অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तारकासमूह

तारकासमूह

इ. स. पूर्व साधारण ४००० वर्षे अगोदर 'मेसोपोटामिअन' ( Mesopotamian) संस्कृतीमध्ये तारकासमुहांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर 'ऍराटस' ( Aratus) या ग्रीक कवीच्या 'फेनोमेना' ( Phaenomena) या संग्रहात साधारण ४४ तारकासमुहांचा उल्लेख आढळला. त्यानंतर इ. स. १५० मध्ये ग्रीक खगोलशास्त्रज्ञ व गणिती 'क्लाउडिअस टॉलेमी' ( Claudius Ptolemy) याने त्याच्या 'अल्माजेस्ट' ( Almagest) या ग्रंथामध्ये ४८ तारकासमुहांची नोंद केलेली आढळते. या नोंदी त्याने स्वतः केलेले निरीक्षण आणि इ. स. पूर्व ८ मधील 'बॅबेलोनिया' संस्कृतीने केलेल्या नोंदींचा अभ्यास केला.

टॉलेमीने सांगितलेल्या तारकासमुहांमध्ये उत्तर गोलार्धात २१, ग्रीक संस्कृतीमधील १२ राशी व दक्षिण गोलार्धातील १५ अशा एकूण ४८ तारकासमुहांची नोंद केलेली आढळते.

टॉलेमीने नोंदलेल्या तारकासमुहांमध्ये खालील समूहांची नोंद आढळते.

उत्तर गोलार्धातील २१ समूह - देवयानी, गरूड, सारथी, भुतप, शर्मिष्ठा, वृषपर्वा, उत्तरमुकुट, हंस, धनिष्ठा, कालेय, अश्वमुख, शैरी, स्वरमंडल, भुजंगधारी, महाश्व, ययाती, शर, भुजंग, उत्तर त्रिकोण, सप्तर्षी, ध्रुवमत्स्य.

१२ राशी समूह - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन.

दक्षिण गोलार्धातील १५ समूह - पीठ, नौका, बृहदलुब्धक, लघुलुब्धक, नरतुरंग, तिमिंगल, दक्षिण मुकुट, हस्त, चषक, यमुना, वासुकी, शशक, वृक, मृग, दक्षिण मत्स्य.

टॉलेमीचा अवकाश नकाशा अपूर्ण होता, बहुदा दक्षिण आकाश संपूर्ण पाहता येत नसल्याने त्याने काढलेल्या तारकासमुहांच्या नकाश्यामध्ये काही भाग रिक्त होता.

त्यानंतर जवळपास २०० वर्षांनी सध्या 'उझबेकिस्थान' नावाने ओळखल्या जाणार्‍या 'समरकांड' येथील 'उलुघ बेग' ( Ulugh Beg) या खगोलशास्त्रज्ञाने 'अल्माजेस्ट' मध्ये टॉलेमीच्या चुका सुधारून काही बदल केलेत. त्याने केलेला तक्ता नंतर १६ व्या शतकामध्ये 'टायको ब्राहे' ( Tycho Brahe) याने सुचविलेल्या तारकासमुहांच्या तक्त्यापर्यंत वापरला गेला.

१६ व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत अनेक खगोलशास्त्रज्ञांनी बदल सुचविले आहेत.

शेवटी १९१९ मध्ये निर्माण झालेल्या 'आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थेने' ( International Astronomical Union - IAU) ने अवकाशाच्या गोलाला पद्धतशीर सीमा असलेल्या ८८ तारकासमुहांमध्ये विभागले. अवकाशातील प्रत्येक तारा अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या तारका समूहात येतो. तारकासमुहांची विभागणी करताना अवकाशातील भासमान समूहाचा तसेच त्या समूहापासून दिसणार्‍या काल्पनिक आकाराचा विचार केला गेला.

 

माहिती स्रोत : अवकाशवेध.कॉम

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate