शिक्षण विभागाच्या अंतर्गत विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, नागपूरच्या वतीने नागपूर विभागातील इयत्ता 12 वी विज्ञान व इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येते. मानसशास्त्रीय चाचणी व समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील उचित व्यवसाय व अभ्यासक्रम निवडण्यास हे कार्यालय अतिशय मोलाची मदत करते.
विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा परिसर, काटोल रोड, नागपूर येथे विद्यार्थ्यांना कल चाचणीसाठी नाव नोंदणी करता येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल चाचणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचणी शिबिरासाठी नोंदणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत करता येईल. फेब्रुवारी-मार्च 2017 प्रविष्ठ झालेल्या इयत्ता 12 वी विज्ञान आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता मानसशास्त्रीय चाचणी शिबिर एप्रिल, मे व जून 2017 मध्ये घेण्यात येणार आहे. शासनाच्या कल चाचणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर तसेच सीबीएसई बोर्ड यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत घेऊन नोंदणी करता येते. विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचणी व समुपदेशनाकरिता शासकीय दराने केवळ 200 रुपयाचे शुल्क आकारण्यात येते.
मानसशास्त्रीय चाचणी व समुपदेशनासाठी नोंदणीकृत 50 विद्यार्थ्यांची एक बॅच असते. विद्यार्थी संख्येनुसार अशा 10 बॅचेस घेतल्या जाऊ शकतात. नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी केवळ नागपूरला विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेचे कार्यालय आहे. संपूर्ण नागपूर विभागातील विद्यार्थी या कार्यालयत नाव नोंदणी करतात.
कल चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी, जनरल अॅपट्युटूड टेस्ट, रसशोधन (इंटरेस्ट), समायोजन (ॲडजस्टमेंट) यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. या चारही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येतात. परीक्षेचा निकाल आणि मार्गदर्शनासाठी चार दिवसांनी पालक आणि विद्यार्थी दोघांनाही बोलवतात हे विशेष. या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचा खरा कल, त्यांची आवड आणि सवयी लक्षात येतात. मानसशास्त्रीय चाचणी आणि समुपदेशनाने विद्यार्थ्यांना पुढील व्यवसाय व अभ्यास निवडण्यास अतिशय मोलाची मदत होते. भविष्यात त्यांनी कोणते काम करावे तसेच प्राप्त असलेल्या क्षमता कशा वृद्धिंगत कराव्यात याबाबत मार्गदर्शन देखील मिळते. तसेच विद्यार्थ्यांना आपली क्षमता अधिक विकसित करण्यासाठी कोणती पुस्तके अभ्यासावी, कोणत्या विषयावर अधिक लक्ष केंद्रीत करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
मानसशास्त्रीय चाचणी व समुपदेशन चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची आवड, बुद्धी आणि योग्यता यांचे वैज्ञानिक रितीने आकलन करून विद्यार्थ्यांचा कल तर कळतोच शिवाय पुढे कोणत्या क्षेत्राकडे वळावे हे सुचविल्या जाते. तसेच त्या क्षेत्रासंबंधी विद्यापीठ, महाविद्यालये, संस्था, संबंधित संकेतस्थळे यांची देखील माहिती पुरविल्या जाते.
विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेच्या वतीने नागपूर विभागातील हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांना शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय व समुपदेशन चाचणीचे महत्त्व विशद केल्या जाते. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे यासाठी मार्गदर्शन केल्या जाते. ही योजना शासनाच्या वतीने अत्यंत कमी दरात राबविली जाऊन त्याचे परिणाम अत्यंत अचूक राहतात.
विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक उद्बोधन वर्ग, अधिकारी उद्बोधन वर्ग, व्यवसाय विज्ञान प्रशिक्षण राबविण्यात येत असते. इच्छुक शिक्षंकासाठी समुपदेशन पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. यात इच्छुक असणाऱ्या अनुदानित माध्यमिक शिक्षकांना समुपदेशन पदविका अभ्यासक्रमासाठी मुंबई येथे एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. समुपदेशक प्रशिक्षणासाठी 40 वर्षे वयोगटाच्या आतील शिक्षक/शिक्षिका उमेदवारच नोंदणी करू शकतात. या अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसंबंधी अचूक मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे याबाबी शिकविल्या जातात. नागपूर विभागात एकूण 41 समुपदेशक आहेत.
शासनाच्या मानसशास्त्रीय चाचणीच्या जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आपल्या भविष्यातील व्यवसाय, नोकरी या क्षेत्राकडे डोळसपणे बघावे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या युथ एम्पॉवरमेंट समिट या कार्यक्रमध्ये केले आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घेऊन कल चाचणी सुविधेस प्रतिसाद द्यावा.
लेखक - अपर्णा डांगोरे यावलकर
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2020
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यास...
जागतिक महिला दिनानिमित्त्ा विशेष लेख : अमरावती जि...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित विवाहपूर्व समुपदेशन हि ...