অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्गरम्य…. भंडारदरा

पावसाला सुरु झाला की, तमाम पर्यटकांना आठवण होते ती निसर्गरम्य भंडारदऱ्याची…. पावसाळ्यात मन अगदी मोहरून जातं... पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी, उत्तुंग अशा कड्यांवरून खाली कोसळणारे शुभ्र फेसाळ असे धबधबे…. सोबतच निसर्गाची साथ हे सर्व अनुभवायचे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदऱ्याला एकदा नक्की भेट द्याच…

भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मुळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. पावसाळ्यामध्ये या भंडारदऱ्याचे एक अनोखे रूप पाहायला मिळते. निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल सोबतच, पांढरे शुभ्र ढग, दाट धुके, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी आपल्या मनाला तजेला देणारे असते. मनमोकळा श्वास घेण्यास सांगते. धावपळीच्या जीवनातून थोडावेळ निसर्गाच्या सानिध्यात भंडारदरा येथील खालील ठिकाणे तुमची या पावसाळ्यात वाट पाहत आहेत …

कळसुबाई शिखर

भंडारदरा परिसरातच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गिर्यारोहकांचे अतिशय आवडीचे ठिकाण आहे. ऐन पावसाळ्यात इथे येणे आणि माथ्यावरच्या पाऊस वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणे ही थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते. कळसुबाई शिखराच्या माथ्यावर कळसुबाईचे मंदिर आहे. या शिखरावर चढण्यासाठीची सुरुवात ही बरी गावातून होते. बरी गाव हे भंडादऱ्यापासून ६ किमी अंतरावर आहे. या शिखरावर चढण्यासाठी लोखंडी पायऱ्याचा देखील वापर करू शकतो. कळसुबाई शिखराची उंची १६४६ किमी आहे …

कसे जाल

मध्यरेल्वेच्या घोटी स्थानकापर्यंत ट्रेनने जाऊ शकता. घोटी स्थानकापासून बरी गावात जाण्यासाठी बस असते. मुंबईपासून १८० किमी व पुण्यापासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे …

अम्ब्रेला फॉल

विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खूप दूरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.

रंधा फॉल

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजून एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

रतनवाडी

भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.

घाटघर

शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असून पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खूप पाऊस पडतो म्हणून यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हटले जाते.

 

लेखिका - चारुशिला बोधे

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate