অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नयनरम्य ऐतिहासिक निफाड!

नयनरम्य ऐतिहासिक निफाड!

वेशीवरच्या पाऊलखुणा : निफाड

नयनरम्य ऐतिहासिक निफाड!
एखाद्या गावात काय दडले आहे हे अनेकदा त्या गावापुरतेच मर्यादित राहते. अनेक वैशिष्ट्यांनी अन् ऐतिहासिक घडामोडींनी सजलेले असूनही, ते अज्ञातवासात राहते ते फक्त त्या गावाबद्दल मोकळेपणाने भरभरून न बोलले गेल्याने. तेथील अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा मात्र साद घालत राहतात. धुळीने माखलेल्या आठवणींना आस राहते की, कोणीतरी आपल्यावरील धूळ झटकेल या आशेने त्याही जगत असतात. असेच काहीसे एकही डोंगर नसलेल्या नि: पहाड म्हणजे निफाडबद्दल झालेले दिसते. समृद्ध ऐतिहासिक वारसा अन् सुफी संतांच्या पाऊलांचे ठसे उमटलेली ही भूमी नयनरम्य तर आहेच पण, अज्ञात इतिहास घेऊन पुढे जात आहे. तिच्या अंतरंगात अनेक अख्यायिका, होळकर घराण्याचा देदिप्यमान इतिहास अन् सुंदर व वैभवशाली वाडे, मंदिरांचा खजिना दडला आहे. या इतिहासाचे प्रतिबिंब येथे लोकांमध्येही उमटलेले दिसते.

निफाडला पाहण्यासारखे काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. निफाड म्हणजे काय? हे नाव ऊर्दू शब्दाचा अपभ्रंश आहे. यातून निफाडचा इतिहास उलगडायला सुरूवात होते. नि: पहाड म्हणजे जेथे डोंगर नाही असा परिसर. म्हणजेच पूर्वी परिसराला एखाद्या खाणाखुणांवरून ओळख निर्माण व्हायची. तशीच निफाडबद्दलही झाली. निफाडची ओळख आदिलशहाच्या वेळेस निर्माण झाली असावी. कारण हा परिसर विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता अन् पूर्वी निफाड चांदवड तालुक्यात होते. डोंगर नसलेल्या या परिसराला नंतर निफाड म्हटले जाऊ लागले असावे, असे येथील ज्येष्ठ सांगतात. निफाडचा इतिहास येथेच संपत नाही तर येथून सुरू होतो. औरंगाबाद महामार्गावर नाशिक-निफाड हा प्रवास ३५ किलोमीटरचा. कादवा नदीवरचा पूल ओलांडताना डाव्या हाताला दगडातील एक मंदिर आपल्याला थांबायला लावते. येथून समोर निफाड अन् डाव्या हाताला विनता आणि कादवा नदीचा संगमावर एक टुमदार मंदिर पहायला मिळते. हा नयनरम्य नजारा पाहिल्यावर पुढे चौक लागतो. तेथून डाव्या हाताच्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला संगमेश्वर मंदिराची कमान दिसते. या कमानीतून आत गेल्यावर लहान मोठी मंदिरे पाहत पुलावरून पाहिलेल्या दगडी मंदिराजवळ आपण पोहचतो.

परिसर स्वच्छ, सुंदर अन् खळाळते पाणी यामुळे मंदिराचे वैभव उठून दिसते. दोन नद्याच्या संगमावर या मंदिराला संगमेश्वर म्हटले जाते. पेशवाईतील कालखंडात बांधलेल्या मंदिरावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. नाशिकच्या गोदा काठावरील मंदिरांशी हे साम्य दाखविते. संगमेश्वर मंदिरामागील बाजूस एका लहानग्या टेकडावर ईदगाह मशीदची पांढऱ्या रंगातील इमारत पहायला मिळते. ही ईदगा आदिलशहाने बांधल्याचे निफाडचे इतिहास अभ्यासू नईमखान पठाण सांगतात. संगमेश्वरापासूनच ईदगाला जायला रस्ता आहे. ईदगाहची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण अन् त्यावरील कलाकसुरही पाहण्यासारखी आहे. तेथून जवळच फरीद बाबांचा दर्गा आहे. निफाडच्या सिव्हिल हॉस्पिटलमागील रस्त्याने विनता नदी ओलांडून गेल्यावर समोर घनदाट झाडी पहायला मिळते. हा परिसर म्हणजेच फरीद बाबांचा दर्गा. शिखांचे धर्मगुरू गुरूनानकांच्या समकालीन असलेले फरीदबाबा मूळचे पंजाबचे. त्यामुळेच त्यांच्या वचनांना शिखांच्या गुरूग्रंथसाहेब या ग्रंथात संत नामदेवांप्रमाणेच स्थान दिल्याची माहिती या दर्ग्याची व्यवस्था पाहणारे शबीरखान पठाण यांनी दिली. दर्ग्याच्या परिसर निसर्गरम्य तर आहेच पण, हिंदू मुस्लिम यांच्या एकोप्याचे उत्तम उदाहरणही आहे. दर्गाचे बांधकाम आदिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या जमीन व आर्थिकमदतीतून उभे राहिले आहे. दर्गातील काष्ठशिल्प अन् ऐतिहासिक पाऊलखुणा थक्क करतात.

