उत्तर ध्रुवापासून सुमारे ७०० उ. पर्यंत पसरलेला बहुतांशी भूवेष्टित जलाशय. क्षेत्रफळ सुमारे १,४२,४४,९३६ चौ. किमी. त्याशिवाय हडसन उपसागराचे व सामुद्रधुनीचे १२,९४,९९४ चौ. किमी.व बेरिंग समुद्राचे २,२६६ चौ. किमी. वेगळेच. या महासागरात आर्क्टिक समुद्र, ग्रीनलंड समुद्र, नॉर्वेजियन समुद्र, बॅरेंट्स समुद्र, कारा समुद्र, लॅपटेव्ह समुद्र, पूर्व सायबीरियन समुद्र, चुकची समुद्र, बोफर्ट समुद्र, बॅफिनचा उपसागर व कॅनडाच्या उत्तरेकडील द्वीपसमूहांच्या दरम्यानच्या फॉक्स बेसिन, हडसन उपसागर, मॅक्क्लिंटॉक चॅनल, लँकेस्टर साउंड इ. जलाशय यांचा समावेश होतो. याच्याभोवती नॉर्वे, रशिया, अलास्का व कॅनडा हे भूप्रदेश आहेत.
ग्रीनलंडच्या पूर्वेकडून ग्रीनलंड समुद्र, नॉर्वेजियन समुद्र व डेन्मार्क सामुद्रधुनी या मार्गाने आणि पश्चिमेकडून बॅफिन उपसागर, डेव्हिस सामुद्रधुनी व लॅब्रॅडॉर समुद्र या मार्गाने तो अटलांटिकशी जोडलेला आहे. काहीवेळा तो अटलांटिकचाच एक भाग मानला जातो. पॅसिफिकशी तो बेरिंग सामुद्रधुनीने जोडला गेलेला आहे.
आर्क्टिक महासागर दीर्घवर्तुळाकार असून त्याच्या मध्यापासून उत्तरध्रुव ८०० किमी. दूर आहे. ७७०४५' उ. १७५० प. येथे त्याची जास्तीत जास्त खोली ५,४४० मी. आढळलेली आहे. उत्तर ध्रुवाच्या आसपास त्याची खोली सुमारे ४,३७४ मी. आहे. सरासरी खोली १,२८० मी. असून बॅरेंट्स, कारा, लॅपटेव्ह, पूर्वसायबीरियन व चुकची या समुद्रांची खोली २०० मी. पर्यंत आहे. ते सभोवतीच्या भूप्रदेशांच्या समुद्रबूड जमिनीवर आहेत.
बोफर्ट समुद्र मात्र ४,६८३ मी. खोल आहे. बॅफिन उपसागर १,९८० मी. खोल असून कॅनडाच्या आर्क्टिक बेटांबेटांमधील पाण्याची खोली ५०० मी. पेक्षा कमी आहे. नॉर्वेच्या व सायबीरियातील कोलीमा नदीच्या उत्तरेस समुद्रबूड जमीन १,१२५ किमी. रुंद आहे; अलास्काच्या उत्तरेस ती १२० ते १७५ किमी. असून कॅनडाच्या आर्क्टिक बेटांच्या उत्तरेस ती जवळजवळ नाहीच. नॉर्वेच्या नॉर्थकेपपासून उत्तर ध्रुवमार्गे अलास्काच्या पॉइंट बॅरोपर्यंत हा महासागर जास्तीत जास्त रुंद आहे.
लोमॉनॉसॉव्ह या सागरी डोंगररांगेमुळे आर्क्टिक समुद्राचे सु. ३,९६० मी. खोलीचे जवळजवळ सारखे दोन भाग झालेले आहेत. ही डोंगररांग न्यूसायबीरियन बेटापासून एल्झमीअर बेटापर्यंत गेलेली आहे. तिची कित्येक शिखरे सागरतळापासून २,७५० मी. पर्यंत उंच गेलेली आहेत. तिला समांतर, काहीशी पश्चिमेस, ध्रुव व एल्झमीअर बेट यांच्या दरम्यान मार्व्हिन रिज् आहे. या सागरी रांगांचे माथे समुद्रपृष्ठाखाली १,००० ते १,३७० मी. खोलीवर आहेत.
ग्रीनलंड समुद्र व नॉर्वेजीयन समुद्र प्रत्येकी सु. ३,००० मी. खोल असून त्यांच्या दरम्यान १,९८० मी. खोलीवर एक सागरी डोंगररांग आहे. ग्रीनलंड समुद्र व आर्क्टिक समुद्र यांच्या दरम्यान सु. १,५०० मी. खोलीवर नान्सेन रिज् आहे. नॉर्वेजियन समुद्राच्या दक्षिणेस स्कॉटलंड ते आइसलँड व पूर्वग्रीनलंड यांच्या दरम्यान जाते. बॅफिन उपसागराच्या दक्षिणेस, ग्रीनलंडच्या पश्चिमेस डेव्हिस सामुद्रधुनी ओलांडून जाणारी डोंगररांग आहे. सु. ६०० मी. खोलीवरील या दक्षिणेकडील डोंगररांगांमुळे आर्क्टिक महासागर व उत्तर अटलांटिक महासागर यांचे खळगे वेगवेगळे झाले आहेत.
आर्क्टिक महासागरात निरनिराळ्या तीन खोलींवर तपमान व क्षारता यांस अनुलक्षून निरनिराळे पाणी आढळते. ९०० मी. खोलीपर्यंतचे आर्क्टिक पाणी हे यूरोप, सायबीरिया व कॅनडा येथील मोठमोठ्या नद्यांच्या पाण्याच्या भरीमुळे कमी क्षारतेचे होऊन वर राहते. त्याचे तपमान -१.७० से. च्या आसपास असते. त्याच्या खाली ७६० मी. खोलीपर्यंत नॉर्वेजियन व ग्रीनलंड समुद्रातून आलेल्या उत्तर अटलांटिक प्रवाहाचे सुमारे १.७० से. तपमानाचे अधिक क्षारतेचे पाणी असते. त्याच्याही खाली तळापर्यंत तितक्याच क्षारतेचे परंतु -०.८५० से. तपमानाचे आर्क्टिक खोलपाणी असते.
स्वालबारच्या पश्चिमेकडून व बॅरेंट्स समुद्रातून अटलांटिक प्रवाहाचे पाणी आर्क्टिकमध्ये येते. ते घड्याळकाट्याच्या उलट दिशेने फिरते व ग्रीनलंडच्या पूर्वकिनाऱ्यावर येऊन ग्रीनलंड प्रवाह बनते. त्याच्याबरोबर दक्षिणेकडे हिमखंड वाहात येतात. गल्फस्ट्रीमची एक शाखा ग्रीनलंडच्या आग्नेयीस पूर्वग्रीनलंड प्रवाहाला मिळते. मग तो प्रवाह ग्रीनलंडला वळसा घालून त्याच्या पश्चिम किनाऱ्याने उत्तरेकडे जातो. यामुळे ग्रीनलंडची दक्षिणेकडील बंदरे बर्फाने बंद होतात परंतु मध्यग्रीनलंडची बंदरे खुली राहतात.
आर्क्टिकमधील बर्फ समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे किंवा हिमनदीच्या गोड्या पाण्याचे बनलेले असते. हिवाळ्यापूर्वी आर्क्टिकमध्ये फिरणारे जहाज खुल्या समुद्रात असल्यासारखे वाटते परंतु बर्फाचे सूक्ष्म स्फटिक तयार होत असल्यामुळे पाणी तेलकट दिसते. ते हळूहळू गोठत असते. एका रात्रीत पाणी गोठून १०-१५ सेंमी. जाडीचा थर तयार होतो. एका आठवड्यात त्याची जाडी ३० सेंमी. इतकी वाढून एक सपाट हिमक्षेत्र तयार होते. त्यात जहाजे अडकून पडतात. वसंतऋतुपर्यंत बर्फाची जाडी दीडमीटरपर्यंत होऊ शकते. परंतु ते एकसारखे सपाट नसते.
भरती, वारे, प्रवाह यांमुळे ते भंग पावू लागते. या हालचालींच्या दाबामुळे त्यावर वळ्या पडू लागतात आणि बर्फाच्या लांबट ढिगांच्या रांगा बनू लागतात. दाब कमी होताच हिमखंडे तयार होतात व त्यांच्या दरम्यान खुल्या पाण्याचे विभाग दिसू लागतात. ग्रीनलंडमधील हिमनद्यांपासून मोठमोठे हिमनग सुटून आर्क्टिक महासागरात येतात. एल्झमीअर बेटाच्या उत्तरेकडील बर्फसंचयापासून (आइसकॅप) बर्फाचे मोठमोठे सपाट थर समुद्रात शिरतात. त्यांपासून पाचपाचशे चौ. किमी. पर्यंत क्षेत्राची हिमद्वीपे अलग होऊन समुद्रात तरंगत राहतात.
अतिउत्तरेकडील प्रदेशांचे आर्थिक, सैनिकी व शास्त्रीय महत्त्व वाढल्यामुळे तेथील व्यापारही वाढला आहे. उन्हाळ्यात अनेक देशांची लहानलहान जहाजे नॉर्डेन्स्कगोल्ड व आमुनसेन यांनी संशोधिलेल्या नॉर्थ ईस्ट पॅसेज व नॉर्थ वेस्ट पॅसेज या मार्गांनी या महासागरात काही अंतरापर्यंत संचार करतात.
यूरोपातील बंदरांतून निघालेली जहाजे प्रथम पश्चिम स्पिट्स्बर्गेंनला जातात. तेथे नॉर्वेजियन व रशियन कामगार कोळशाच्या खाणीत काम करतात. तेथून पूर्वेस बॅरेंट्स समुद्रात मासेमारीसाठी जहाजे जातात. बर्फामुळे फ्रान्स जोझेफलँड किंवा नॉव्हाया झीमल्या यांकडे जाता येत नाही. परंतु बर्फफोड्या बोटीच्या साहाय्याने वायगाश बेटाकडे व तेथून ओब उपसागरावरील नॉव्ही बंदराकडे जाता येते व नदीमार्गाने यंत्रसामग्री नेता येते.
कारा समुद्रातून डिक्सन बंदरात जाऊन येनिसे नदीमार्गे इगार्का येथे इमारती लाकूड व ग्रॅफाइट यांचा व्यापार चालतो. डिक्सन येथे ध्रुवीय संशोधनकेंद्र, मच्छीमारी केंद्र, विमानतळ व बोटींना कोळसा पुरवठा करण्याचे केंद्र आहे. येथून आशियाचे अतिउत्तरेकडील टोक चेल्यूस्किन येथे जाता येते. तेथून ७२ किमी. रुंदीची सामुद्रधुनी ओलांडून सेव्हर्नाया झीमल्या या रेनडिअर व पक्षी यांची वस्ती असलेल्या बेटाकडे जातात.
लॅपटेव्ह समुद्रातून बोरकाया उपसागरावरील टिक्सी येथे जाताना लीन नदीच्या त्रिभुजप्रदेशाजवळील उथळ समुद्राचा व बर्फयुक्त प्रदेश टाळतात. व्हलॅडिव्हस्टॉककडून बेरिंग सामुद्रधुनीतून पूर्व सायबीरियन समुद्रातील न्यूसायबीरियन बेटास जातात;तेथे इतिहासपूर्वकालीन प्रचंड प्राण्यांचे अवशेष व अश्मीभूत हस्तिदंत सापडे आहेत. आयोन येथे रेनडिअरच्या कातड्याचा व्यापार होतोतेथून रँगेल बेटाकडे जातात. तेथे बर्फ फुटल्यामुळे माल उतरविता येतो. येथे ध्रुवीय संशोधनकेंद्र आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2020
ग्रीनलंडचे हवामान ध्रुवीय असून हवा बरीच अस्थिर असत...