स्पेनच्या नैर्ऋत्येच्या द्विपकल्पावरील ब्रिटिशांची स्वायत्त वसाहत. क्षेत्रफळ ५·८ चौ. किमी.; लोकसंख्या २९,९२७ (१९७३ अंदाज). लांबी ४·८ किमी., रुंदी १·२ किमी. राजधानी जिब्राल्टर. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या ईशान्येस चुनखडक आणि शेल यांच्या सु. ४२५ मी. उंचीच्या ‘द रॉक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उभ्या खडकावर ब्रिटिशांचा भक्कम दुर्ग, पायथ्याशी गाव व ब्रिटिशांचा नाविक आणि हवाईतळ आहे. समोरच सु. २२ किमी. अंतरावर सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूस स्पॅनिश मोरोक्कोमधील स्यूता येथील ‘जेबेल मूसा’ हा १९४ मी. उंचीचा खडक असून या दोन खडकांस ग्रीक पुराणात हर्क्यूलीझचे स्तंभ म्हटले आहे.
दक्षिणेच्या यूरोपा पॉइंट येथे जिब्राल्टरचा खडक दोन टप्प्यांनी समुद्रापर्यंत येतो. पश्चिमेकडील बेताच्या उतारावर जुन्या संरक्षक तटबंदीवर सु. १०० मी. पर्यंत घरांच्या एकावर एक रांगा आहेत. पूर्वेकडील उभा कडा अनुल्लंघनीय आहे. स्पेनच्या मुख्य भूमीस जिब्राल्टर १४६ किमी. लांब आणि ०·८ किमी. रुंद वाळूच्या पट्ट्याने जोडलेले आहे. त्यावर एक उभय समान भाग आहे. जिब्राल्टरचे भूमध्य सामुद्रिक हवामान समशीतोष्ण व प्रसन्न असते. डिसेंबर ते मेपर्यंत सु. ८८ सेंमी. पाऊस पडतो. उन्हाळा काहीसा कडकच असतो. येथे विहिरी किंवा झरे नसल्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवून बेताने खर्चावे लागते. स्वच्छतेसाठी समुद्राचेच पाणी वापरतात. १·६ कोटी गॅलनच्या तेरा टाक्यांतून साठविलेले पाणी पुरले नाही, तर खडकांतून सुरूंग लावून संयोगभूमीवरील विहिरींचे पाणी मिळवावे लागते आणि तेही संपले, तर पाणी यूरोपातून आयात करावे लागते. येथील जमीन चुनखडकाच्या विदारणाने बनलेली असून छोट्या फुलझाडांच्या ५०० जाती येथे आढळल्या आहेत. खडकांच्या फटीतून येणारे जिब्राल्टर कँडिटफ्ट हे एकच महत्त्वाचे फूल आहे. अगदी वरच्या खडकावर उंदीर, घुशी, खेकडे, बार्बरी माकडे, स्थलांतरी पक्षी, दुर्लभ यूरोपीय बार्बरी पर्टिन तसेच रानटी ऑलिव्ह आणि रानटी पाइनही आहेत.
भूमध्य समुद्राच्या पश्चिम टोकाची नाकेबंदी करण्याच्या दृष्टीने हा मोक्याचा खडक फिनिशियन, कार्थेजियन, रोमन आणि व्हिसीगॉथ या लोकांनी ताब्यात ठेवला होता. इ. स. ७११ मध्ये तरीक या शूर लढवय्याने हा खडक जिंकला व त्यास जेबेल-अल्-तरीक ‘तरीकचा खडक’ हे नाव मिळाले. त्याचाच अपभ्रंश जिब्राल्टर होय. या खडकावर पहिला दुर्ग त्यानेच बांधला.
हा १४६२ पर्यंत मूरांच्याकडेच होता. नंतर तो स्पेनने घेतला. स्पेनमधील वारसा युद्धाचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी तो १७०४ मध्ये काबीज केला. तो परत घेण्याचा १७२६ मधील प्रयत्न निष्फळ झाल्यावर १७२९ मध्ये स्पेनने त्यावरील आपले हक्क सोडून दिले; परंतु अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिश गुंतलेले पाहून फ्रेंच आणि स्पॅनिश सैन्यांनी १७७९–८३ पर्यंत वेढा घालून तो घेण्याचा प्रयत्न केला; पण तो फसला. अखेर अमेरिकन युद्धाचा शेवट पॅरिस शांतता तहाने (१७८३) झाला. त्यातच इंग्रजांना जिब्राल्टर कायमचे मिळाले.
या दोन शतकांत इंग्रजांनी या खडकाच्या आत भुयारे व बोगदे खणून लष्कराच्या तळाची सुरक्षित सोय केली आणि खडकावर, आत आणि भोवती अत्याधुनिक मोर्चे बांधून तेथे जगातील अद्वितीय दुर्ग निर्माण केला. समुद्रातही सोयी करून सुरक्षित नाविक आणि हवाईतळ बांधला.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत दोस्त राष्ट्रांचा पाणबुडी विध्वंसक तळ येथे होता. दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेच्या मोहिमेच्या पूर्वतयारीकरिता जनरल आयझनहौअर यांचे मुख्यालय आणि सैन्य संकलन केंद्र येथेच होते. ‘नाटो’ संघटनाही नाविक हालचालींसाठी जिब्राल्टर वापरते.
जिब्राल्टरला १९५० पर्यंत राजकीय अधिकार फारसे नव्हतेच. त्या वर्षी लोकमतास मान देवून निवडलेली संसद व कार्यकारी मंडळ देण्यात आले व साम्राज्यांतर्गत स्थानिक अधिकार मिळाले. कार्यकारी मंडळाच्या मुख्यास मुख्य मंत्री हे अभिधान मिळाले. सध्या १९६९ च्या संविधान आज्ञेप्रमाणे राज्यपाल, ५ निर्वाचित व ४ पदसिद्ध सदस्यांचे कार्यकारी मंडळ, १५ निर्वाचित, २ पदसिद्ध सदस्य व राज्यपालाने नेमलेला सभापती अशी संसद, मुख्य मंत्री, मंत्रिमंडळ अशी शासनव्यवस्था आहे. न्यायपद्धती ब्रिटिश प्रकारची असून दुर्गावरील सैन्याखेरीज किनारी तोफखाना, स्वयंसेवक, पायदळ इ. संरक्षणव्यवस्था आहे. अलीकडे स्पेनने जिब्राल्टरवरचा आपल्या स्वामित्वाचा हक्क पुन्हा घोषित केला; परंतु जिब्राल्टर नागरिकांकडून त्यास पाठींबा मिळाला नाही. या खडकावर काही पिकत नाही व दैनंदिन गरजांकरिता त्यांस मुख्य भूमीवर अवलंबून रहावे लागते. ती रसद मारण्याचा प्रयत्न स्पेनने केला. हा वाद हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे द्यावा, अशी ब्रिटनची सूचना स्पेनने नाकारली. संयुक्त राष्ट्रांनीही जिब्राल्टरीयनांच्या हितसंबंधांच्या विचाराने ब्रिटन- स्पेनने हा वाद मिटवावा व त्याच्या वसाहतदर्जाचा अंत करावा, असा ठराव डिसेंबर १९६६ मध्ये केला. या बाबतीत बोलणी सुरू होण्याचे सुमारासच स्पेनने जिब्राल्टरची नाकेबंदी कडक करून विमान वाहतूक, रस्ता, रहदारी वगैरेंच्या कटकटी सुरू केल्या. यामुळे जिब्राल्टर विधिमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसास स्पेनला चार शब्द सांगण्यास विनंती केली. शेवटी ब्रिटिश सरकारने स्पेनमध्ये जाणे की ‘जैसे थे’ राहणे यांवर सार्वमत घेतले (१९६७). त्यात ब्रिटनच्या बाजूने कौल पडला आणि सध्या तरी हा वाद स्थगित आहे.
लेखक : मो. ज्ञा.शहाणे, ज. ब. कुमठेकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2023
स्पेनमधील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ८००-९०० किमी...
स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील जिब्राल्टर व आफ्रिके...
तँजिअर : मोरोक्कोचे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवरील...
आयबेरिया : (१) नैऋत्य यूरोपमधील स्पेन व पोर्तुगाल ...