अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव हे गांव गोदावरी नदीच्या काठी वसलेले असून त्यास दक्षिण गंगेमुळे तीर्थस्थानाचे महत्व आले आहे. हजारो वर्षाची प्राच्य परंपरा कोपरगांवास लाभली आहे.
देव पुरुष कचेश्वर, दानवांचे गुरु व संजीवनी मंत्राचे निर्माते ऋषी शुक्राचार्य आणि देवयानी यांच्या समाध्या गोदातटी बेटातच आहेत. कोपरगांव व आसपासचा परिसर 13 व्या शतकात देवगिरीचे यादव राजे यांच्या ताब्यात होता. यादवानंतर बहामनी राज्य आहे. नंतर निजामशाही, त्यानंतर हा विभाग मोगलांकडे आला आणि मग पेशव्यांचे राज्य येथे होते.
पेशवाईच्या पडत्या काळात कोपरगावला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले कारण थोरल्या माधवरावांविरुध्द लढण्यांसाठी राघोबादादा पेशवे यांनी सैन्याची जमवाजमव केली. सन 1782 च्या सालपे येथील तहानंतर कोपरगांव येथील बेटात वाडा बांधला. बेटात एका बाजुला शुक्राचार्य तर दुसऱ्या बाजुला कचेश्वर देवस्थान आणि त्यामधुन गोदावरी नदी वहात असे.
पुण्यकर्म करण्यांसाठी पेशवे यांनी उत्तम घाट बांधुन लोककल्याणाचे काम केले. गेल्या 125 वर्षात नदीने प्रवाह बदलल्यामुळे हे घाट आता मातीत गाडले गेले. नदीच्या पुराचा त्याकाळी सतत त्रास होई, तेंव्हा पेशव्यांनी उंच चौथरा तयार करुन त्यावर भव्य प्रासाद बांधला. राघोबादादांच्या मृत्युनंतर वाड्याची अत्यंत दुर्दशा झाली.
इंग्रजांनी वाड्याचा लिलाव केला. त्यातील काही दगड येवले येथील मुरलीधर मंदिरास तर काही श्रीरामपुर तालुक्यातील डोमेगांव येथील महानुभाव आश्रमास वापरले. वाड्याचा मुख्य दरवाजा मोठा होता तो सध्या शुक्राचार्य मंदिराचा प्रवेश दरवाजा आहे.
श्रीमंत रघुनाथराव पेशवे हे मराठीशाहीतील पराक्रमी सेनापती होते. त्यांनी अटकेपार पराक्रम करुन मराठ्यांचे विजयी ध्वज येथे फडकावले आणि प्रचंड भूभाग जिंकुन हिंदवी स्वराज्यात सामिल केला.
सन 1872 मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे आणि त्यांचे काका राघोबादादा यांच्यात पेशवाईवरुन जोरदार संघर्षाची ठिणगी पडली. माधवरावांचा पराभव होत नाही हे पाहुन राघोबादादांनी माधवरावांच्या पश्चात हाताखालील गारद्यांना हाताशी धरले व नारायणराव पेशवे यांच्या हत्येचे कुटील कारस्थान रचले.
याच प्रसंगात ध चा मा मुळे पेशवाईचा इतिहास बदलला. त्यावेळी राज्यात मोठा प्रक्षोभ झाला. राघोबादादा आणि आनंदीबाईंना न्यासनापुढे उभे केले गेले. परंतु कर्तव्यकठोर न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्यांना देहांतांची शिक्षा ठोठावली. परंतु दादांनी सीमा वाढविण्यांचा केलेला पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यात केलेली वाढ लक्षात घेऊन ती बदलुन त्यांना पुर्ण हद्दपारीची शिक्षा दिली.
कोपरगांव येथे नजरकैदेत ठेवले. राघोबादादांचे पेशवाईचे स्वप्न भंग पावल्यांने उद्धवस्त व उद्विग्न मनांने त्यांनी कोपरगांवी राहणेच पसंत केले. कोपरगांव हे एक तीर्थस्थळ व परिसर धार्मिक यामुळे ते त्यांची पत्नी आनंदीबाईसह येथे राहू लागले. आनंदीबाई अतिशय धार्मिक होत्या.
कोपरगांवी गोदावरी नदीच्या तिरावर 20 फुट उंचीच्या चौथाऱ्यावर हा वाडा सुमारे 1200 फुट लांबीचा आणि 650 फुट रुंदीचा बांधण्यांत आला आहे. प्रत्यक्ष बेटातील देवदेवतांचे दुरुनही दर्शन व्हावे अशी त्यांची रचना केली गेली आहे. वाड्याच्या पोटात प्रचंड तळघर असुन अलिकडच्या काळात ते कोणीही उघडण्यांचा प्रयत्न केलेला नाही. इतिहास असे सांगतो की, वाड्यातुन बेटापर्यंत नदीच्या खालुन भुयारी मार्ग असुन या मार्गाने कधी कधी सैन्याचा गुप्त हालचाली केल्या जात. वाडा जसा भव्य तसा देखणा आहे.
दिवाणखाना, दरबार प्रासाद, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाट्यशाळा, घोड्यांच्या पागा, देवडीवाले विभाग आजही कायम आहेत. परंतु वाड्यात फिरल्यानंतर 232 वर्षाचा जीवंत इतिहास दृष्टीपटलावर उभा राहातो.
दिवाणखान्यातील छताचे नक्षीकाम कमालीचे अप्रतीम, त्याचे रंग आजही ताजे वाटतात. विविध नक्षीकाम व कलाकुसरीने व्यक्त असलेला प्रासाद वर्षानुवर्षे पावसामुळे असंख्य लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमिनदोस्त होऊ लागल्या आहेत. एक कलाकुसरयुक्त खजिना अस्तंगत होण्यांच्या मार्गावर आहे. त्याला लागुनच एक खोली आहे. तिला खबतखाना या नावांने ओळखले जाते येथे पेशवे व त्यांचे सरदार यांच्याशी आनंदीबाईंची गुप्त खलबते होत.
वाड्याचे आणखी एक वैभव म्हणजे मोठा चौक होय. परंतु पावसाच्या माऱ्यामुळे चौक होत्याचा नव्हता झाला. मोठाल्या चौकात झरोक्यातुन प्रकाश येत असे.
चौकाच्या खुणा म्हणजे अनेक भग्न भिंत्ती आज येथे उभ्या आहेत. जवळच एक आड आहे. पुर्वी त्यावर वाड्यातील वर्दळ असे. स्त्री पुरुषांची भव्य दालने व त्याच्या शेजारी पाकगृहाची व्यवस्था आणि सेवकांच्या राहण्यांचा प्रबंधही होता. वाड्याच्या दोन्ही बाजुस असंख्य खिडक्या आहेत.
नारायणराव पेशवे यांच्या खुनासंबंधी माझी चौकशी कुणी का केली नाही ? ध चा मा झाले अशी वदंता यासंबंधी तोंडी वा लेखी पुरावा काहीतरी पुसायास पाहिजे नव्हते का ? मला उगाचच पेचात पाडीयले अशी तक्रार आनंदीबाई यांनी पुण्यांत नाना फडणवीसांकडे केली.
इतिहासात अनेक महत्वपुर्ण राजकारणी स्त्रीया होऊन गेल्या त्यात कर्तबगार, हिकमती, महत्वकांक्षी आणि व्यवहारी आनंदीबाई एक होती असे इंग्रज इतिहासकारांनी म्हटले आहे.
राघोबादादा मुळचे कोकणातलेच. त्यांना एकुण तीन बायका होत्या त्यात जानकीबाई वर्धा गांवी, आनंदीबाईचे माहेर ओक घराण्यांतले. तिसरीचे नांव मथुरा पेंडसे. मथुरा देवी रोगांने आजारी असल्यांने सुरतेस 1784 मध्ये ती मरण पावली. आनंदीबाईंना एकुण तीन मुले झाली. त्यातील दुसरा बाजीराव धार येथे जन्मला.
अमृतराव दत्तक म्हणुन गेला तिसरा मुलगा चिमणाजी यांचा जन्म कोपरगांवचा, या वाडयातच तो जन्मला. राघोबादादांच्या मृत्युनंतर आनंदीबाई, त्यांची मुले आणि नाटकशाळा ऑक्टोंबर 1792 पर्यंत म्हणजे तब्बल-9 वर्षे याच वाड्यात राहिली.
आपल्या हातुन पापकर्म घडले आहे. त्याचे पाप क्षालन व्हावे या उद्देशांने त्यांचे मन सतत खात असे आणि आनंदीबाईच्या इच्छेनुसार बेटातील जुन्या गंगेतच विष्णु मंदिर, संजीवनी पार बांधण्यांची सिध्दता झाली. संगमनेर येथुन खास काळ्या रंगाचा गुळगुळीत दगड आणुन त्यांनी मंदिर उभे केले.
या मंदिराच्या शिळा एव्हढ्या प्रचंड आहेत की, त्या कशा आणल्या व बसविल्या याचेच आश्चर्य वाटते. असंख्य पुर या मंदिराने अनुभवले परंतु मंदिर आजही जैसे थे च आहे.
बेटात गेल्यावर जर माणुस प्रथमत: कोठे जात असेल तर तो संजीवनीचा पार बघण्यांस. सहस्त्रावधी वर्षाची प्राचीन परंपरा लाभलेला पार भंगुन गेलेला होता. राघोबादादांनी यातही लक्ष्य घालुन त्याचा 20 व्या शतकात जिर्णोध्दार केला तेथे पिंपळाचे झाड उभे आहे.
देव-दानवांनी असंख्य युध्दे या पावनभुमीत अनुभवली. देवगुरुपुत्र कचेश्वराला ऋषीवर्य शुक्राचार्याकडुन संजीवनी विद्या गुप्तपणे हस्तगत करायची होती. तेंव्हा कचेश्वर व शुक्राचार्य कन्या देवयानी यांचे प्रेम फुलले ते याच बेटातील गोदाकाठी.
कचेश्वर देवयानीच्या आणाभाका गोदामाईने आपल्या मनात जपुन ठेवल्या आहेत. ऋषीवर्य लढ्यात मृत झालेल्यांना संजीवनी मंत्राचा उच्चार करुन परत जिवंत करीत. संजीवनी पार अद्यापही विष्णु मंदिरालगत ठाण मांडुन आहे.
श्रीमंत रघुनाथरावदादा पेशवे यांना महाराष्ट्राची प्रति राजधानी कोपरगांव पासुन 7 किलोमिटर अंतरावर असलेल्या हिंगणी येथे उभी करावयाची होती. कारण याठिकाणी गंगा दक्षिण वाहिनी झालेली आहे.
हिंगणी येथे वाडा बांधण्यांस प्रारंभ झाला सुमारे 1 हजार फुट लांबीचा, 600 फुट रुंदीचा व 30 फुट उंचीच्या या वाडयाच्या फक्त तीन भिंतीच बांधुन झाल्या. चौथी भिंत बांधत असताना कोपरगांव येथे राघोबादादांचे देहावसन झाले. दादांचे स्वप्न अपुरेच रहिले.
राघोबादादा म्हणजे धिप्पाड, पराक्रमी आणि गरुडभरारी करणारा खरा राघोभरारी, अखेरपर्यंत ते झुंज देत राहिले. कावेबाज व हिकमजीपणा त्यांच्याजवळ होताच. अशा सेनापतीस गुरुवार दिनांक 11.12.1783 मध्ये तरण झाले. त्यावेळी त्यांचे वय 49 वर्षाचे होते तर आनंदीबाई अवघ्या 35 वर्षाच्या होत्या.
विविध खटापटी करुन पेशवेपद संपादण्यांचे राजकारणातील त्यांचे स्वप्न अधुरे राहिले दादांच्या अतृत्प इच्छेची साक्ष देणारा हिंगणी वाडा आजही तीन भिंतीच्या रुपांने उभा आहे. राघोबादादांचे निधन कोपरगाव बेटात झाले. मात्र अत्यंविधी हिंगणी वाडयात करण्यांत आला. समाधी उभी करुन तेथे एक सुंदर वृंदावन आनंदीबाईंनी उभारले. दिनांक 3.9.1788 मध्ये बांधलेले वृंदावन व मंदिर माहपुराने उध्दवस्त होवुन वाहुन गेले. बेटात आज जी अनेक मंदिरे दिसतात ती राघोबादादा आणि आनंदीबाई यांच्या प्रेरणेचाच भाग होता.
सन 1792 मध्ये एकामागुन एक प्रतिकुल घटना घडत गेल्या. त्याने आनंदीबाई पुर्ण उदास झाल्या. कोपरगांवच्या या वाडयात कुणांसाठी रहायचे असा प्रश्न त्यांना पडला. आनंदीबाईंनी नाशिक जिल्हयातील आनंदवल्ली हे स्थान पुढील वास्तव्यासाठी निवडले. दिनांक 29.3.1794 रोजी आनंदीबाईचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या साऱ्या महत्वकांक्षा मतभेद तेथेच विरले.
सन 1798 मध्ये राघोबादादांचे दुसरे पत्र बाजीराव पेशवे यांनी मराठयांच्या छत्राखालील पेशव्याविरुध्द जाऊन वसई येथे इंग्रजाबरोबर तह केला. त्यातुनच दुसरा कट शिजला. हैद्राबादचा टिपु सुलता, इंग्रज आणि बाजीराव पेशवे यांनी पुण्यांत जाऊन शनिवार वाडयावर हल्ला केला. त्यात महाल उध्दवस्त झाला. वडज जवळ लढाई होवुन मराठयांना पराभव पत्करावा लागला.
अशा प्रकारे शिवरायांनी 1674 मध्ये स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य सन 1818 मध्ये विलयास गेले.
सन 1804 मध्ये बाळाजी पेशवे खानदेश प्रांताचे सरदार बनले. त्यावेळी कोपरगांवी 7 हजार भिल्ल सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. तेव्हा दुसऱ्या बाजीरावांचा खानदेशचा सुभेदार बाळाजी लक्ष्मण याने सेनापती म्हणुन मोहनगीर गोसावी यांची नेमणुक केली. मोहनगीरने मोठा पराक्रम करुन बंड पुर्णत: मोडुन काढले.
आष्टीच्या लढाईनंतर दुसरा बाजीराव पळता पळता दोन वेळा परत कोपरगांवी राहिला होता. त्यावेळी मद्रास टुपने कोपरगांव काबीज केले. त्या लढाईत असंख्य युरोपियन कामी आले. गोदावरी नदीकाठी अनेक विहिरीत युरोपियन सैनिकांना ढकलुन त्यांचे दफन करण्यांत आले. ती विहीर आज देवीच्या मंदिरालगत पहावयास मिळते.
राज्याच्या पेशवाईचा शौर्याचा अटकेपार झेंडा रोवणांऱ्या राघोबादादा पेशव्यांनी कचेश्वर शुक्लेश्वरची पावनभुमी कोपरगांव बेट येथे गोदातिरी बांधलेल्या चिरेबंदी वाडयाचा इंग्रजांनी लिलाव केला.
आनंदीबाईंनी ध चा मा केल्यानंतर श्रीमंत राघोबादादांना व आनंदीबाईंना दुसरा बाजीराव, दुसरा चिमाजी आप्पा व दत्तकपुत्र अमृतरावसह कोपरगांव येथे विजनवासात ठेवण्यांत आले. राघोबादादांनी कोपरगांव शहरानजिक बेटात व शहरात आनंदीबाईसाठी दोन वाडे बांधले. कोपरगांव येथे राहणांऱ्या आनंदीबाई व त्यांच्या तीन मुलांवर लक्ष्य ठेवण्यांसाठी नाना फडणीसांनी बालंभट नावाच्या गृहस्थाची नेमणुक केली. त्यांनी आनंदीबाईच्या बारीकसारीक हालचाली टिपुन ठेवल्या आहेत. ध चा मा केल्याच्या आरोपाची कोणतीही शहानिशा न करता आम्हांला येथे निष्कारण कोंडून ठेवल्याचे आनंदीबाईंनी म्हटल्याचे रोजनिशीत लिहिले आहे.
शेवटी आनंदीबाईंचे गंगापुर येथील वाड्यात निधन झाले. दरम्यान इंग्रजांनी बेट येथील वाड्याची वाताहात लावली. चिरेबंदी असलेल्या वाड्याचा लिलाव केला. त्यातील घडीव दगड येवल्याचे गंगाधन छबीलदास यांनी नेऊन मुरलीधर मंदिर उभारले तर काही दगड व कोरीव नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे जहागीरदार कृष्णराव शिंदे यांनी वारी येथे नेऊन वाडा उभारला अशी माहिती इतिहास संशोधक सुरेश जोशी यांनी दिली.
इंग्रजांच्या तावडीतून बचावलेला शहरातील राघोबादादांचा वाडा पुरातत्व विभागाकडे आहे. दीड कोटी रुपये खर्च करुन पुन्हा नवीन रुप देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर हिंगणीच्या वाड्याच्या संरक्षक भिंती अजुनही ताठ मानेने उभ्या आहेत. याशिवाय शिवकालीन महाभारताचे भाष्यकार निळकंठ शास्त्री व त्यांचे वडील गोंविंद शास्त्री चौधरी कोपरगांव येथील बेटातीलच रहिवासी होते. सामाजिक शास्त्र शाखांची वैचारिक आणि सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाची क्षितीजे विस्तारण्यांसाठी मोठी मदत मिळणार आहे.
कोपरगांव येथील बेटातील शुक्राचार्य मंदिर व देवगुरूपुत्र कचेश्वर मंदिर यांच्या परिसराचा जिर्णोद्धार व्हावा म्हणून विश्वस्थ मंडळ स्थापन झाले असून मंदिर परिसर आकर्षक करण्याचा भाग आहे.
लेखक: स. म. कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार, कोपरगांव
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 6/26/2020
खाद्या गावात काय दडले आहे हे अनेकदा त्या गावापुरते...
जन्म, विवाह, घटस्फोट, आजार, मृत्यू, स्थलांतर इ.
कोल्हापूरात काही चौक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे अ...
शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्ह...