অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महमूद गझनी

महमूद गझनी

महमूद गझनी

(१ नोव्हेंबर ९७१−३० एप्रिल १०३०?). अफगाणिस्तानातील गझनीच्या यमीनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. भारतातील तुर्की किंवा यमीनी या मुसलमानी घराण्याच्या सत्तेशी सुरुवात महमूदापासून झाली. तुर्की सुलतान सबक्तगीनचा (सुबुक्तिगीन) तो मुलगा. बापाबरोबर युद्धात राहून त्यास लढाईचे उत्कृष्ट शिक्षण मिळाले होते.

सावत्रभाऊ इस्माईल (कार. ९९७-९९८) यांच्याशी भांडून तो गझनीच्या गादीवर आला. राज्यावर येताच (९९८) महमूदाने सामानी सुलतान अब्दुल मलिक ह्याच्या बरोबर युद्ध करून हिरात, बाल्ख व खोरासान येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याचे यश मान्य करून बगदादच्या खलीफाने त्यास अमीनुल्मिल्लत व यमीनुदौल्ला हे किताब दिले. धर्मप्रसार व राज्यविस्तार या उद्देशाने त्याने इ. स. १००१−२४ पर्यंत हिंदुस्थानवर सु. सतरा स्वाऱ्या केल्या. १००१ मध्ये महमूदाने लाहोरच्या जयपालाविरुद्ध स्वारी करून त्याचा पराभव केला. १००४-१००५ मध्ये सुलतान व पंजाब यांवर त्याने चढाई केली. जयपालचा मुलगा अनंगपालाच्या विरुद्ध झालेल्या लढाईत त्याने हिंदूंचा पराभव केला. ह्या सर्व स्वाऱ्यांत हिंदूंनी त्याला प्रखर प्रतिकार केला होता.

या विजयानंतर महमूदाने हिमालयाच्या उतरणीवर असलेले नगरकोटमधील पवित्र देवालय एकाएकी लुटून तो गझनीस निघून गेला. मध्यंतरी इ. स. १००२-१००३ मध्ये महमूद इराण व अफगाणिस्तानातील सीस्तान येथे लढाईत गुंतल्याने हिंदुस्थानातील लोकांना थोडासा दिलासा मिळाला; परंतु महमूदाने पुन्हा हिंदुस्थानवर स्वाऱ्या करून लाहोर, स्थानेश्वर, कनौज, मथुरा, कालिंजर,ग्वाल्हेर वगैरे शहरे लुटली व तेथील प्रसिद्ध देवालये फोडून अमाप संपत्ती गझनीस नेली. १०१४ ते १०१७ मध्ये त्याने मध्य आशियात लष्करी मोहिमा काढून समरकंद, बुखारा वगैरे प्रदेश जिंकले.

१०२४ मध्ये महमूदाने केलेली काठेवाडातील सोमनाथची स्वारी ही भारतावरील अत्यंत महत्त्वाची स्वारी होय. त्या वेळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र व प्रसिद्ध असलेल्या सोमनाथ मंदिराला भारतातील अनेक राजांनी अगणित देणग्या दिलेल्या होत्या. महमूद सोमनाथावर चालून जाताच तेथील पुजारी व इतर लोकांनी प्रतिकार करून देवालय सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; परंतु महमूदाने त्या सर्वांना न जुमानता देवालय उद्ध्वस्त करून तेथील अगणित लूट बरोबर घेऊन तो गझनीस परत गेला. यानंतर महमूदाने तीन वर्षांनी मुलतानवर स्वारी केली (१०२७). या शेवटच्या स्वारीनंतर तो तीन वर्षांनी गझनी येथे मरण पावला. त्याला सात मुलगे होते. त्यांपैकी मस्ऊद व मुहम्मद असे दोन राज्यधिकारी झाले.

महमूदाने अफगाणिस्तान, इराण, अमूदर्या नदीच्या पलीकडचा प्रदेश व पंजाबच्या काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पायदळ आणि घोडदळ मिळून साधारणतः एक लाख एवढे सैन्य व सु. १,७०० हत्ती आणि अगणित सोनेनाणी अशी त्याची संपत्ती होती.

खलीफाने त्यास अखेरच्या दिवसांत ‘कह्फुद्दौला वल्-इस्लाम’ अशी आणखी एक पदवी देऊन त्याचा गौरव केला. महमूदला मृत्यूपूर्वी जिंकलेल्या विशाल प्रदेशात कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण करणे शक्य झाले नाही. शिवाय त्याच्या मुलांतील अंतर्गत चुरशीमुळे त्याचे राज्य पुढे फार काळ टिकले नाही; तथापि महमूद हा न्यायप्रिय, विद्वानांचा चाहता, उदार आणि धर्मशील होता याविषयी दुमत नाही. त्याने फक्त मूर्तिभंजकाचेच कार्य केले असे नाही, तर तो विद्या, कला व काव्याचा भोक्ता होता. स्वतः सुन्नी व कडवा मुसलमान असूनही त्याने फार्सी साहित्य व विद्या यांचे संवर्धन केले.

अल्-बीरुनी, अल्-उत्बी, अल्-बैहकी,उनसुरी, फर्रुकी, असजदी, फिर्दौसी इ. अरबी-फार्सी लेखक, कवी आणि विद्वान त्याच्या दरबारी होते. त्याने गझनी येथे एक भव्य मशीद बांधली. त्या मशिदी शेजारी एक पाठशाळा सुरु केली. यातील विद्यार्थासाठी मोफत निवासगृह होते आणि अनेक अध्यापक व विद्यार्थी बाहेरून अध्ययनासाठी तेथे येत. त्याने गझनीतील रस्ते सुधारून दुकानांची सोय केली आणि वजनमापे यांत सुधारणा केल्या. ती तपासण्यासाठी एक अधिकारी नेमला. यामुळे खोरासान ते लाहोर यांच्या दरम्यान व्यापार वाढला.

सेना व प्रजा यांसाठी त्याने एका बाजूस नागरी लिपित ‘अव्यक्तमेकं, मुहम्मद अवतार’ असा मध्यभागी मजकूर असलेली सोने, रुपे, तांबे यांची नाणी पाडली होती. त्याने न्यादानात गरीब-श्रीमंत असा भेद केला नाही आणि विधवा स्त्रिया, सामान्य जन या सर्वांना समान वागणूक दिली. त्याने कालवे बांधलेल्या अनेक वास्तूंतून त्याची कलादृष्टी दिसते. त्याने कालवे बांधून शेतीस उत्तेजन दिले. त्यातील बन्द-इ-सुल्तान अविशिष्ट असून त्याचा काहीसा उपयोग आजही करतात. गझनी शहरात विजयाचे स्मारक म्हणून त्याने बांधलेले मिनार,लहानमशिदी, उत्कृष्ट कारंजी, हौद इ. गोष्टीवरून त्याचे वास्तुकलेवरील प्रेम स्पष्ट होते. त्याचा स्वतःचा राजाप्रासाद उत्तम रीतीने शृंगारलेल्या होता. महमूदाने आपल्या विजयांनी त्याच्यानंतर येणाऱ्या हिंदुस्थानावरील आक्रमकांचा मार्ग सोपा करून ठेवला.

 

पहा : गझनी घराणे.

संदर्भ : 1. Nazim, Mahummad, The Life and Times of Sultan Mahmud of Ghazna, London, 1931.

२. वैद्य, चि.वि. गझनीच्या महनुदाच्या स्वाऱ्या, पुणे, १९२५.

गोखले कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate