कॅनडाच्या ईशान्येचे जगातील सर्वांत मोठे बेट. क्षेत्रफळ २१,७५,६oo चौ.किमी.; लोकसंख्या ४७,९३५ (१९७१). हे ५९० ४६' उ. ते ८३० ३९' उ. आणि ११० ३९' प. ते ७३० ८' प. यांदरम्यान असून त्याची दक्षिणोत्तर लांबी सु. २,६४o किमी. व पूर्वपश्चिम रुंदी सु. १,२८o किमी. आहे. याचे उत्तर टोक केप मॉरिस जेसप उत्तर ध्रुवापासून फक्त ७१o किमी दूर आहे. याचा बहुतेक भाग उत्तरध्रुववृत्ताच्या उत्तरेस असून ८४ टक्क्यांहून अधिक भाग सतत बर्फाच्छादित असतो.
ग्रीनलंड डेन्मार्क देशाचा एक भाग असून याच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर, पूर्वेस ग्रीनलंड समुद्र, आग्नेयीस डेन्मार्क सामुद्रधुनी व त्यापलीकडे आइसलँड, दक्षिणेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस बॅफिन उपसागर आणि डेव्हिस सामुद्रधुनी, वायव्येस केनेडी खाडी व त्यापलीकडे कॅनडाचे एल्झमीअर बेट आहे. नैर्ऋत्येचा व उत्तरेचा किनारी प्रदेश आणि पूर्व व पश्चिम किनाऱ्यांचा काही भाग बर्फमुक्त आहे.
मध्यवर्ती बर्फाच्छादन काही ठिकाणी ३,ooo मी. उंचीपर्यंत गेलेले आहे. त्याची जास्तीत जास्त जाडी २,ooo मी. व सरासरी जाडी १,५oo मी. असून त्याच्या खालील ग्रीनलंडची भूमी काही ठिकाणी समुद्रसपाटीपेक्षा कमी उंचीची आहे. तिचा आकार लांबट बशीसारखा असून तिच्या काठावर व समुद्रकिनाऱ्याजवळ उंच पर्वत आहेत. पूर्व किनाऱ्याजवळ ८oo किमी. लांबीची व २,१oo मी. उंचीची पर्वतश्रेणी असून मौंट गुनब्यॉर्न ३,७oo मी. सर्वांत उंच आहे. बर्फाच्या थरांतून काही पवर्तशिखरे बाहेर डोकावताना दिसतात.
ग्रीनलंडचे खडक रूपांतरित, ग्रॅनाइट, नाइस यांचे असून काही ठिकाणी त्यांवर गाळखडकांचे व पिंडाश्मांचे थर आहेत. ज्वालामुखीक्रियेमुळे आलेल्या लाव्हारसाचे, बॅसाल्टचे थर व उष्णोदकाचे झरे काही ठिकाणी आहेत. कॅलिडोनियन गिरिजनक हालचालींमुळे झालेले वलीकरण व विभंग अनेक ठिकाणी दिसून येतात.
हिमानीक्रियेमुळे तयार झालेले फ्योर्ड किनाऱ्यापर्यंत आलेले असून त्यामुळे ४o,ooo किमी. लांबीचा किनारा अत्यंत दंतुर बनला आहे. बर्फाच्छादन भूमीवरील दऱ्याखोरी व्यापून किनारी डोंगरांमधून वाटा काढून हिमनद्यांच्या रूपाने समुद्राकडे जात असते. काही हिमनद्या वितळून ते पाणी समुद्रात जाते, तर काही ठिकाणी बर्फाचे कडे समुद्रात कोसळून हिमनग तरंगू लागतात. हिमयुगानंतर सबंध बेटाचे उत्थापन झाले असावे असे उत्थित पुलिने, सोपान, मृदुकाय प्राण्यांची कवचे यांवरून दिसते. किनाऱ्याजवळ पुष्कळ बेटे असून पश्चिम किनाऱ्याजवळील डिस्को बेट सर्वांत मोठे आहे.
