অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्गरम्य आंबोली

निसर्गरम्य आंबोली

महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणची राणी असं आंबोलीला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जगप्रसिद्ध जैववैविध्य असलेले निसर्गरम्य ठिकाण अशी आंबोलीची आता ख्याती झालेली आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा आंबोलीच्या परिसरात नैसर्गिक साधनसंपत्तीची भरभराट पाहायला मिळते. सह्याद्रीच्या ऐन कण्यावर वसलेले आंबोली पूर्वीपासूनच सावंतवाडी संस्थानचे थंड हवेचे ठिकाण होते. पर्यटकांनी आवर्जुन वर्षातल्या कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. उंचावरून पडणारे धबधबे आंबोलीच्या सौंदर्यात अजूनच भर घालत असतात.

समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचावर असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. सगळा परिसर हा अगदी घनदाट अरण्याचा आहे आणि तिथे आपल्याला बरेच धबधबे पाहायला मिळतात. वर्षाऋतू मध्ये होणारा प्रचंड पाऊस इथल्या सगळ्या डोंगरांना हिरवागर्द शालू नेसवतो. साहजिकच इंग्रज राज्यकर्ते या ठिकाणाच्या प्रेमात पडले आणि कर्नल वेस्ट्रॉप यांनी आंबोलीला गिरिस्थानाचा दर्जा मिळण्यासाठी खूपच मेहनत घेतली. हिवाळ्यात सगळा परिसर हा धुक्याची दुलई पांघरून बसलेला असतो आणि उंचावरून कोसळणारे धबधबे आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात.

नागरतास धबधबा, हिरण्यकेशी, सी व्ह्यू पॉईंट, महादेवगड ही ठिकाणे पर्यटकांनी कायमच गजबजलेली असतात. कावळेसाद पॉईंट वरून तर सह्याद्रीच्या अजस्त्र रंगांचे भेदक दर्शन होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहासह इतरही अनेक हॉटेल्स इथे उपलब्ध असून राहण्याबरोबरच खाण्याची सोय सुद्धा फार छान केलेली आहे.

ऐन पावसाळ्यामध्ये आंबोलीला भेट देण्यासारखी दुसरी मजा नाही. संपूर्ण परिसर अगदी दिवसभर धुक्यात लपेटलेला असतो. निसर्गाचा स्पर्श आपल्या मनाला अगदी मोहवून टाकतो आणि एक प्रकारची मनःशांती सहजच लाभते. हिरण्यकेशी नदीचा उगम हा खूप निसर्गसंपन्न आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे पण तिथे गेल्यावर दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय. तिथे पार्वतीचे एक छोटेसे देऊळ असून हिरण्यकेशी नदी इथल्याच डोंगरातून उगम पावते. तासनतास इथे बसून रहावेसे वाटते. हिरण्यकेशी नदी इथून पुढे कर्नाटकातून वाहत जाते आणि तिथे तिला घटप्रभा हे नाव मिळाले आहे.

वनस्पती, फुले, फळे आणि प्राणिजीवन यांनी आंबोली अगदी समृद्ध आहे. रानडुकरे, बिबटे, चितळ, सांबर, भेकर, अस्वल, माकडं असं वन्यजीवन इथे दिसू शकते. सदाहरित जंगलात मैना, बुलबुल, धनेश, धोबी, चांदोल, राघू असे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हिरडा, जांभूळ, ऐन, अंजन, करवंद, तमालपत्र, शिकेकाई यांची दाट झाडी इथे आहे आणि त्याचबरोबर शेकडो रानफुले, नेची आणि अनेक आमरी यांचेही दर्शन सहज होते.

मुंबईपासून 492 किलोमिटरवर असलेल्या आंबोली येथे जाण्यासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर इथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. तसेच रेल्वेने जाताना कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड या स्टेशनावर उतरावे. तेथून खाजगी वाहनाने आंबोलीस जाता येतं. प्रत्येक निसर्गप्रेमीने एकदा तरी आंबोलीला जरुर भेट द्यावी.

 

संकलन - विलास सागवेकर, उपसंपादक

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate