२८ ऑक्टोबर १८९३
इंग्लिश कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. इंग्लंडमधील इलफर्ड येथे त्यांचा जन्म झाला. युनिव्हर्सिटी कॉलेज, साऊदॅम्पटन आणि इंपिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, लंडन येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी १९२२ मध्ये डॉक्टरेट पदवी मिळविली. इंपिरियल कॉलेजमध्ये ते प्रथम अधिव्याख्याता होते. नंतर लीड्स येथे प्राध्यापक (१९२४–३०), लंडन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्राध्यापक (१९३०–३७) व युनिव्हर्सिटी कॉलेजच्या रासायनिक प्रयोगशाळांचे संचालक (१९३७ पासून) म्हणून त्यांनी काम केले.
कार्बनी पदार्थांची संरचना, मध्यम संरचना सिद्धांत (मेसोमेरिझम), अनुस्पंदन (रेणुरचनेत अवकाशातील दोन तात्त्विक दृष्ट्या संभाव्य स्थानांमधल्या ठिकाणी होणारे अणूंचे स्पंदन), विक्रीयांचे इलेक्ट्रॉनीय स्पष्टीकरण, त्रिमितीय अडथळा व ड्युटेरियमाचा अनुसंधानात (काळजीपूर्वक करण्यात येणाऱ्या शोधात) उपयोग यांवरील त्यांचे कार्य फार महत्त्वाचे आहे.
कार्बनी विक्रीयांच्या यंत्रणा आणि त्या विक्रियांवर परिणाम घडविणाऱ्या परिस्थिती यांसंबंधीच्या कार्याबद्दल त्यांना रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९५२) व इतर अनेक पारितोषिके मिळाली. १९५८ मध्ये त्यांना नाईट ही पदवी देण्यात आली.
त्रिमितीय रसायनशास्त्र (रेणूंतील अणूंची त्रिदिशात्मक रचना अभ्यासणारी रसायनशास्त्राची शाखा) व कार्बनी विक्रीया या विषयांवरील स्ट्रक्चर अँड मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्री (१९५३) हा त्यांचा ग्रंथ प्रमाणभूत मानण्यात येतो.
लेखक : ज. वि. जमदाडे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/14/2020
जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या ...
सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि भारतीय रसायन उद्यो...
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९६८ च्या रसायनशास्त्राच्...