भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असेल तर अनुवादक म्हणून करिअरच्या नवनवीन संधी आता उपलब्ध होत आहेत. दोन किंवा अधिक भाषा येत असतील तर विविध क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल. अनुवादक म्हणून आपण उत्तम अर्थाजनही करू शकता इतके स्थैर्य या क्षेत्राला आले आहे. अनुवादाची मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका असते. अनुवाद हा एक सेतू आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृतींना, परंपरांना जोडणारा तो एक धागा आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात सर्व सीमारेषा संपल्या असून भिन्न प्रदेशातील लोक नवनव्या ठिकाणी जाऊन पर्यटनाच्या माध्यमातून तिथल्या समाजाशी नाते जोडू पाहत आहेत. तंत्रज्ञान विस्तारले, दळणवळण सहज सोपे झाले त्यामुळे अनेक घटक परस्पराशी जुळले गेले आहेत. या सर्व बाबी विचारात घेता अनुवादक म्हणून कशा पद्धतीने करिअर करता येईल याचा घेतलेला आढावा.
दहावी बारावी नंतर अनुवादक म्हणून ज्यांना करिअर करायचे आहे त्यांनी भाषेचा बारकाईने अभ्यास करायला हवा. किमान दोन ते तीन भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असते. त्याचबरोबर भाषेचे व्याकरण, भाषेचे सौंदर्य समजून घ्यायला हवे. सध्या भारतात परदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढली आहे. तसेच परदेशातील अनेक कंपन्यांची कामे भारतातून करून द्यावी लागतात त्यांना विविध कामासाठी अनुवादकांची गरज भासते. यासाठी भाषेची उत्तम जाण असलेले अनुवादक हवे असतात. इंग्रजी, फ्रेंच, चिनी, जपानी, स्पॅनिश अशा भाषांची जाण असलेल्या आणि त्याचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांची गरज सध्या मोठ्या प्रमाणात वाढतेय.
करिअरच्या संधी
विविध प्रकाशन संस्थेत, तसेच विदेशी चित्रपटांचे उपशिर्षक बनविण्यासाठी अनुवादकाची आवश्यकता भासते. विविध वर्तमानपत्रातून अनुवादकांना उत्तम संधी उपलब्ध असतात. सध्या इंटरनेटचे युग असल्याने विविध वेबसाईटवर वेगवेगळ्या भाषेत लिखाण करण्यासाठी अनुवादक लागतात. देशात कार्यरत असणाऱ्या पर्यटन कंपन्या, मोठी हॉटेल्स, विविध देशांचे दूतावास, बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेट हाऊसेस यांनाही अनुवादकांची आवश्यकता भासते. भाषेवरील प्रभुत्वासोबत माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य संपादन केले तर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उत्तम संधी मिळू शकते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात अनुवादकाच्या जागा भरल्या जातात. तसेच विविध भाषेतील पुस्तकांचे अनुवाद करण्यासाठी अनुभवी अनुवादक प्रकाशन संस्थेला हवे असतात.
आजकाल इंग्रजीतील अनेक पुस्तके मराठीमध्ये भाषांतरित होत आहेत. त्यामुळे उत्तम काम करणाऱ्यास चांगल्या संधी मिळू शकतात. त्याच बरोबर न्यायालयीन कामकाजासाठीसुद्धा अनुवादकाची गरज भासते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयात तसेच तत्सम कार्यालयांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, अरेबिक, रशियन, चिनी, स्पॅनिश या भाषांमधील अनुवादक हवे असतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना युनायटेड नेशन्स लँग्वेज कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ही द्यावी लागते. ही परीक्षा दर दोन-तीन वर्षांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषांमधील अनुवादक, संपादक, कॉपी प्रिपेरटर्स, व्हर्बाटिम रिपोर्टर्स, संदर्भ मदतनीस, अनुवादक, प्रूफ रीडर्स या पदांसाठी घेतली जाते. याविषयीची माहिती careers.un.org या संकेतस्थळावर मिळू शकेल. ही परीक्षा संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेल्या कोणत्याही राष्ट्रातील नागरिकाला देता येते. ही परीक्षा लेखी आणि तोंडी अशा दोन्ही स्वरूपात घेतली जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषेतील पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्याथ्याला ही परीक्षा देता येते. दिल्लीतील इंडियन नॅशनल सायन्टिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या संस्थेला तांत्रिक विषयातील कागदपत्रांच्या अनुवादकांची गरज भासते.
संबंधित अभ्यासक्रम
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक व जास्तीत जास्त चार वर्षे आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतील अनुवादाचे कौशल्य या अभ्यासक्रमात शिकविले जाते. प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी पत्ता- रीजनल सेंटर, एनसीटी ऑफ दिल्ली, गांधी स्मृती अॅण्ड दर्शन समिती, राजघाट,न्यू दिल्ली- ११०००२,
डिप्लोमा इन कमर्शिअल अॅण्ड टेक्निकल ट्रान्सलेशन अॅण्ड टुरिझम इन जर्मन - हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेन्ट ऑफ जर्मन यांनी सुरू केला आहे. अर्हता- अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन जर्मन लँग्वेज. कलिना कॅम्पसचा पत्ता- रानडे भवन, मुंबई विद्यापीठ, पहिला मजला, कलिना कॅम्पस, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००४८. वेबसाइट-
www.mu.ac.in
पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन - कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स, एसएनडीटी विमेन युनिव्हर्सिटी, पहिला मजला, खोली क्र. १०, पाटकर हॉल बिल्डिंग १, एन.टी. रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०. वेबसाइट-
www.sndt.ac.in एम.ए. इन ट्रान्सलेशन थिअरी अॅण्ड अॅप्लिकेशन - हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केला आहे. पत्ता- सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन संस्कृत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे-४११००७.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन इन हिंदी- कालावधी एक वर्ष. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ हिंदी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे- ४११००७. वेबसाइट-
www.unipune.ac .in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन (हिंदी, इंग्रजी)- हा अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठाने सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. पत्ता- साऊथ कॅम्पस बिल्डिंग, बेनिटो जौरेझ मार्ग, मोती बाग, न्यू दिल्ली- ११००२१. वेबसाइट -
www.south.du.ac.in पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन स्टडीज इन हिंदी. हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादने सुरू केला आहे. पत्ता- युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, प्रो. सी.आर. राव रोड, गाचीबावली, पोस्ट ऑफिस सेन्ट्रल युनिव्हर्सिटी, हैदराबाद- ५०००४६. वेबसाइट-
www.uohyd.ac.in शिवाजी विद्यापीठात रशियन भाषेचा पदव्युत्तर दोन वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पत्ता- शिवाजी विद्यापीठ परिसर, पोस्ट ऑफिसजवळ, विद्यानगर, कोल्हापूर- ४१६००४, वेबसाईट-
www.unishivaji.ac.in एकंदरीत अनुवादक होण्यासाठी भाषेचा बारकाईने अभ्यास, व्यासंग आणि भाषेविषयी सौंदर्यदृष्टी असणे अत्यावश्यक आहे. सतत विस्तारत जाणाऱ्या जागतिकीकरणाच्या रेट्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी भविष्यातही उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी जाणिवपूर्वक या क्षेत्राकडे पाहणे गरजेचे आहे. करिअरच्या अनेक पर्यायांपैकी अनुवादक हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.
लेखक - सचिन पाटील
स्त्रोत - महान्युज