२७ नोव्हेंबर १९०३
१९६८ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. यांचा जन्म नॉर्वेतील ऑस्लो गावी झाला. १९२५ साली त्यांनी ट्राँडहाइममधील नॉर्वेजियन टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून सीएच्. ई. पदवी मिळविली. १९२८ साली अमेरिकेतील बाल्टिमोरमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात रसायनशास्त्रातील साहाय्यक म्हणून जाईपर्यंत त्यांनी झुरिकमधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अध्ययन केले. १९२८–३३ या काळात ते ब्राउन विद्यापीठात अध्यापक होते. तेथे असतानाच १९३१ साली त्यांनी आपल्या ऊष्मागतिकीच्या (यांत्रिक व इतर रूपातील ऊर्जा आणि उष्णता यांच्या संबंधांचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्राच्या) चवथ्या नियमासंबंधीचा प्राथमिक संशोधनपर निबंध व अव्युत्क्रर्मी (एकाच दिशेने होणाऱ्या) रासायनिक प्रकियांसंबंधीचे सिद्धांत प्रसिद्ध केले. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतरच जगाचे त्यांच्या अन्वेषणाकडे (संशोधनाकडे) लक्ष वेधले गेले. १९३३-३४ मध्ये ते येल विद्यापीठात स्टर्लिंग फेलो होते. तेथेच त्यांची १९३४ साली साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९३५ साली त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. ते १९४० साली सहयोगी प्राध्यापक झाले. १९४५ साली त्यांना सैद्धांतिक रसायशास्त्राचे जे. विलार्ड गिब्ज अध्यासन व अमेरिकेचे नागरिकत्व, ही देण्यात आली. ऊष्मागतिकीसंबंधी त्यांनी केलेल्या मौलिक अन्वेषणाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अव्युत्क्रर्मी ऊष्मागतिकीचा पाया घालण्याबद्दल आणि विद्युत् अपार्य (विद्युत् प्रवाहास विरोध करणारे) व विद्युत् विच्छेद्य (योग्य अशा द्रवात विरघळविल्यानंतर विद्युत् संवाहक होणारे) पदार्थ यांच्यासंबंधीच्या सिद्धांतामध्ये भर घातल्याबद्दल त्यांना १९५३ साली अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे रग्फर्ड पदक, १९५८ साली रॉयल नेदर्लंडस अॅकॅडमी सायन्सेसचे लॉरेन्स पदक,१९६२–६५ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटीची कित्येक पदके व भौतिक रसायनशास्त्राचा पीटर डेबाय पुरस्कार, ही देण्यात आली.
त्यांनी ऊष्मागतिकीच्या मूळ तीन नियमांमध्ये आणखी एकाची भर घातली. त्यांच्या जटिल सिद्धांतात तापमान व विद्युत् यांच्यामधील संबंधांविषयीची–विशेषतः ते गतिज स्थितीत असतानाची–माहिती दिलेली आहे. विद्युत् संवाहकामधील उष्णता व विद्युत् दाब यांचे परस्परसंबंध कसे असतात हे ऑनसॅगर यांनी दिलेल्या पारस्परिकता संबंधांच्या साहाय्याने ठरविता येते.
त्यांच्या सैद्धांतिक अन्वेषणाचा अणुऊर्जेसंबंधीच्या संशोधनातील उपयोग सर्वांत महत्त्वाचा ठरला. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच ऑनसॅगर यांनी युरेनियम (२३८) पासून युरेनियम (२३५) कसे मिळविता येईल यासंबंधीचे गणित मांडले होते. एका बाजूस अतिशय तापविलेल्या व दुसऱ्या बाजूस थंड केलेल्या नळ्यांद्वारे युरेनियमाचे हे दोन ⇨ समस्थानिक वायुरूपात वेगळे करता येतील असेही त्यांनी सांगितले होते. युरेनियम (२३५) तयार करणे व समुद्राचे पाणी गोडे करणे यांसारख्या अगदी भिन्न क्षेत्रांमध्ये त्यांच्या अन्वेषणाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेण्यात आलेला आहे.
लेखक : अ. ना. ठाकूर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या ...
सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि भारतीय रसायन उद्यो...
इंग्लिश कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. इंग्लंडमधील इलफर्...