অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अश्वारोहण

घोडा हाताळण्याची व स्वार होऊन चालविण्याची कला. अश्वारोहणकलेत घोड्याच्या शरीरगुणांचे व स्वभावगुणांचे यथार्थ ज्ञान गर्भित असते. त्यामुळे अश्व व अश्वारोहक परस्परपूरक घटक बनतात. केवळ घोडेस्वारीत अनेकदा सफाई व साहसीपणा आढळला, तरी अश्वारोहणकला तीहून वेगळी व व्यापक असते.

घोड्यावरील बैठक, अश्वारोहकाची मांड, घोड्याची चाल, अश्वारोहणाची नियंत्रण साधने, त्याच्या शैली व घोड्याचे प्रशिक्षण हे या कलेचे महत्त्वाचे घटक होत. शिवाय या कलेला एक प्रदीर्घ इतिहास आहे व त्यातूनच वरील घटकांचा विकासविस्तार झाल्याचे दिसून येते.

अश्वारोहणाचे उद्दिष्ट, अश्वारोहकाचे घोड्यावरील नियंत्रण व सुरक्षितता आणि घोड्याच्या स्वाभाविक व मोकळ्या हालचाली यांना अनुकूल ठरणारी घोड्यावरील बैठक महत्त्वाची असते. चापल्य, सहजता, मोकळेपण व सुखदता हे चांगल्या बैठकीचे निकष होत. अश्वारोहकाच्या तोलावरही बैठक अवलंबून असते.  तोल साधण्यासाठीच पुष्कळदा पकड वाढवावी लागते. अश्वारोहणाच्या विविध प्रकारांशी ही बैठक जुळवून घेतली जाते.घोड्याच्या चालीवर अश्वारोहकाची मांड अवलंबून असते.

घोड्याच्या पाच प्रकारच्या चाली मानल्या जातात

  1. साधी चाल.
  2. संथ आणि एकेका बाजूच्या दोन्ही पायांची चाल (वॉक).
  3. चारही पायांची तालबद्ध म्हणजे दुडकी चाल (ट्रॉट).
  4. वेगात धावणे (कँटर).
  5. चौखूर पळणे (गॅलप).

यांपैकी पहिल्या दोन चालींत अश्वारोहकाची मांड स्थिर असते; दुडक्या चालीत त्यास किंचित पुढे वाकून मांड उंचवावी लागतो; चौथ्या व पाचव्या चालींत त्यास तोल सावरण्यासाठी पुढे वाकून रिकिबीनर भार द्यावा लागते; या अवस्थेत मांड पूर्णतः अस्थिर बनलेली असते. घोड्याच्या चालीत बदल करण्यासाठी व त्याची दिशा व गती बदलण्यासाठी अश्वारोहकाला आपली मांड अधिक लवचिक राखणे भाग असते.

अश्वारोहणाच्या नैसर्गिक साधनांत लगाम, लगामाचा मुखबंध व त्यांस नियंत्रित करणारे स्वाराचे हात, पाय, शरीरभार व आवाज यांचा समावेश होतो. त्यांशिवाय जीन, रिकीब, चाबूक, नासिकाबंध, जेरबंद, ढापणे ही उपकरणेही गरजेप्रमाणे वापरली जातात. घोड्याची चाल व गती नियंत्रित करण्यासाठी संदेशवाहक म्हणून वरील साधनांचा स्वारास उपयोग होतो. स्वाराचे संदेश सजमण्यासाठी घोड्याला अर्थातच प्रशिक्षण द्यावे लागते.

अश्वारोहणाच्या बैठकीच्या शैली अनेक आहेत. अश्वारोहणाच्या उद्दिष्टावर अशा शैलींचे स्वरूप अवलंबून असते. अभिजात किंवा 'अ‍ॅकॅडेमिक' शैली प्राथमिक अश्वप्रशिक्षणात वापरली जाते. पुरस्सर शैलीलाच पुष्कळदा 'लष्करी', 'शिकारीची', 'उड्डाणाची' किंवा 'समतोल शैली' असेही म्हणतात. यांशिवाय 'स्टॉक सॅडल', 'सॅडल हॉर्स' किंवा 'शो रिंग', 'प्लॅट रेसिंग', 'स्टीपल चेझ', 'साइड सॅडल', 'बेअर-बॅक' इ. अश्वारोहण-शैली स्वारांच्या उद्दिष्टांनुसार रूढ झालेल्या आढळतात. अश्वारोहणाच्या शैलीवर परिणाम करणाऱ्या इतर गोष्टींत अश्वाचे

जातिविशेष, अश्वारोहकाची आर्थिक स्थिती व हौस, अश्वारोहणाच्या प्रशिक्षण-संस्था, लष्करी परंपरा, लष्करी नीती तसेच अश्वारोहणाच्या स्पर्धा यांचा अंतर्भाव होतो.अश्वारोहणकलेचे प्रशिक्षण दुहेरी असते; म्हणजे अन्न व अश्वारोहक या दोहोंसही प्रशिक्षणाची गरज असते. घोड्याच्या प्राथमिक प्रशिक्षणात (ड्रेसेज) तोल, चपलता व आज्ञाग्रहण अंतर्भूत होते. पुढील उच्च प्रशिक्षण (ग्रॅड ड्रेसेज) महत्त्वाचे असून त्याच्या पहिल्या विभागात (कॉम्पान्य) अश्वारोहणाच्या साधनांच्या संदर्भात घोड्याला प्रशिक्षण दिले जाते. दुसऱ्या विभागात (ओत-एकोल) घोड्याच्या हालचाली, चाली व गती यांचा पूर्ण विकास साधला जातो. उड्डाणाचेही विविध प्रकार त्यास शिकविले जातात. अश्वारोहकालाही वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.

अश्वारोहणकलेला प्रदीर्घ इतिहास आहे. प्राचीन काळापासून दळण-वळण, शिकार, युद्ध, मनोरंजन,व्यायाम व क्रीडा यांसाठी घोड्याचा उपयोग केला जात आहे. अश्वारोहणाचा उपलब्ध प्राचीनतम पुरावा‘हिटाइट्स’ च्या कोरीव दगडी चिपांवर आढळतो (इ.स.पू. सु. १४००). ईजिप्शियन, अ‍ॅसिरियन, ग्रीक,चिनी, अरबी, इराणी, मंगोल इ. लोकांची अश्वारोहणकला उच्च दर्जाची होती. झेनोफनच्या हिपिकी  (इ.स.पू. सु. ४००) या ग्रीक ग्रंथात या कलेचे आजही उपयुक्त ठरणारे विवेचन आढळते. रिकीब व जीन यांचा वापर इ. सनाच्या चौथ्या शतकात रूढ झाला. तत्पूर्वीच्या प्राचीन काळात पुष्कळदा घोड्यावर उपलाणी बसत व लगामही वापरीत नसत. कदाचित त्यामुळे धनुष्यबाणासारखी शस्त्रे हाताळणे स्वारास सोयीचे होत असावे. चिलखतादी साधनांचा भार कमी असल्याने, अरब, मोगल व इराणी स्वार आखूड रिकीब वापरत.

पाश्चात्त्य मध्ययुग शिलेदारीचे असले, तरी अश्वारोहणकलेची फारशी प्रगती त्या युगात झाली नाही. अँडलूझीयामधील (स्पेन) अरबांच्या प्रवेशामुळे (८ वे शतक) पाश्चात्त्य अश्वारोहणकलेत बदल घडून आला. इब्‍न हुदायल या अरबी लेखकाचा अश्वविद्येवरील ग्रंथ (१५ वे शतक) उल्लेखनीय आहे. इटलीतील सी. बी. पिन्यातेलीची अश्वारोहणाची अकादमी (१६ वे शतक), व्हिएन्नाचे 'स्पॅनिश रायडिंग स्कूल' (१५७२) व फ्रान्समधील सोम्यूरची प्रशिक्षणसंस्था यांचा प्रभाव पाश्चात्त्य अश्वारोहणकलेतिहासात मोठा मानला जातो. त्याचप्रमाणे जर्मनीतील जी. ई. लोह्‌नीसन (१५८८), इंग्‍लंडमधील विल्यम,ड्यूक ऑफ न्यू कॅसल (१६५८) आणि फ्रान्समधील ग्युएरिनिएर (१७३३) यांची अश्वारोहणासंबंधीची ग्रंथनिर्मितीही महत्त्वाची मानली जाते. इंग्‍लंड व आयर्लंडमधील शिकाऱ्यांनी उड्डाणात मागे भार देणारी बैठक रूढ केली.  विसाव्या शतकात काप्रिली या इटालियन अभ्यासकाने पुरस्सर बैठकीचे तत्त्व मांडले. टॉड स्लोन या अमेरिकन जॉकीने आत्यंतिक पुरस्सर बैठकीची शैली रूढ केली.

भारतात वैदिक काळात रथ असले, तरी आर्यांचे अश्वारोहणविषयक उल्लेख आढळत नाहीत. युद्ध वदळणवळण यांसाठी घोड्यांचा उपयोग केला जात असेकौटिलीय अर्थशास्त्राच्या (इ.स.पू. सु. ४ थे शतक)'अश्वाध्यक्ष' या अध्यायात (२.३०) अश्वविद्येसंबंधी व‘सांग्रामिकम्‌’ या दहाव्या अधिकरणाच्या चौथ्या व पाचव्या अध्यायांत लष्करी घोडदळाची माहिती आढळते. महाराज श्रीभोजाच्या युक्तिकल्पतरु (१०६५) या ग्रंथातील 'अश्वपरीक्षा' प्रकरणात विस्तृत विवेचन आहे.

अश्वारोहण-कलेशी संबंधित असे काही खेळ प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी १९१२ पासून आंलिंपिक क्रीडासामन्यांत अंतर्भूत केलेले अश्वोड्डाण खेळ (इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्‌स) प्रसिद्ध आहेत. अश्वारोहकाने घोड्याला लांब पळवत न्यावयाचे व निरनिराळ्या प्रकारच्या अडथळ्यांवरून उड्डाण करीत आपले कौशल्य प्रकट करावयाचे, असे या खेळांचे स्वरूप आहे. अडथळ्यांवरून उडी मारताना काही चुका झाल्या, तर त्याबद्दल विशिष्ट गुण काटण्यात येतात. ज्या स्वाराचे कमीत कमी गुण कापले जातील, तो विजयी ठरतो. इ.स.पू. १४०० पासून हा खेळ खेळला जातो, असा दाखला सापडतो.

१८८६ मध्ये पॅरिसला अश्वोड्डाणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. अ‍ॅलिंपिक क्रीडासामन्यांत, या खेळाचे 'ग्रॅड प्रिक्स जंपिंग', ‘ग्रँड प्रिक्स ड्रेसेज’ व ‘थ्री-डे-इव्हेंटहे प्रकार अंतर्भूत आहेत.‘फेडरेशन इक्वेस्ट्री इंटरनॅशनल’ ही आंतरराष्ट्रीय संस्था या खेळाचे नियंत्रण करते. यूरोपीय राष्ट्रे,ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अर्जेटिना, मेक्सिको वगैरे ठिकाणी हा खेळ खेळला जातो.याशिवाय पोलो, घोड्यांच्या शर्यती (रेसेस), अमेरिकेतील काऊबॉय यांच्या अश्वक्रीडा (रोदेओ), सर्कशीतील घोड्यांची कौशल्याची कामे इ. खेळही अश्वारोहण-कलेशी संबंधित आहेत.

लेखक: बाळ ज. पंडित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate