অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बॅस्तील

बॅस्तील

बॅस्तील पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला. बॅस्तील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली. पाचव्या चार्ल्सच्या राजवाड्याच्या संरक्षणार्थ ती करण्यात आली. या आयताकृती किल्ल्याला २३ मी. उंचीचे आठ बुरूज असून ते सलग भिंतीने जोडलेले होते. किल्ल्याच्या सभोवती रुंद खंदक होता. फ्रान्सचा शासकीय तुरुंग म्हणून याची प्रसिद्धी होती.

तेथे राजकीय व संकीर्ण स्वरुपाचे गुन्हेगार कैदी म्हणून ठेवीत. सोळाव्या शतकापर्यंत त्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग केला जाई. त्यानंतर १६२० पासून फ्रान्सचा पंतप्रधान आर्मां झां रीशल्य याने त्याचा कारागृह म्हणून प्रथम वापर करण्यास सुरुवात केली. सुमारे ४० कैदी येथे असत. त्यांचा येथे अनन्वित छळ केला जाई. राजाच्या विरोधकांची न्यायालयीन चौकशी न करता त्यांच्या कारवासाची मुदत राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. येथे जप्त केलेली पुस्तकेही आणून ठेवीत. या किल्ल्याच्या व्यवस्थापनास फार खर्च येऊ लागला; म्हणून तो पाडण्यात यावा, अशा प्रकारचे विचारही १७८४ मध्ये प्रसृत झाले.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात बॅस्तील हे अनियंत्रित राज्यसत्तेच्या अन्यायाचे व जुलमाचे प्रतीक मानले गेले. जुलै १७८९ च्या सुरुवातीस १६ व्या लूईने राष्ट्रीय सभा (नॅशनल असेंब्ली) नेस्तनाबूत करण्यासाठी पॅरिसच्या आसपास लष्कराची जमवाजमव सुरू केली, तेव्हा राष्ट्रीय सभेने त्याला लष्कर मागे घेण्यास सांगितले; पण लुईने ह्या कृतीस नकार दिला व त्या वेळचा लोकप्रिय झालेला अर्थमंत्री झाक नेकेर यास बडतर्फ केले (१७८१).

राजाच्या बेमुर्वतपणामुळे चिडून जाऊन कॅमिल देमुलच्या नेतृत्वाखाली जनतेने जोराचा उठाव केला व केला व १४ जुलै १७८९ रोजी तेथील कैदी सोडविण्यासाठी व युद्धसामग्री हस्तगत करण्यासाठी बॅस्तीलच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी व राज्यपाल बेरनार रने झॉरदां लोनो याच्या मदतीस यावेळी फक्त १३० फ्रेंच सैनिक होते. त्यास पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा तेथे नव्हता. थोड्याशा प्रतिकारानंतर दुपारच्या सुमारास लोनोने किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात दिला. क्रांतिकारकांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर तुरुंग फोडून तेथील कैद्यांस मुक्त केले आणि किल्ल्याच्या मोडतोडीस प्रारंभ केला. त्या वेळी आत फक्त सात कैदी होते. प्रक्षुब्ध जमावाने लोनोचा बळी घेतला.

बॅस्तीलचा पाडाव हा लष्करी दृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला, तरी त्याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. यामुळे क्रांतीकारकांना लुईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळाला. लोकांचा लूईबद्दलचा आदर कमी झाला. बॅस्तीलच्या पाडावामुळे पॅरिसच्या जनतेत स्वसामर्थ्याची प्रखर जाणीव झाली.

बॅस्तीलचा किल्ला पुढे संपूर्णपणे पाडण्यात येऊन त्या जागी १७८९ व १८३० मध्ये झालेल्या क्रांत्यांमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक ब्राँझचा स्तंभ उभारण्यात आला. पुढे १४ जुलै हा बॅस्तीलदिन म्हणून राष्ट्रीय सुटीचा दिवस जाहीर करण्यात आला (१८८०). तो दिवस मिरवणुका, भाषणे, नृत्य इत्यादींनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

 

पोतनीस, चं. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate