(जम्हूरिजा–अल्–यमन–अल्–दिमुक्रतिया–अल्–शअबिजा). अरबस्तान द्वीपकल्पाच्या द. किनारपट्टीवर एडन व त्याभोवतीचा प. एडन संरक्षित प्रदेश आणि पूर्व एडन संरक्षित प्रदेश मिळून ३० नोव्हेंबर १९६७ रोजी निर्माण केलेला देश. हा देश १२° उ. ते १९°उ. व ४२° पू. ते ५४° पू. यांदरम्यान असून क्षेत्रफळ २,८८,००० चौ.किमी. व लोकसंख्या १६,३३,००० (१९७४ अंदाज) आहे. अरबी समुद्रातील सोकोत्रा, तांबड्या समुद्रातील पेरिम व कामारान या बेटांवरही या देशाचा हक्क आहे. याच्या वायव्येस येमेन,उत्तरेस सौदी अरेबिया, पूर्वेस ओमान हे देश आणि दक्षिणेस एडनचे आखात आहे. देशाची एडन ही अनधिकृत व मेडिनेत अल् शाब ही प्रशासकीय राजधानी आहे.
प्राकृतिक दृष्ट्या देशाचे चार भाग पडतात:
(१) पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेश–हे पर्वत येमेनमधील उंच पर्वतांचेच भाग असून त्यात पठारे व जास्तीत जास्त २,४३२ मी. उंचीची शिखरे आहेत.
(२) दक्षिणेकडील मैदानी किनारपट्टी–ही किनारपट्टी तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यापासून एडनच्या आखातावरील रास धारबैत ॲली भूशिरापर्यंत पसरली असून शेतीयोग्य आहे.
(३) उत्तरेकडील वाळवंटी प्रदेश–हा प्रदेश सौदी अरेबियाच्या रब–अल्–खली या प्रसिद्ध वाळवंटाचाच भाग असून त्याची स. स. पासून सरासरी उंची ७६२ मी. आहे.
(४) पूर्वेकडील जोल पठाराचा प्रदेश–हे पठार ९१४ ते १,२१९ मी. उंच असून लांब व सुपीक दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. देशातील नद्यांचे प्रवाह आखुड व आंतरिक असून फक्त वाडी हाजर हा प्रवाह सर्वांत लांब, बारमाही वाहणारा आहे. वाडी मसीलाह या प्रवाहाचा काही भागच बारमाही वाहणारा आहे. वाडी हड्रामाउत ही पठारावरील सर्वांत लांब व सुपीक खोरे असलेली नदी आहे. हा प्रदेश सर्वसामान्यपणे अग्निजन्य खडक, चुनखडीचा खडक व वाळूचा खडक यांनी बनलेला आहे.
पश्चिमेकडील पर्वतमय प्रदेश व पठारी प्रदेश वगळता देशात सर्वत्र उष्ण व विषम हवामान आहे. हिवाळ्यात पर्वतीय भागात गोठण बिंदूपर्यंत तपमान खाली येते. नैर्ऋत्य मोसमी हवामानाच्या काळात तपमान कधीकधी ३८° से. पेक्षा जास्त असते, त्यावेळी हवेत आर्द्रतेचे प्रमाण सु. ८०% असून धुलिकण असलेला सोसाट्याचा वारा वाहतो.
किनारी प्रदेशात पाऊस विशेषतः हिवाळ्यात पडतो, तर अंतर्गत डोंगराळ प्रदेशात पाऊस मुख्यतः उन्हाळ्यात पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात ३० सेंमी. आणि पूर्वेकडील पठारी प्रदेशात सु. २० सेंमी. असते.
द. येमेनमध्ये विविध प्रकारची वनस्पती आढळते. किनारपट्टी व डोंगरपायथ्याशी माडाची झाडे विपुल असून कोरफड व निवडुंग बऱ्याच प्रमाणात वाढतात. कॅक्टेसीसदृश असणारे पुष्कळ प्रकारांचे निवडुंग येथे आहेत. डूम ताड, बोर, झाऊ, बाभळ, खजूर ही मोठ्या वृक्षांपैकी असून मुख्यतः पूर्वेकडील पठार व वाडी हड्रामाउत खोऱ्यात वाढतात.
इतरत्र ऊद, कण्हेर, लाजाळू, निवडुंग, काटेरी झुडुपे, काही विरळ गवत व हिराबोळ ह्या वनस्पती मुख्य आहेत. सोकोत्रा बेटावर कोरफड, ताड, पाइन, डाळिंब, काकडी इ. वनस्पती मुख्य असून दगडफूल व शेवाळेही आहे.
वन्य प्राण्यांमध्ये रान बकरा (आयबेक्स) व आफ्रिकन काळवीट हे दोन प्राणी अतिशय महत्वाचे आहेत. सोकोत्रा बेटावर कस्तुरी मांजर आढळते. द. किनाऱ्यावर सार्डिन व शार्क मासे विपुल प्रमाणावर सापडतात. सरडे व घोरपडीसारखे काही सरपटणारे प्राणीही आढळतात. कुत्रा, मांजर शेळ्या–मेंढ्या, गाढव, घोडा व उंट हे पाळीव पशू आणि गरुड, माळढोक, ससाणा, हुप्पी (सुतार पक्ष्यासारखा), चंडोल, कबूतर, तित्तिर इ. पक्षी सर्वत्र आढळतात.
येथे मानवी वस्ती प्राचीन काळापासून आहे. वाडी हड्रामाउत खोऱ्यातील लोकांचा आग्नेय आशियाशी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. त्याकाळी अनेक छोटी राज्ये उदयास आली होती; त्यात सबियन, मिनियन, हिम्यराईट इ. महत्वाची होती. शिवाय गाट्टूम या गावात तत्कालीन प्रेक्षणीय अवशेष आजही पहावयास मिळतात. सातव्या शतकात इस्लामचे आगमन झाले व बराच काळ या प्रदेशावर येमेनच्या इमामाची नामधारी सत्ता होती.
१८३४ मध्ये ब्रिटिशांनी एडन जिंकले. १८६९ साली सुएझ कालवा सुरू होताच एडनची भरभराट झाली. १९६० मध्ये एडन जगातील चवथ्या क्रमांकाचे बंदर होते. पहिल्या महायुद्धानंतर या भागात राजकीय हालचाली सुरू झाल्या.
तुर्कस्तानचे ऑटोमन साम्राज्य लयास गेल्यानंतर येमेन स्वतंत्र झाला व त्यापासून एडनला धोका उत्पन्न होणार, हे पाहताच ब्रिटनने पूर्वेस व पश्चिमेस संरक्षित प्रदेश निर्माण केले व स्थानिक छोटी राज्ये एकत्र आणली.
१९५० मध्ये ब्रिटनने त्यांचे एक राज्य बनवण्याचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीस पूर्व व पश्चिम संरक्षित प्रदेशातील राज्ये साशंक असल्याने त्यांनी हा प्रस्ताव मानला नाही; पण जेव्हा येमेनने ईजिप्तशी हातमिळवणी केली तेव्हा ही राज्ये एकत्र येण्यास तयार झाली.
अशा राज्यांत सामील होण्यास एडनवासियांचा विरोध होता; पण तो न जुमानता ब्रिटिशांनी १९६३ मध्ये एडनचे त्या राज्यात सामिलीकरण केले. १९६३ ते १९६७ पर्यंतचा काळ अशांततेचा होता.
नॅशनल लिबरेशन फ्रंट व फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ साउथ येमेन हा दुसरा पक्ष ब्रिटिशांशी स्वातंत्र्यासाठी व आपसात राजसत्तेसाठी संघर्ष करीत होते. त्यांत नॅशनल लिबरेशन फ्रंट हा पक्ष विजयी होऊन ३० नोव्हेंबर १९६७ रोजी द. येमेन स्वतंत्र झाला.
आजचे नाव १९६९ मध्ये स्वीकारण्यात आले. आज देशात एकपक्षीय सत्ता असून नॅशनल लिबरेशन फ्रंट हा एकमेव पक्ष वैध आहे. अध्यक्ष हा देशाचा कारभार पहात असून तोच सैन्यदलांचा प्रमुख आहे.
९७१ मध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या आदेशानुसार देशामधील पहिली पीपल्स सुप्रीम असेंब्ली स्थापन करण्यात आली. कायमस्वरूपी परिषद निवडून येईपर्यंत सध्या १०१ सदस्यांची हंगामी सर्वोच्च जनता परिषद हीच वैधानिक कारभार पहात आहे. प्रशासनाच्या दृष्टीने देशाचे सात गव्हर्नरशासित विभाग करण्यात आले आहेत. सलीम रूबायी अली हे राष्ट्राध्यक्ष व अली नाझेर मुहंमद हसानी हे पंतप्रधान आहेत (जानेवारी १९७६).
१९७६ मध्ये एकूण सेनाबल १८,००० असून त्यांपैकी १५,२०० भूसेनेत, ३०० नौसेनेत व २,५०० वायुसेनेत होते. १९७० पासून सोव्हिएट रशिया व चीन यांच्या साहाय्याने सैन्याची पुनर्रचना करण्यात आली.
१९७२ मधील संरक्षण खर्च १ कोटी दिनार होता.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/24/2020
कुलाबा जिल्हा : महाराष्ट्राचा पश्चिम सरहद्दीवरील अ...
पोरबंदर : गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यातील एक ...
मंगलोर : कर्नाटक राज्यातील दक्षिण कानडा जिल्ह्याचे...
केरळ : मलबार. भारताच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातील अरबी स...