ग्रीनलंडचे हवामान ध्रुवीय असून हवा बरीच अस्थिर असते. स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर लगेच दाट धुके, बर्फगार वारे आणि हिमवर्षाव यांचा अनुभव पुष्कळदा येतो. नैर्ऋत्य किनाऱ्यावरील ईव्हिगतून येथे जुलैचे सरासरी तपमान ९.९० से. व वायव्य किनाऱ्यावरील टूली येथे ४.७० से. असते.
जानेवारीत ते अनुक्रमे - ७.५० से. व २९.५० से. असते. गल्फ प्रवाहाचा एक फाटा डेव्हिस सामुद्रधुनीजवळून गेल्यामुळे नैर्ऋत्य किनाऱ्यावर तपमान थोडे जास्त व पूर्व किनाऱ्याजवळून ध्रुवीय प्रवाह गेल्यामुळे तेथे तपमान कमी असते. अंतर्भागात जुलैत -१o.७० से. ते फेब्रुवारीत -४७.२० से. सरासरी तपमान असते. पश्चिमपूर्व जाणारी काही सौम्य आवर्ते ग्रीनलंडवरून जातात. बर्फ केव्हाही पडते परंतु पाऊस उन्हाळ्यात पडतो. दक्षिणेकडे वृष्टी सु. १oo सेंमी. तर उत्तरेकडे ती २o सेंमी. असते.
ग्रीनलंड तरुरेषेच्या उत्तरेस असल्यामुळे तेथे अरण्ये नाहीत. नैर्ऋत्येकडे तीन मी. उंचीपर्यंतची विलो व बर्च झाडे आहेत. आर्क्टिक बर्च, मौंटनॲश, आल्डर, छोटी झुडुपे, शेवाळ, दगडफूल, काही भागात स्टेप वनस्पती व काही फुलझाडे या येथील वनस्पती होत. उमानाकजवळ ब्रॉकोली, रॅडिश, टर्निप, लेट्यूसही होतात. बरेच बर्फयुक्त प्रदेश ओसाड आहेत.
कस्तुरी-वृषभ, लेमिंग, अर्मिन, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, ध्रुवीय ससा, ध्रुवीय खोकड, ध्रुवीय लांडगा इ. प्राणी ग्रीनलंडच्या निरनिराळ्या भागांत आढळतात. देवमासा व सील हे येथील सागरी सस्तन प्राणी महत्त्वाचे होत. १९२o मध्ये हवामानातील बदलामुळे ते उत्तरेकडे गेले व त्यांचे जागी पश्चिम किनाऱ्यावर कॉड मासे आले. हॅलिबट, शार्क, कोळंबी तसेच सरोवरे व प्रवाह यांत ट्राउट व सॅमन हे इतर उपयुक्त जलचर आहेत.
ग्रीनलंडमधील पक्ष्यांच्या ६o जातींपैकी निम्म्या मूळच्या तेथील आहेत व बाकीच्यांपैकी ३/५ अमेरिकेतून आल्या आहेत. समुद्री पक्षी भरपूर आहेत. पांढऱ्या शेपटीचा गरुड, ससाणा, हिमघुबड, टार्मिगन, स्नोबंटिंग व रॅव्हन, बारनॅकल गूज व पिंकफूट गूज हे येथील प्रमुख पक्षी होत. मृदुकाय प्राणी, डास, कीटक वगैरे भरपूर आहेत.
ग्रीनलंडमधील खनिजांचा शोध फारसा फलदायी झालेला नाही. ईव्हिगतूतजवळील क्रायोलाइटाचा जगातील एकमेव नैसर्गिक साठा संपुष्टात आला आहे. डिस्को बेटावर थोडे भूमिगत व थोडे अशनिजन्य लोखंड व हलका कोळसा सा पडतो. उपेर्नाव्हिकजवळ ग्रॅफाइट आहे. सोपस्टोन पूर्वीपासून भांडी, दिवे वगैरेंसाठी वापरात असे. शिसे व जस्त आढळले आहे; ते कॅनडा, डेन्मार्क व स्वीडन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी काढले जात आहे.
सु. ३,ooo वर्षांपूर्वी कॅनडातून एस्किमो लोक ग्रीनलंडमध्ये आले. सु. १ooo मध्ये पुन्हा एस्किमो आले व त्याच सुमारास यूरोपीयही आले. एरिक द रेड हा नॉर्वेजियन नाविक ९८२ मध्ये येथे आला. तीन हिवाळे राहून तो परत गेला व ९८५ मध्ये वसाहतकऱ्यांसह परतला. लोकांना येथे यावेसे वाटावे म्हणून त्याने या भूमीला ग्रीनलंड हे नाव दिले.
हल्लीच्या यूल्यानहॉप व गॉट्हॉप येथील वसाहती तेराव्या शतकात चांगल्या भरभराटल्या होत्या. येथून नॉर्समेन उत्तर अमेरिकेत जात. हे लोक दगडी घरात राहत, शिकार आणि मासेमारी करीत; शेळ्या-मेंढ्या व गुरे पाळीत आणि चर्चमध्ये जात. तथापि हवामानातील प्रतिकूल बदल, अपपोषण व आपापसांतील लग्ने यांमुळे वसाहतींना अवकळा येऊन १४१o नंतर यूरोपशी दळणवळणही तुटले.
१५७८ मध्ये मार्टिन फ्रॉबिशरने पुन्हा ग्रीनलंड संशोधिले. त्यानंतर जॉन डेव्हिस, हेन्री हडसन, विल्यम बॅफिन, जेम्स हॉल या व इतर समन्वेषकांनी डेन्मार्कच्या राजाच्या वतीने जुन्या वसाहतींचा शोध घेतला. त्यांना त्यांचे फक्त अवशेष सापडले.
१७२१ मध्ये हान्स एगेडे हा मिशनरी आला. त्याला फक्त एस्किमोच भेटले. त्यांच्यातच धर्मप्रसार करीत तो राहिला. एकोणिसाव्या शतकात शास्त्रीय समन्वेषण सुरू झाले. रॉस, इंगलफील्ड केन, हॉल, स्कोर्झबी, सॅबिन, क्लॅव्हरिंग, कोल्डेव्हाय ड्यूक ऑफ ऑर्लीन्स, मुलीअस ईअरीक्सन कोख, मीकेल्सन, ग्रा, हॉल्म , गार्डे, रायडर, अम्हप, नाथोर्स्ट, बोमंट, लॉकवुड, पीअरी, रासमूसन, कूरटॉल्ड, मंक, क्नुथ इ. समन्वेषकांनी हे कार्य केले. व्हिंपर, ब्राउन, येन्स येन्सन, नूरडेनशल्ड, पीअरी, मायगार्ड यांनी मध्यवर्ती बर्फाच्छादनावर १,६५o मी. ते २,२५o मी. उंचीपर्यंत आरोहण केले.
फ्रित्यॉफ नान्सेन याने १८८८ मध्ये ते पूर्वेकडून पश्चिमेकडे पार केले. त्यानंतर विसाव्या शतकातही अनेक समन्वेषणे व आरोहणे झाली आणि दुसऱ्या महायुद्धात व नंतर ग्रीनलंडवर अनेक हवामान निरीक्षणकेंद्रे स्थापन झाली. ग्रीनलंडच्या हवामान निरीक्षणांवरून यूरोप व इतर ठिकाणच्या हवामानाचे अंदाज बांधणे सोपे जाते, या दृष्टीने या केंद्रांचे महत्त्व आहे.
१९५१ पासून भूशास्त्रविषयक व तत्सम अभ्यासासाठी कायम स्वरूपाची संस्था स्थापन झाली आहे. यात डेन्मार्कप्रमाणे इतर राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनीही भाग घेतला आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
आर्क्टिक महासागर : उत्तर ध्रुवापासून सुमारे ७०० उ....