दर्ग्यातून बाहेर पडताना समोर वाड्याची तटबंदी दिसते. पण हा वाडा नाही तर श्रीकृष्ण मंदिर आहे. पुन्हा विनता नदी ओलांडताना उजव्या हाताच्या कच्च्या रस्त्याने रस्त्याकडेच्या समाध्या पाहत नजरेसमोर मंदिराचा तट ठेऊन चालत रहावे म्हणजे रस्ता चुकत नाही. एका उंच चढावर डाव्या हाताला मंदिराची थोडी पडझड झाल्याने उघड्या पडलेल्या मंदिराच्या काष्ठशिल्पाचा अप्रतिम नजारा दिसतो. ही तुटलेली भिंत म्हणजे गावची तटबंदी होती. कालांतराने ती नष्ट झाली. हे मंदिर की वाडा असा प्रश्न मंदिरासमोर केल्यावर पडतो. पण मंदिर असले तरी येथे लोक राहतात. चार-पाच दगडी पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराच्या सभागृहात आपण प्रवेश करतो अन् अबब.. हे काय? अशीच आपली प्रतिक्रिया उमटते. सभागृहाचे छत अन् आतील खांब सागवाणी लाकडात केलेले अप्रतिम नक्षीकामाने सजलेले आहेत. डाव्या हाताला आतील खोलीत पुन्हा असाच काहीसा नजारा अनुभवायला मिळतो अन् लाकडी जाळीदार देव्हाऱ्यात काळ्या दगडातील तीन फूट उंचीचा श्रीकृष्ण नजरेच भरतो. राधेची प्रतिमा फक्त एक फूट उंचीची आहे. हे मंदिर अडीचशे तीनशे वर्षांचा इतिहास उलगडते.

या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर देखील होळकरांचेच. येथील अनेक फोटो होळकरांच्या रॉयल फॅमिलीची आठवण करून देतात. मंदिरातून बाहेर पडल्यावर आपण माणकेश्वर चौकात जातो. चौकात जस्टीस रानडे माणकेश्वर सार्वजनिक वाचनालय ९६ वर्षांची आपली परंपरा नव्याने उभे राहत असलेल्या वाचनालयाच्या इमारतीतून उलगडताना अनुभवता येते. निफाडने अनेक निफाडकरांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तर अनेक निफाडकरांनी निफाडची ओळख ठळक केली आहे. न्यायमूर्ती महादेव रानडेंची जन्मभूमी निफाड. न्यायमूर्ती रानडे यांचे वडील गोविंद अमृतराव रानडे निफाड येथे कलेक्टर कचेरीत नोकरीस होते. गावातीलच माणकेश्वर मंदिराजवळ गोविंदराव रानडे राहत होते. त्याच घरात १८ जानेवारी १८४२ ला न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला. आज हे घर अस्तित्वात नाही पण आजही निफाडला न्या. रानडेंचे गाव म्हणूनच ओळखले जाते. उच्च न्यायालयाचे निवृ्त न्यायमूर्ती भालचंद्र गाडगीळ यांचे गावही निफाडच. त्यांचे वडील चिंतामणराव गाडगीळ १९१५ ते २० या कालावधीत निफाडला वकील होते. ते निफाडमधील माणकेश्वर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष होते. जुन्या पिढीतील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांची बालपणातील काही वर्षे निफाडमध्येच गेली. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचे वडील काही काळ निफाडला वास्तव्यास होते. न्यायमूर्ती जयंत चित्रे, दलित मित्र, लेखक व स्वातंत्र्यसैनिक राम उगावकरही निफाडवासीच होते. निफाडच्या विकास चळवळीत सेवा दलाचे महामंत्री बाबूराव यशवंत परीट गुरूजी व शांतीलाल सोनी यांचाही हातभार मोठा आहे. न्या. रानडेंच्या स्मारकाचे काम सध्या सुरू आहे. या माध्यमातूनही निफाडचा इतिहास जपला जाईल, अशी माहिती पक्षीप्रेमी व इतिहास अभ्यासक दत्ता उगावकर यांनी दिली.

