एमेलीन पँक्हर्स्ट : (४ जुलै १८५८ - १४ जून १९२८). इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक नेत्या. पूर्वाश्रमीचे नाव एमेलीन गूल्डेन. जन्म मँचेस्टर येथे एका सधन कुटुंबात. तिचे आईवडील इंग्लंडमधील सुधारणावादी चळवळीत नेहमी भाग घेत. वयाच्या चौदाव्या वर्षी तिने स्त्रियांच्या मतासाठी चाललेल्या एका सभेत आपली हजेरी लावली. प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे घेऊन पुढे ती पॅरिस येथे शिक्षणासाठी गेली. तिने या चळवळीशी संबंधित असणाऱ्या रिचर्ड मार्सडेन पँक्हर्स्ट या वकिलाबरोबर विवाह केला (१८७९). तथापि काही वर्षांनी त्याचे निधन झाले (१८९८) आणि एमेलीनवर चार मुले नि संसाराची सर्व जबाबदारी पडली. तिच्या मुलांपैकी क्रिस्टाबेल आणि सिल्व्हिया या प्रसिद्धीस आल्या.
क्रिस्टाबेल हिने स्त्रियांच्या मताधिकार चळवळीचे नेतृत्व आपल्या आईबरोबर केले; तर सिव्ल्हिया प्रथम या चळवळीत होती, पण पुढे तिने विवाहसंस्थेस विरोध केला आणि कुमारी मातांची बाजू मांडली. या तिच्या क्रांतिकारक विचारांमुळे तिला मताधिकार चळवळीतून हाकलण्यात आले. पुढे ती इथिओपियाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झाली. एमेलीनने या बिकट परिस्थितीत विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या. ती फेबियन सोसायटीची व स्वतंत्र मजूर पक्षाचीही सभासद होती. स्त्रियांना राजकीय हक्क प्राप्त झाल्याशिवाय स्रीस्वातंत्र्य मिळणार नाही आणि त्यांचे समाजातील स्थान सुधारणार नाही; म्हणून तिने आपल्या क्रिस्टाबेल या मुलीच्या व इतर मैत्रिणींच्या मदतीने ‘विमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन’ (डब्ल्यू. एस्. पीं. यूं) ही संघटना स्थापन केली (१९०३).
संघटनेच्या आक्रमक लष्करी वळणामुळे व प्रचारामुळे तिला १९०८ मध्ये अटक होऊन तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. पुढे तिच्या संघटनेने विध्वंसाचा मार्ग पतकरला. त्या कृत्यांची जबाबदारी एमेलीनने स्वीकारली. त्यामुळे १९१२ मध्ये तिला तीन वर्षांची सजा झाली. तिने तुरुंगात अनेक वेळा उपोषण केले. त्यामुळे तिला अधूनमधून सोडण्यात येई आणि पुन्हा पकडण्यात येई. पहिल्या महायुद्धकाळात तिने आणि तिच्या संघटनेने राष्ट्राला सर्वतोपरी साहाय्य केले. माय ओन स्टोरी (१९१४) हे तिचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१९१७ ते १९२५ च्या दरम्यान तिने अमेरिका, कॅनडा व रशिया या देशांना अनेक भेटी देऊन आपल्या स्रीस्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांचा प्रसार केला. १९१८ मध्ये ब्रिटीश संसदेने वीस वर्षावरील स्त्रियांस मतदानाचा अधिकार दिला. पुढे १९२८ मध्ये कायदा होऊन स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क प्राप्त झाला, मात्र तत्पूर्वी एक महिना ती आजारी पडली आणि लंडन येथे मरण पावली. यावेळी पँक्हर्स्टने कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातर्फे संसदेवर निवडणूक लढवावी, असे ठरले होते. तिच्या स्मरणार्थ ब्रिटिश संसदेजवळ तिचा ब्राँझ पुतळा उभारण्यात आला आहे.
संदर्भ : 1. Fulford, R. Votes for Women, London, 1957.
2. Pankhurst, Sylvia, Life of Emme/ine Pankhurst, New York, 1936.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/3/2020
सहजीवनाचा पुरस्कार करणारा पहिला रशियन साम्यवादी ने...
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्...
केन्या प्रजासत्ताकातील राष्ट्रीय चळवळीतील एक अग्रग...
ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध झगडणारा अग्रगण्य आफ्र...