(२६ ऑगस्ट १६७६-१८ मार्च १७४५). इंग्लंडचा प्रख्यात मुत्सद्दी आणि संसदपटू. त्याचा जन्म सरदार घराण्यातील कर्नल रॉबर्ट आणि मेरी जेफ्री बर्वेल या दांपत्यांपोटी होटन हॉल (नॉरफॉक) येथे झाला. त्यांचा हा तिसरा मुलगा. त्याचे शिक्षण ग्रेट डनहॅम, ईटन (१६९०-९६) आणि किंग्ज कॉलेज, केंब्रिज (१६९६-९८) येथे झाले. दोन्ही जेष्ठ भावांच्या मत्यूमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडला आणि वडिलोपार्जित संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली.
कॅथरिन शॉर्टर या मुलीबरोबर त्याचा विवाह झाला (३० जुलै १७००). त्यांना चार मुले झाली. त्यांपैकी हॉरिस वॉल्पोल (१७१७-९७) हा साहित्यिक म्हणून पुढे प्रसिद्धीस आला. कॅथरिनच्या मृत्यूनंतर (१७३७) वॉल्पोलने आपली स्वीय साहाय्यक मारिया स्केरिट हिच्याशी दुसरा विवाह केला (३ मार्च १७३७). परंतु ती पुढच्याच वर्षी बाळंतपणात मरण पावली (१७३८).
वडिलांच्या मृत्यूनंतर (१७००) कासल राइझिंग या संसदीय मतदार संघाचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे आले. या मतदारसंघातून तो निवडूनही गेला. १७०२ मध्ये त्याची किंग्ज लिन या संसदीय मतदार संघातून निवड झाली व पुढे चाळीस वर्षे त्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. प्रभावी वक्ता, संसदपटू आणि व्हिग पक्षाचा संतुलित सदस्य अशी ख्याती त्याने हाउस ऑफ कॉमन्समध्ये थोड्याच काळात मिळवली.
डेन्मार्क कौन्सिलचा सदस्य (१७०५) आणि युद्धसचिव (१७०८) या त्याच्या सुरुवातीच्या प्रशासकीय स्वरूपाच्या नेमणुका होत्या. टोरी पक्षाच्या विजयानंतर (१७१०) त्याला युद्धसचिवाच्या पदावरून हाकलण्यात आले; तथापि सार्वजनिक, राजकीय जीवनात आणि संसदीय कामकाजात विरोधी पकषाचा सदस्य म्हणून त्याने हिरिरीने भाग घेतला. त्याच्या संसदीय कौशल्यामुळे टोरी पक्षाने त्याला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. १७१२ मध्ये युद्धसचिवाच्या काळातील भ्रष्टाचाराबद्दल त्याची अभियोगाद्वारे चौकशी होऊन, त्याला दोषी ठरवून, हाउस ऑफ कॉमन्समधून हाकलण्यात आले. त्याला कुप्रसिद्ध टॉवर ऑफ लंडन येथे कैदेत टाकण्यात आले; पण यामुळे उलट वॉल्पोलचे व्हिग पक्षातील स्थान अधिकच उंचावले व त्याची लोकप्रियता इतकी वाढली, की त्याच्यावर कवनेही रचली गेली.
पहिला जॉर्ज (कार.१७१४-१७२७) याने सत्ताग्रहण करताच टोरी पक्षाचे वर्चस्व असलेले संसद बरखास्त करून व्हिग पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. वॉल्पोलला ब्रिटिश सैन्याचा प्रमुख आर्थिक अधिकारी (पेमास्टर जनरल ऑफ द फोर्सेस) व गुप्त समितीचा सभापती म्हणून नेमले. वॉल्पोलने प्रथमतः त्याचे टोरी विरोधक रॉबर्ट हर्ले व हेन्री बॉलिंगब्रुक यांना अनुक्रमे तुरुंगात टाकणे आणि पळून जाण्यास भाग पाडले (१७१४).
यानंतर वॉल्पोलची अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाली (१७१५); तथापि वॉल्पोल आणि त्याचा मेहुणा चार्लस टाऊनझेंड यांचा जेम्स स्टॅनहोप व चार्ल्स स्पेन्सर या पहिल्या जॉर्जच्या प्रमुख सल्लागारांशी प्रामुख्याने परराष्ट्रीय धोरणाबद्दल विरोध सुरू झाला.
ब्रिटनच्या हितसंबंधापेक्षा हॅनोव्हरच्या हितसंबंधाकडे जास्त लक्ष देणाऱ्या पहिल्या जॉर्जच्या धोरणावर टीका करून वॉल्पोल आणि टाऊनझेंड मंत्रिमंडळातून बाहेर पडले. पुढे तीन वर्षे वॉल्पोलने ब्रिटिश शासनावर सतत टीका केली. पहिल्या जॉर्जच्या मुलाबरोबर (भावी दुसरा जॉर्ज) आणि विशेषतः त्याची पत्नी कॅरोलीनशी मैत्री साधून त्याने एप्रिल १७२० मध्ये जॉर्जशी जुळते घेतले. तो पुन्हा ब्रिटिश सैन्याचा प्रमुख अधिकारी बनला.
साउथ सी कंपनीचे एक मोठे प्रकरण यावेळी निर्माण झाले होते. त्याच्या अनुचित परिणामांपासून वॉल्पालने व्हिग पक्षाचे रक्षण केले (१७२०). पुढील वर्षी तो पुन्हा ब्रिटनचा अर्थमंत्री बनला (१७२१). वॉल्पोल आणि त्याचा मेहुणा टाऊनझेंड यांचे शासनावर प्रभुत्व होते. दुसरा जॉर्ज (कार. १७२७-६०) याच्या वेळी त्याने टाऊनझेंड याच्यावर कुरघोडी करून त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले (१७३०). या कालखंडामध्ये परराष्ट्रीय प्रश्नावरून वॉल्पोलला बराच त्रास झाला.
हॅनोव्हरच्या १७२५ च्या तहाने फ्रान्सबरोबर मैत्री निर्माण झाली होती; पण स्पेनशी आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल मतभेद होते. या मतभेदातून निर्माण झालेल्या युद्धाच्या वातावरणात वॉल्पोलने तडजोड करून बदल केला आणि स्पेनशी १७२९ मध्ये सेव्हिलचा तह केला. जेव्हा यूरोपात पोलिश प्रश्नावरून युद्ध भडकले (१७३३), तेव्हा वॉल्पोलने दुसऱ्या जॉर्जला तटस्थता स्वीकारण्यास प्रवृत्त केले.
वॉल्पोलच्या या परराष्ट्रीय धोरणामधून त्याला अंतर्गत राजकीय विरोधक निर्माण झाले आणि त्यांनी वृत्तपत्रे इ. प्रसिद्धी माध्यमांतून वॉल्पोलवर घणाघाती टीका केली. वॉल्पोलने दारू आणि तंबाखूवर आयात कर लादला (१७३३), तेव्हा त्याच्या राजकीय विरोधकांनी त्याचे भांडवल केले; पण हा कर मागे घेऊन वॉल्पोलने विरोध शमविला आणि काही व्हिग पक्षातील विरोधी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. यामुळे वॉल्पोलला पक्षांतर्गत विरोध वाढू लागला.
तो १७३४ च्या निवडणुकीत जरी विजयी झाला, तरी त्याचे मताधिक्य घटले गेले. राष्ट्रीय कर्जावरील व्याजदर कमी करण्यास त्याने विरोध दर्शविला. जॉनाथन स्विफ्ट, अलेक्झांडर पोप आणि हेन्री फील्डिंग हे ब्रिटिश साहित्यिकही त्याचे विरोधक बनले. त्यामुळे त्याने लंडनमधील नाट्यगृहांवर निर्बंध लादले. तेव्हा राजपुत्र जॉर्ज विल्यम फ्रेडरिकशी (भावी राजा तिसरा जॉर्ज) संधान बांधून व्हिग पक्षातील विल्यम पिटसारखे तरुण नेते वॉल्पोलला अप्रत्यक्ष विरोध करू लागले.
वॉल्पोलला १७३९ मध्ये स्पेनशी युद्ध पुकारावे लागले. सुरुवातीस इंग्लंडला फारसे यश मिळाले नाही. १७४१ च्या निवडणुका व्हिग पक्षाने जिंकल्या, तरीसुद्धा वॉल्पोलला पक्षांतर्गत विरोध होतच राहिला. अखेर २ फेब्रुवारी १७४२ रोजी त्याने राजीनामा दिला. दुसऱ्या जॉर्जने त्याला ऑरफर्डचा सरदार (अर्ल ऑफ ऑरफर्ड) केले आणि वार्षिक चार हजार पौंडांची पेन्शन सुरू केली; तथापि हाउस ऑफ कॉमन्सने त्याच्या चौकशीची तयारी सुरू केली; पण पुराव्याअभावी ती दप्तर दाखल झाली. दुसऱ्या जॉर्जशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळेच पुढेही तो सक्रिय राजकारणात राहिला.
वॉल्पोलला ब्रिटनचा पहिला पंतप्रधान म्हटले जाते; परंतु तत्कालीन राजकीय स्थितीत विचार करता हे वर्णन वास्तव नाही. स्वतः वॉल्पोलला पंतप्रधान म्हणवून घेणेही आवडत नसे. कारण तत्कालीन प्रस्थापित घटनात्मक पद्धतीत त्याने कोणताही बदल केला नाही.
राजाची मर्जी हाच मंत्रिमंडळातील स्थानासाठी सर्वस्वी महत्त्वाचा निकष होता आणि तोच निकष वॉल्पोलच्या कालावधीत व नंतरही काही वर्षे चालूच राहिला. त्यावेळी वॉल्पालच्या कार्यापेक्षाही पहिल्या दोन जर्मन भाषिक हॅनोव्हर राजांना (पहिला आणि दुसरा जॉर्ज) इंग्लिश भाषा न येणे हे मंत्रिमंडळाच्या वाढीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरले. संसदीय लोकशाहीची दोन महत्तवाची मूलतत्त्वे-सामूहिक नेतृत्व आणि संसदेला जबाबदार-या काळात पूर्णपणे प्रस्थापित झालेली नव्हती.
या मर्यादांमध्ये आणि कोणताही घटनात्मक बदल न करता राजकीय कृती कशी करता येईल आणि संसदीय नेत्याचे धोरण कसे असावे, याचा आदर्श त्याने स्वतःच्या उदाहरणावरून घालून दिला हीच त्याची सर्वांत महत्त्वाची कामगिरी होय.
इंग्लंडच्या आर्थिक प्रगतीसाठी परराष्ट्रांशी सलोखा आणि देशांतर्गत आर्थिक स्थैर्य हे त्याच्या प्रशासनाचे प्रमुख सूत्र होते. त्याने इंग्लंडमधील व्यापारी आणि जमीनदारवर्गाचे हितसंबंध जपले तसेच राष्ट्रीय कर्ज, जमिनीवरील आणि आयात निर्यातीवरील कर कमी करून व्यापार-उद्योग यांना प्रोत्साहन दिले.
कुशल व कार्यक्षम प्रशासक, प्रभावी वक्ता, ब्रिटिश माणसांची नस जाणणारा, कलाप्रेमी व कलात्मक वस्तूंचा संग्रह करणारा असे त्याचे बहुपैलू व्यक्तिमत्त्व होते. आर्थिक देवघेवीच्या अनेक व्यवहारांतून त्याने अमाप संपत्ती मिळविली आणि ती ऐषआरामात राहण्यासाठी स्वैर खर्चही केली.
संदर्भ : 1. Dickinson, H. T. Walpole and The Whig Supremacy, London, 1973.
2. Plumb, J. H. Sir Robert Walpole, 3 Vols., London, 1973.
3. Plumb, J. H. The Growth of Political Stability in England:1675-1725, London, 1967.
4. Sedgwick, Romney, Ed. The House of Commons:1715-1754, 2 Vols, London, 1970.
कदम, व. शं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/18/2020
एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त...
स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ. ज...
बेल्जियम संसदपटू, आंतरराष्ट्रीय कायद्याचा ख्यातना...
फॉक्स, चार्ल्स जेम्स : (२४ जानेवारी १७४९ – १३ सप्ट...