माणकेश्वर वाचनालय पाहिल्यावर समोरच एक भव्य वाड्याचा दरवाजा, ‘मला पाहिल्याशिवाय अन् माझा इतिहास अनुभवल्याशिवाय निफाडच्या वैभवशाली इतिहास सुरूच होऊ शकत नाही’, असे छाती फुगवत आपल्याशी बोलू लागतो. हा वाडा म्हणजे होळकर सदन. नंतर त्याची ओळख फणसे वाडा अशी झाली. वाड्यावरील होळकर सदन असे लिहिलेला शिलालेख आता जीर्ण झाला आहे तो वाड्याचीही अवस्था कथन करतो. निफाड खऱ्या अर्थाने भरभराटीस आले ते अहिल्याबाई होळकरांमुळे. निफाडची शान म्हणजे होळकरांचा अनोखा इतिहास. अहिल्याबाई होळकरांच्या काळात बंडाळी माजली होती. ही बंडाळी मोडून काढणे गरजेचे असल्याने जो ही बंडाळी मोडून काढेल त्या सरदाराला आपल्या कन्येचा विवाह लावला जाईल, असे अहिल्याबाईनी जाहीर केले. एका तरूण सरदार यशवंतराव फणसे यांनी बंडाळीवर नियंत्रण मिळविले अन् त्यांचा मुक्ताबाईंशी विवाह झाला. अहिल्याबाईंनी फणसेंना निफाडची जहागिरी दिली.

यासाठी खास वाडा बांधण्यात आला. विवाहात १२० एकर जमीन, पाच गावांची जहागिरी व ७०० नोकरचाकर दिले. या काळात निफाडमध्ये अनेक मंदिरे व वाडे उभे राहिले. फणसे पुढे होळकरांच्या रॉयल फॅमिलीचा भाग झाले, असे नानासाहेब मार्कंडेय होळकर हे अहिल्याबाईंचे आठवे वंशज होळकरांच्या रॉयल फॅमिलीचा इतिहास उलगडतात. फणसे वाड्यातील त्या दरवाजावरील खोली आजही होळकर रॉयल फॅमिलीच्या आठवणी घेऊन उभी आहे. हा वाडाही येणा-जाणाऱ्याला होळकर फॅमिलीचा इतिहास सांगतो अन् दसऱ्याच्या जल्लोष डोळ्यासमोर उभा राहतो. या वाड्यात उत्तम संग्रहालय उभे राहिल्यास होळकरांचा देदिप्यमान इतिहास निफाडचा अविभाज्य अंग होईल, असे वाटते. सरदार नानासाहेब होळकरांना त्या आठवणीत हरवून जाताना पाहणे हेही एक वारसा अनुभवण्यासारखेच आहे. त्यांचे भरलेले डोळे कोलमडलेली तटबंदी पुन्हा उभी राहावी हे सांगणारी इच्छा खूप काही व्यक्त करते.

होळकर वाडा पाहिल्यावर हनुमान, शनीमंदिर, माणकेश्वर चौकातील चार मंदिरे, गणपती मंदिर, राममंदिर, काशी विश्ववेश्वर, माणकेश्वर , महानुभव पंथाचे दत्त मंदिर, सती मंदिर, उगावकर वाड्यातील देवीची दोन मंदिरे, कापसे गल्ली विठ्ठल मंदिर ही देखील आवर्जून पहायला हवीत. सती मंदिर छत्री ही देखील आवर्जून पहावे असे दगडी शिल्प आहे. यावर एक शिलालेख आहे. कुलकर्णी कुटुंबियातील एक स्त्री सती गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री पेशवाईत उभारली गेली. याशिवाय पुरातन वस्तूंचे संग्राहक नईमखान पठाण, पक्षीमित्र दत्ता उगावकर या देखील निफाडच्या पाऊलखुणा आहेत. निफाडला आलात अन् या पाऊलखुणा अनुभवल्या नाहीत तर निफाड पाहिले नाही, असेच म्हणावे लागते. म्हणून निफाडला वैभवशाली इतिहास फक्त संग्रहीत होण्याची अन् त्यावर बारकाईने काम करण्याची गरज आहे. तरच हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत नेता येईल.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate