लाफाँतेन आंरी-मरी : (२२ एप्रिल १८५४–१४ मे १९४३). बेल्जियम संसदपटू, आंतरराष्ट्रीय कायद्याचा ख्यातनाम विधिज्ञ आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी.जन्म ब्रूसेल्स येथे. ब्रूसेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन त्याने वकिलीस प्रारंभ केला (१८७७). या व्यवसायात त्याला कीर्ती आणि पैसा दोन्ही मिळाले. पुढे त्याची ब्रूसेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विधीचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८९३). दोन वर्षांनंतर तो समाजवादी पक्षातर्फे संसदेवर (सीनेटवर) निवडून आला (१८९५). पुढे सीनेटचे उपाध्यक्षपदही त्यास मिळाले (१९१९–१९३२). त्यानंतर लवाद मंडळासाठी नेमलेल्या बेल्जियम संघावर त्याची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. तो तात्काळ आंतरसंसदीय संघटनेत सक्रिय सहभागी झाला. पुढे लवाद मंडळाच्या अध्यक्षपदावर त्याची नेमणूक झाली.शांतता संघाशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. त्याने द हेग येथे १८९९ व १९०७ मध्ये दोन शांतता परिषदा भरविल्या. पूर्वसूरींप्रमाणे त्याने केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतून जागतिक शांततेचा पुरस्कार न करता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आणि शांततेसाठी झटणाऱ्या संघटनांना कार्यान्वित केले. फ्रिद्रिक बायरनंतर त्याची बर्न येथील आंतरराष्ट्रीय शांतता संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली (१९०७–४३). या पदावर तो अखेरपर्यंत होता. त्याने पॅरिस शांतता तहात (१९१९) आणि राष्ट्रसंघाच्या समितीवर (१९२०–३१). बेल्जियमचा प्रतिनिधी म्हणून काम केले.
आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी त्याने ‘सेंटर इन्टिलेक्ट्युअल मॉन्डियल’ नावाची संस्था स्थापन केली. पुढे ती राष्ट्रसंघात विलीन झाली. या संस्थेच्या धर्तीवर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल लायब्ररी अशा अनेक संस्था कार्यान्वित व्हाव्यात, अशी त्याची कल्पना होती. ‘इंटरनॅशनल द बिब्लिऑग्रफी’ (ब्रूसेल्स) ही संस्था म्हणजे त्याच्या कामाचे चिरंतन स्मारक होय. तिचा उद्देश नियतकालिके आणि प्रकाशित ग्रंथ यांची संदर्भसूची करून ते साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा होता. यासाठी पॅसिक्रीसी इंटरनॅशनल हा ग्रंथ लिहून त्याने या क्षेत्रात मौलिक भर घातली (१९०२). या पुस्तकात १७९४ ते १९०० दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय लवाद मंडळापुढे आलेल्या खटल्यांचे इतिवृत्त त्याने संगतवार प्रसिद्ध केले. पुढे त्याने हवाई युद्धाविरोधी जनमत प्रक्षुब्ध करण्याची मोहीम काढली. त्याच्या या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे त्याला जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक (१९१३) देऊन त्याचा गौरव करण्यात आला. या पुस्तकाव्यतिरिक्त त्याने ग्रेट सोलूशन (१९१६) आणि बिब्लिऑग्रफी पीस अँड आर्बिट्रेशन ही आणखी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली. सतत वैर असणाऱ्या फ्रान्स व जर्मनी या दोन देशांत त्याने मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ला व्हाय इंटरनॅशनल या मासिकाचा तो संस्थापक-संपादक होता. त्याचे बहुतेक जीवन शांततेच्या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यात व्यतीत झाले. ब्रूसेल्स येथे तो मरण पावला.
संदर्भ : 1. Schuck, H. and others, Nobel : The man and His Prize, New York, 1962.
२. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.
लेखक - शेख रुक्साना
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/2/2020
वॉल्पोल, सर रॉबर्ट : (२६ ऑगस्ट १६७६-१८ मार्च १७४५)...
फॉक्स, चार्ल्स जेम्स : (२४ जानेवारी १७४९ – १३ सप्ट...
स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ. ज...
एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू. पहिले लोकनियुक्त...