्षांच्या संबंधांत साम्यवाद्यांचे स्थान. पहिल्या प्रकरणात आधुनिक भांडवलशाहीचा उदय आणि उत्कर्ष कसा झाला,भांडवलदार वर्गाने कशी सामाजिक क्रांती केली,सरंजामशाही सत्ता व समाजपद्धती नष्ट करून तो कसा सत्ताधारी झाला,याचे विवेचन केलेले आहे. अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांतील अनेक नवे देश ताब्यात घेऊन पश्चिमी साम्राज्यवाद्यांनी त्यांना आपल्या हक्काच्या बाजारपेठा बनविल्या व नवे उद्योगधंदे आणि उत्पादन यंत्रे यांच्या जोरावर या बाजारपेठांची पिळवणूक केली. भांडवलशाहीने उत्पादनाची प्रचंड दालने खुली केली;प्रचंड नवा कामगारवर्ग उदयास आला;पण उत्पादनसाधनांची मालकी मूठभर लोकांच्या हाती केंद्रित झाल्यामुळे समाजातील इतर सर्व श्रमजीवी लोक परावलंबी बनले;ज्यांच्या हाती उत्पादनसाधने त्यांच्याच हाती सत्ता,हे समीकरण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अधिक उघड्या स्वरूपात स्पष्ट झाले;पण भांडवलशाहीच्या प्रगतीबरोबरच मजुरांची संख्या आणि संघटना वाढत जाते व संघटित कामगारवर्गच अखेर भांडवलशाहीचा निःपात करतो; असे पहिल्या प्रकरणाचे तात्पर्य आहे.
जाहीरनाम्याच्या दुसऱ्या प्रकरणात कामगारवर्ग,त्यांच्या संघटना आणि कम्युनिस्ट यांचे परस्परसंबंध दिग्दर्शित केले आहेत. निरनिराळ्या राष्ट्रांच्या दलित वर्गीय चळवळींत कम्युनिस्ट हे राष्ट्रीयत्वाची भावना बाजूस सारून जगातील सर्व दलितांच्या हितसंबंधास प्राधान्य देतात,असा एक निष्कर्ष यात काढला आहे. कामगारांची संघटना करणे,भांडवलशाही उलथून पाडणे व कामगारवर्गाच्या हाती सत्ता केंद्रित करणे,हे कम्युनिस्टांचे तिरंगी ध्येय या प्रकरणात स्पष्ट केले आहे.
जाहीरनाम्याच्या तिसऱ्या प्रकरणात यूटोपियन म्हणजे अस्थितादर्शवादी समाजवाद आणि तत्सम विचारांचे खंडन केले आहे. चौथ्या प्रकरणात कम्युनिस्टांनी त्या काळी अस्तित्वात असलेल्या इतर विरोधी पक्षांशी कसे संबंध ठेवावे व त्याकरिता कार्यपद्धती कशी असावी,याचे विवेचन केले आहे. प्रचलित समाजपद्धती क्रांतिकारक मार्गांनी उलथून पाडल्याशिवाय कामगारांना आपली ध्येये गाठता येणे शक्य नाही, असे सांगून असे करण्यात हा वर्ग स्वतःचे काहीही गमावणार नसून तो केवळ आपल्या श्रृंखला तेवढ्या गमावणार आहे; त्याच्यासमोर जिंकण्यासाठी सारे जग आहे; म्हणून जगातील‘ सर्व कामगारांनो एक व्हा’ असा आशापूर्ण संदेश या जाहीरनाम्याच्या भरतवाक्यात दिला आहे.
संदर्भ : Marx, Karl; Engels, Friedrich, Trans., Moore, Samuel, The Communist Manifesto, Baltimore, 1967.
लेखक - स. मा. गर्गे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/13/2020
कोणाही व्यक्तीच्या, समाजाच्या अगर सत्तेच्या कार्या...
चिनी कम्युनिस्टांच्या क्रांतियुद्धातून पुढे आलेला ...
इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक ...
फ्रेंच गणितज्ञ.