অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केरळ

केरळ

मलबार. भारताच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सर्वांत दक्षिणेचे चिंचोळे राज्य. क्षेत्रफळ ३८,८६४ चौ. किमी. लोकसंख्या २,१३,४७,३७५ (१९७१). ९ १५' उ. ते १२ ५३' उ. आणि ७४ ४६' पू. ते ७७ १५' पू.; दक्षिणोत्तर लांबी सु. ५४४ किमी. कमाल पूर्व - पश्चिम रुंदी मध्यभागात सु. १२० किमी. केरळच्या सीमांवर उत्तरेस व पूर्वेस कर्नाटक, पूर्वेस व दक्षिणेस तमिळनाडू ही राज्ये आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या १·२ टक्के क्षेत्रफळ आणि ३·९ टक्के लोकसंख्या असलेल्या या राज्याची राजधानी त्रिवेंद्रम आहे

भूवर्णन

केरळचे तीन ठळक उत्तर-दक्षिण नैसर्गिक विभाग पडतात :

(१) समुद्रकिनाऱ्याची गाळपट्टी :सध्याचा प्रत्यक्ष किनारा प्राचीन काळच्या किनाऱ्यापेक्षा समुद्रात बराच पुढे सरकलेला आहे. आख्यायिकांतील व वाङ्मयातील ज्या ग्रामनामांत बंदर किंवा बेट या अर्थी शब्द आहेत, अशा गावांची एक ओळच आजच्या किनाऱ्यापासून सु. १३ किमी. पर्यंत आत दूर राहिली आहे. सध्याच्या किनाऱ्यापासून समुद्रात थोडे दूर रेती व गाळ मिळून झालेले ०·५ ते ११ किमी. रुंदीचे, नारळीच्या बनांनी आच्छादित असे जमिनीचे पट्टे तयार झाले आहेत.

त्यांच्या आणि मुख्य भूमीच्या दरम्यान असलेला 'कायल' (खारकच्छ), त्याचप्रमाणे पश्चजलाने बनलेल्या आडव्या खाड्या, हे केरळचे वैशिष्ट्य आहे. किनाऱ्याला समांतर असे हे तुटक जलाशय कालव्यांनी व बोगद्यांनी जोडून पोन्नानी नदीमुखापासून त्रिवेंद्रमपर्यंत सु. ३२० किमी. लांबीचा अंतर्तट जलमार्ग करण्यात आला आहे.

पावसाळ्यात नदीमुखांनी या जलाशयात गोडे पाणी येते व उन्हाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राकडून खारे पाणी येते. वेंबनाड हे मोठे खारकच्छ कोचीन बंदराच्या मुखापासून दक्षिणेकडे रुंद होत गेलेले आहे. त्याच्या मुखाजवळील गाळ व रेती उपसून काढल्यावर कोचीन बंदर मोठ्या जहाजांना उपयोगी झाले. याच्या आतील किंवा पूर्वकाठाच्या गाळजमिनींवर भाताची दुबार पिके काढण्यात येतात.

(२) मध्य विभागाचा पठार प्रदेश : हा समुद्रसपाटीपासून ६० ते १९० मी. उंचीच्या जांभ्या खडकाचा आणि दाट गवताने व झुडुपांनी आच्छादित असा आहे. त्यात मधून मधून सपाट भाग, सुट्या टेकड्या व पूर्वेकडील पर्वतराजींचे उतरत आलेले फाटे आहेत.

(३) पर्वत विभाग : यात पश्चिम घाटाच्या सर्वांत दक्षिणेकडील अनाइमलई (अन्नमलई) व एलाचल (कार्डमम्) या वायव्य-आग्नेय श्रेणी आणि त्यांचे फाटे येतात. या पर्वतात पाऊस खूप असून त्यांवर दाट अरण्ये आहेत. पर्वतांच्या आतारावर चहा, कॉफी, वेलदोडे, मिरी इत्यादींचे व रबराचे मळे आहेत. भारतीय द्वीपकल्पावरील सर्वोच्च (२,६९५ मी.) अनइमुडी शिखर अनाइमलई पर्वतात आहे. एलाचल पर्वतात पेरियार तलाव, पीरमेड पठार, त्याभोवती १,५५० मी. हून अधिक उंचीच्या श्रेणी आणि अगस्त्यमलई व महेंद्रगिरीसारखी सुटी शिखरे आहेत

किनाऱ्याच्या सुट्या पट्ट्यांवर रेतीमिश्रित गाळ, आतल्या किनाऱ्याला नदीगाळ, मध्य पठारावर जांभ्या खडकाची झालेली निकृष्ट जमीन आणि पर्वतभागात नीस खडकाचा भुगा व वनप्रदेशातील कुजलेला पाला पाचोळा मिळून झालेली माती, हे केरळमधील मृदांचे मुख्य प्रकार आहेत.

आधुनिक काळात महत्त्व पावलेली मोनाझाइट, इल्मेनाइट, रूटाइल, झिरकॉन, सिलिमनाइट व गार्नेट ही खनिजे किनाऱ्याच्या वाळूत सापडतात. पांढऱ्या चिकणमातीचे मोठाले साठे राज्यात असून अभ्रक, ग्रॅफाइट, चुनखडक, सिलिका वाळू आणि लिग्नाइट यांचाही आढळ झाला आहे. त्याचप्रमाणे अलेप्पी व एर्नाकुलम् जिल्ह्यांत काचधंद्याला उपयोगी पांढरी वाळू आणि क्विलॉन, त्रिचूर व कननोर जिल्ह्यांत पांढरा शाडू सापडतो.

श्चिम घाटात उगम पावून थोड्याच अंतरावर अरबी समुद्राला मिळणाऱ्या अनेक छोट्या नद्यांपैकी सर्वांत लांब, २२४ किमी., पेरियार नदी आहे. पर्वत प्रदेशात ९३० मी. उंचीवर तिला धरण बांधून तिचे काही पाणी बोगद्यातून पूर्वेकडे तमिळनाडूच्या मदुरा जिल्ह्याला दिले आहे. तिच्या मुखाकडून ९६ किमी.

पर्यंत जलवाहतूक होऊ शकते. पोन्नानी, बैपोर, कुट्टीयादी, चलाकुडी, पंबियार, शोलायार, चलिआर, पांबा, कडालंडी, इडिक्की, कल्लदा, वलयार अशा इतर लहान लहान नद्यांपैकी कित्येक थेट समुद्राऐवजी आडव्या खाड्यांना मिळतात. त्यामुळे झालेली काही मोठी सरोवरे त्रिचूर, कोचीन आणि अलेप्पीजवळ आहेत. शिवाय त्रिवेंद्रमजवळचे वेल्लानी व क्विलॉनजवळचे शास्तानकोझ यांसारखी गोड्या पाण्याची आणखी काही सरोवरे राज्यात आहेत. केरळातील बऱ्याच नद्यांवर प्रकल्प कार्यवाहीत आहेत. राज्याच्या पश्चिम सीमेला सु. ५९० किमी. लांबीचा सलग समुद्रकिनारा आहे.

विषुववृत्तीय हवामान भारतात जास्तीत जास्त प्रमाणात केरळचेच आहे. कमाल तपमान ३२·२ से. च्या वर क्वचितच जाते व किमान तपमान २१·१ से. च्या खाली सामान्यतः येत नाही. पाऊस उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत येतो; तो कोझिकोडे येथे २९७ सेंमी. तर त्रिवेंद्रमला १६० सेंमी. असतो. पर्वतप्रदेशात मात्र पर्जन्यवर्षाव ४५० सेंमी. पर्यंत होतो. दक्षिण भागातला पाऊस वर्षभर थोडाथोडा पडत राहतो; कारण त्या भागाला पावसाळ्याच्या दोन्ही मोसमांचा फायदा मिळतो.

राज्याचा जवळजवळ चौथा भाग वनाच्छादित आहे. पर्वतप्रदेशातील उष्ण कटिबंधीय दाट जंगलांतून शिसवी, साग, रक्तचंदन, सीडार, वेंगाई अशा वृक्षांचे मूल्यवान लाकूड मिळते.

उंच डोंगरांच्या उतारावरून चहा, कॉफी व वेलदोड्याचे मळे आहेत. सखल उतारावर रबर, मिरी, सुंठ, हळद यांचे उत्पादन होते. मध्यभागातील पठारावर टॅपिओका हे कंद आणि सपाट प्रदेशात व किनाऱ्याला भातपिके निघतात, तसेच नारळाची दाट बने आणि सुपारीच्या बागाही आहेत. येथे जमिनीला पाणी कसे द्यावे यापेक्षा पाणी काढून कसे लावावे, हा प्रश्न पडतो. उंच बांधांमधील पाटांपेक्षा शेते खालच्या पातळीवर असतात आणि पावसाळ्यानंतर शेतांतील पाणी रहाटगाडग्यांनी किंवा आता विजेच्या पंपांनी उपसून पाटांत सोडावे लागते. जरूरीप्रमाणे हे पाणी शेतात सोडता येते.

काजू, फणस व आंब्याची झाडे उंच पर्वतांखेरीज सर्वत्र दिसतात. अरण्यातून हत्तीचे व गव्याचे कळप, अनेक जातींचे हरिण व वानर, वाघ, चित्ता, अस्वल, रानडुक्कर त्याप्रमाणे नाना रंगांचे व स्वरांचे असंख्य पक्षी अनेक जातींचे सर्प आहेत. किनाऱ्यालगतच्या समुद्रात बटरफिश, अँकोवी, सार्डिन, मॅकरल, कॅटफिश, शार्क इ. मासे विपुल मिळतात. खाऱ्या व गोड्या पाण्यांतही कोळंबी व झिंग्यांसारखे कवची जलचर उपलब्ध आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate