दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 'काय मग? आता पुढे काय?' 'कुठे प्रवेश घेणार?' अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आजकाल तर मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्याची अधिक चिंता असते, पण माहिती असतेच असे नाही. काळाबरोबर वाढत जाणाऱ्या संधी आणि पर्यायाने वाढणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती असणे तसे अवघडच आहे. अशा वेळी अभ्यासक्रमाच्या योग्य निवडीसाठी क्षमता चाचणी किंवा अॅप्टिटय़ूड टेस्टचा पर्याय निवडता येईल.
'अॅप्टिटय़ूड' या शब्दाचा अर्थ नसíगक क्षमता किंवा कल. जे शिक्षण घेताना ते सहज आत्मसात करता येईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग करून अर्थार्जन करता येईल ती क्षमता म्हणजे अॅप्टिटय़ूड. अनेक शाळांमध्ये नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची ही चाचणी घेतली जाते आणि हेच अॅप्टिटय़ूड चाचणी करण्याचे योग्य वय आहे. त्याआधी मुलांची क्षमता तयार होत असते, त्यामुळे फार लवकर चाचणी करून घेतल्यास त्याचा उपयोग करून घेण्याची वेळ येईपर्यंत त्या चाचणीचे निकाल हे रास्त राहतील याची खात्री देणे कठीण आहे.
या चाचणीद्वारे मुलाचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचे आहे, तो अंतर्मुख आहे की खुलेपणाने बोलू शकतो, त्याला समूहामध्ये राहायला आवडते की तो एकटा असेल तर अधिक उत्तम काम करू शकतो हे पारखले जाते. उदा. एखाद्याला मार्केटिंगमध्ये उत्तम गती आहे; परंतु स्वभावाने तो बुजरा आहे तर तो ते काम करू शकेल का? करायचेच असेल तर हा स्वभाव थोडा बदलावा लागेल. त्यासाठी ही चाचणी आवश्यक ठरते.
या चाचणीमध्ये मुलाची आवड कशात आहे ते तपासले जाते. त्याला माणसांमध्ये काम करायला आवडते की यंत्रांमध्ये, लोकांना मदत करायला आवडते की लेखन आवडते, यासारख्या गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. आधी म्हटल्याप्रमाणे माझा गणितात कल असेल, माझा स्वभाव अतिशय चिकित्सक असेल, पण मला जर गणित बघून कंटाळाच येत असेल तर तो मार्ग सुचवणे अयोग्य ठरेल. त्यामुळे कल, स्वभाव आणि आवड यांमधला एकसमान धागा शोधून तो मार्ग निवडणे सर्वात आदर्श ठरते आणि तेव्हाच क्षमता चाचणी परिपूर्ण ठरते.
म्हणजे गणित आवडत नाही, म्हणून क्षमता असून घ्यायचे नाही का? किंवा भिडस्त स्वभावाच्या माणसाला लोकांमध्ये काम करणे जमणारच नाही का? तर तसे नाही. परंतु या तिन्ही गोष्टी माहीत झाल्या तर निवड करणे आणि त्या निवडीवर विचार पक्का केल्यानंतर आवश्यक तो बदल करण्यासाठी मेहनत घेणे हे महत्त्वाचे आहे. या तीन चाचण्यांबरोबरच नवनवी क्षेत्रे, त्याविषयीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम त्या तज्ज्ञाला माहीत असायला हवेत. तरच हा सुवर्णमध्य गाठणे शक्य आहे.
मानसी जोशी
स्त्रोत : लोकसत्ता
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 6/30/2020
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्...
भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे. देशाच्या विकासात य...
दहावी आणी बारावीचे निकाल जवळ आले आहेत. यानंतर खऱ्य...
डीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगन...