महाराष्ट्रातील शिवकालीन एक प्रसिद्ध किल्ला. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ तालुक्यात, कोल्हापूरच्या नैऋत्येस सु. ७८ किमी. वर सह्याद्रीच्या पर्वतरांगांत आहे.
याची उंची सस. सु. ८०० मी. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. त्याची लांबी १,६०० मी. असून रुंदी ९०० मी. आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूने या किल्ल्यावर जाता येते. यास कोल्हापूर, पाटगाव,तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा मार्ग बंद पडतो. चिक्केवाडीहून रांगण्यास प्रायः चढ नाही.
उलट सु. ७ मी. उतरल्यावर किल्ल्याचा माथा येतो. त्याचा तट अनघड दगडांनी बांधलेला होता. किल्ल्याला पूर्वेकडून एकामागून एक तीन दरवाजे व पश्चिमेस एक दरवाजा आहे. पाण्यासाठी माथ्यावर एक तलाव व दोन विहिरी आहेत. गडावर रांगणाई (महिषमर्दिनी), मारुती, महादेव यांची देवालये असून एका वाड्याचे जुने अवशेषही तेथे दिसतात.
रांगणाईसमोर एक पडझड झालेली दीपमाळ आहे. शिवाजीनी पन्हाळ्याप्रमाणे हा किल्लाही १६५९ मध्ये हस्तगत करून त्याची डागडुजी केली. छ. शाहूंबरोबरच्या युद्धात महाराणी ताराबाईंनी याचा आश्रय घेतला होता (१७०९). १८४४ मधील कोल्हापूरच्या बंडानंतर इंग्रजांनी ह्या किल्ल्याची तटबंदी पाडून टाकली आणि तो ताब्यात घेतला. प्रसिद्धगड म्हणूनही तो ओळखला जातो.
संदर्भ : घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! पुणे, १९८५.
खरेग. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2020
प्रचंडगड : (तोरणा). शिवकालीन एक डोंगरी किल्ला. तोर...
सुंदर मठ,रामदास पठार,शिवथर घळ
महाराष्ट्रातील शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल...
बॅस्तील : पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच...