অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुलेमान, पहिला

सुलेमान, पहिला

सुलेमान, पहिला

(नोव्हेंबर १४९४– ५/६ सप्टेंबर १५६६). ऑटोमन साम्राज्याचा विस्तारवादी, कलाभिज्ञ व पराक्रमी सुलतान. सुलेमान हा पहिला सलीम या शूर योद्ध्याचा एकुलता एक मुलगा होता, तर दुसरा बेयझीद या सुलतानाचा नातू होता. याच्या कारकीर्दीपासूनच ऑटोमन साम्राज्याची उत्कर्षाकडे वाटचाल वेगाने सुरु झाली.

सुलेमान याने रशियन युवती सेक्सेलाना हिच्याशी विवाह केला. त्याला सलीम, बेयझीद आणि मि-हीमाहे ही तीन मुले होती.

त्याचा आजोबा दुसरा बेयझीद याच्या कारकिर्दीत क्रिमियामधील काफा येथे तो राज्यपाल होता. आपल्या वडिलांच्या कारकिर्दीतही तो पश्चिम आशिया मायनरमधील मनीसा येथे राज्यपालपदी होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो ऑटोमन सम्राट झाला (कार. १५२०–६६). प्रथम त्याने मध्य यूरोप आणि भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश यांवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या वडिलांनी जे अरब प्रदेश जिंकले होते, त्या प्रदेशातून साम्राज्याला अफाट संपत्ती प्राप्त झाली होती. सुलेमानने त्याचा पुरेपूर उपयोग करुन साम्राज्याचा विस्तार केला.

सुलेमानने १५२१ मध्ये बेलग्रेड घेतले. त्याचप्रमाणे दीर्घकाळ नाइट्स ऑफ सेन्ट जॉन याच्या आधिपत्याखाली असलेले रोड्झ काबीज केले (१५२२). पुढे सुलेमानने १५२३ मध्ये खैरुद्दीन (बार्बारोसा) या प्रसिद्घ नौसेना प्रमुखाच्या साहाय्याने प्रबळ आरमार संघटित करुन भूमध्य समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे त्यास मध्य यूरोप आणि भूमध्य समुद्री प्रदेशांवरील ख्रिस्ती सत्तांविरुद्घ लष्करी मोहिमा आखणे सोयीचे झाले.

यूरोपमध्ये त्याने सागरी सत्तेला पायबंद घातला. यासाठी त्याला हॅप्सबर्ग राजसत्तेशी झुंज द्यावी लागली. १५२०–४० दरम्यान त्याने बूडापेस्ट जिंकून हंगेरी पादाक्रांत केले. हॅप्सबर्गनी पुन्हा हंगेरी मिळविण्यासाठी १५२८–४० दरम्यान अथक प्रयत्न केले; पण सुलेमान याने त्यांचा पराभव करुन व्हिएन्नाला वेढा देऊन दरारा प्रस्थापित केला. सुएझ आणि इराक येथेही पोर्तुगिजांविरुद्घ त्याने आरमारी तळ उभारले.

१५३८–५४ हा त्याचा विजयी मोहिमांचा कालखंड ठरला. त्याने भारतातील गुजरात किनाऱ्यापर्यंत आपले आरमार पाठविले होते. पूर्व आघाडीवर दक्षिण कॉकेशस, आझरबैजान आणि इराकवर विजय मिळवून त्याने प्रभुत्व संपादन केले. उत्तर आयुष्यात त्याला गृहकलहाला तोंड द्यावे लागले.

मुस्ताफा या मुलाने बंड केले; तर सलीम व बेयझीद या मुलांत गादीसाठी संघर्ष उद्‌भवला, तेव्हा सुलेमानने मुस्ताफा व बेयझीद यांना शासन केले आणि सलीमची निवड केली.

त्याच्या साम्राज्यात इब्राहिम पाशा, रुस्तु पाशा, महंमद सोकोल्लू पाशा इत्यादी राजनीतिज्ञ होते; बाकी हा राजकवी होता; तर मिमार सिनान हा प्रसिद्घ वास्तुविशारद होता आणि अबू सूद हा कायदेतज्ज्ञ होता.

सुलेमान स्वतः या विद्वानांची कदर करणारा न्यायी सम्राट होता. त्याच्या प्रभावी नेतृत्त्वाखाली ऑटोमन साम्राज्याचा विस्तार झाला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विकास घडून आला. साहित्य, वास्तुकला, आरमार या क्षेत्रांतील त्याचे कार्य लक्षणीय आहे. म्हणूनच त्याची ख्रिस्ती जगतात मॅग्निफिसेन्ट व तुर्की लोकांत कानूनी (विधिज्ञ) अशी पुढे ख्याती झाली. त्याने सिगतव्हार (हंगेरी) या किल्ल्याला वेढा दिला होता, तिथे त्याचे निधन झाले.

 

गायकवाड, कृ. म.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate