অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खेळ

खेळ

मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातही अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते.

आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्त, चीन, जपान इ. देशांतही सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळे, शतरंज यांसारखे खेळ फार पुरातनकाळापासून रूढ होते.

खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावयास लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीही वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो. खेळातील चढाओढीमुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्राराष्ट्रांतील क्रीडास्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यही वाढीस लागते.

खेळांचे निरनिराळ्या दृष्टीकोनांतून अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रमुख प्रकार पडतात. बैठे खेळ म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ. उदा., पत्त्यांचे खेळ, बुद्धिबळे, गंजीफा, सोंगट्या, फाशांचे खेळ, कॅरम इत्यादी. मैदानी खेळांतही छोटे मैदानी खेळ व मोठे मैदानी खेळ असे प्रकार असतात. छोट्या मैदाना खेळांना (कोर्ट गेम्स) छोटी बंदिस्त जागा व आखलेली क्रीडांगणे लागतात. या प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ येतात; तर खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी इ. देशी खेळ येतात. दुसऱ्या प्रकारच्या मैदानी खेळांना मोठी मैदाने लागतात. त्यांत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोलो, बेसबॉल, गोल्फ इ. विदेशी खेळ मोडतात. यांशिवाय क्षेत्रीय शर्यतींचे खेळ असतात. त्यांत धावण्याचे (१०० मी.,  २०० मी. ते मॅरॅथॉन शर्यतीपर्यंत), फेकण्याचे (गोळाफेक, थाळीफेक इ.), उड्यांचे (लांब उडी, उंच उडी इ.) सर्व प्रकार आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यती (हर्डल्स) यांचा समावेश होतो.२

पोहणे व पाण्यातील खेळ या गटात विविध प्रकारांनी व विविध अंतरे पोहून जाण्याच्या शर्यती, वॉटर-पोलो (पाण्यातील फुटबॉल), उंचीवरून पाण्यात निरनिराळ्या प्रकारच्या उड्या आणि सूर मारणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. द्वंद्वात्मक खेळात वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्या, मुष्टीयुद्ध इत्यादींची गणना होते. शारीरिक कसरतीच्या खेळांत मल्लखांब, आडवा दंड, जोड दंड, उड्यांचे घोडे, टांगत्या कड्या यांसारख्या साधनांच्या आधारे करावयाच्या विविध शारीरिक कसरती व जमिनीवर करावयाच्या उलट्यासुलट्या कोलांट उड्या, हात-पायचक्र (कार्टव्हील) यांसारख्या कसरती येतात. शीत कटिबंधातील देशांत जमिनीवर हिम पडते. तेथे अनेक प्रकारचे बर्फावरील खेळ खेळले जातात. त्यांत अनेक घसरण्याच्या शर्यती (स्केटिंग) व बर्फावरील हॉकी यांसारखे खेळ अंतर्भूत होतात. साहसी व रोमांचकारी खेळांत यंत्रविरहित आकाशयानातून उड्डाण करणे (ग्लायडिंग), मोटारसायकलींच्या शर्यती, मोटार-शर्यती इ. येतात. मानवाच्या धाडसी प्रवृत्तीला अशा खेळांमुळे आव्हान मिळते. या क्रीडाप्रकारांप्रमाणे पाण्यातील खेळ व शर्यतीही मानवाची साहसी वृत्ती वाढवितात. त्यांत नौकांच्या आणि शीडजहाजांच्या शर्यतींचा समावेश होतो.

खेळणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळे आबालवृद्धापर्यंत विविध वयोमानांच्या गटांना उपयुक्त, सोयीस्कर व योग्य असे खेळ त्या त्या गटातील व्यक्ती खेळत असतात. विविध खेळण्यांच्या रूपाने छोट्या बालकांसाठी खास खेळ बालमानसशास्त्रज्ञांनी तयार केले आहेत. गोट्या, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, लगोऱ्यायांसारखे लहान मुलांचे खेळ स्वस्त व सहज उपलब्ध होणारे असतात. पतंग उडविण्याच्या खेळात लहान मुलापासून ते तरुणापर्यंत सर्वजण सहभागी होतात. पतंगाच्या काटाकाटीचा खेळही चांगला रंगतो. मोठ्या मुलांचे खेळ म्हणजे कबड्डी, खोखो, आट्यापाट्या इ. देशी खेळ व क्रिकेट, हॉकी, फुटबॉल इ. विदेशी खेळ होत. हेच खेळ तरुण मुले व प्रौढ माणसेही खेळतात.

मुलींचे व स्त्रियांचे स्वतंत्र असे अनेक खेळ आहेत. आपल्याकडे मुली व स्त्रिया फुगडी, झिम्मा, लंगडी यांसारखे खेळ खेळतातच, परंतु अलीकडे पुरुषांच्याप्रमाणे त्या खोखो, कबड्डी, बॅटमिंटन, टेबल टेनिस, हॉकी यांसारखे खेळही खेळू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे पुरुषांच्या बरोबरीने मैदानी शर्यतीतील काही शर्यतीतही भाग घेऊ लागल्या आहेत. उदा., धावण्याच्या शर्यती, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक इ. शारीरिक कसरती व पोहण्याच्या शर्यती यांतही त्या भाग घेतात.

खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून वैयक्तिक व सांघिक असे त्यांचे दोन गट पडतात. वैयक्तिक खेळांत खेळाडूंचे व्यक्तिमत्व व वैयक्तिक कौशल्य पणास लागते. चिकाटी, दमदारपणा, क्रीडाकौशल्य, खिलाडू वृत्ती या गुणांना त्यांत वाव मिळतो व त्यांचा विकास होतो. टेनिस, बॅटमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, मुष्टीयुद्ध व सर्व प्रकारच्या वैयक्तिक मैदानी शर्यती वैयक्तिक खेळांच्या प्रकारात येतात. सांघिक खेळांत अनेक खेळाडूंचा एक संघ दुसऱ्या संघाशी सामना खेळतो. अशा सांघिक खेळात सांघिक भावना, सहकार्य, नेतृत्व यांसारख्या गुणांना वाव मिळून त्यांचा विकास होतो. असे सांघिक खेळ अनेक प्रकारचे आहेत. त्यांत क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी हे खेळ प्रामुख्याने येतात.

खेळांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की प्रत्यक्ष खेळाडू जसा त्यात रंगतो, तसेच तो खेळ पाहणारे असंख्य प्रेक्षकही त्यात रंगून जातात. इंग्लंड-अमेरिकेमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या फुटबॉलचे सामने प्रचंड मोठ्या प्रेक्षागारात होतात. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज इ. देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या कसोटी सामन्यांसाठी हजारो प्रेक्षक गर्दी करतात.

निरनिराळ्या खेळांतील कौशल्य, प्रावीण्य व श्रेष्ठता अजमावण्यासाठी खेळांच्या स्पर्धा, सामने व शर्यती विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जातात. या स्पर्धांना खेळीमेळीचे स्वरूप असते आणि यशस्वी खेळाडूंना पारितोषिके व पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. प्राचीन काळी ऑलिंपिक क्रीडासामन्यांत अनेक प्रकारचे सामने होत. गेल्या शतकाच्या मध्यापासून राष्ट्रीय पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे सामने भरविले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑलिंपिक, आशियाई व ब्रिटिश राष्ट्रकुलीय क्रीडासामने प्रसिद्ध आहेत. जागतिक पातळीवर भरणाऱ्या फुटबॉल, हॉकी, बिलियर्डस, बॅडमिंटन,  टेनिस इ. विशिष्ट खेळांच्या सामन्यांत, अनेक देशांतील नामवंत खेळाडू भाग घेतात.

‘जीवन हे एक क्रीडांगण आहे ’. त्यात परिस्थितीनुसार मानवाने आपला भाग खिलाडूवृत्तीने खेळावा आणि तो खेळत असताना अडीअडचणी, आपत्ती, सुखदुःखे व जयापजय यांना हसतमुखाने तोंड देणे योग्य असते. खेळामुळे अशी वृत्ती निर्माण होते. खेळाडूंच्या अंगी खिलाडूवृत्ती, सहकार्य, संघभावना, समंजसपणा, पराजय पतकरण्याचा दिलदारपणा इ. गुणांची जोपासना होते. तसेच खेळामुळे आत्मसंयमन, प्रसंगावधान, नेतृत्व, धाडसी वृत्ती यांचा विकास घडून येतो व आपली कौशल्ये दाखविण्यास वाव मिळतो. मनोरंजनाबरोबरच शरीरास व्यायाम मिळून मन आणि शरीर प्रसन्न वकार्यक्षम बनतात. म्हणूनच खेळांना व्यक्तिगत व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

आधुनिक शिक्षणशास्त्रांतही खेळांचे महत्त्व मान्य झालेले आहे वशैक्षणिक पद्धतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून खेळांकडे पाहिले जाते. खेळांना उत्तेजन देण्यासाठी खास सरकारी, तसेच शालेय आणि विद्यापीठीय संस्था अनेक योजना आखत असतात. उत्कृष्ट खेळाडूंना सरकारी शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. त्यांच्या प्रशिक्षणाचीही देशात वा परदेशांतही सोय केली जाते. विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्थाही क्रीडासामने भरवितात. उत्कृष्ट खेळाडूंना अशा मोठ्या संस्थांतून उत्तम प्रकारच्या नोकऱ्याही मिळू शकतात. अशा प्रकारे आधुनिक काळात खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

लेखक: शा. वि. शहाणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate