অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेअरबुर्ग

शेअरबुर्ग

शेअरबुर्ग

फ्रान्सच्या मांश विभागातील सर्वांत मोठे शहर, नाविक तळ असलेले प्रमुख सागरी बंदर व एक हवेशीर ठिकाण. लोकसंख्या २८,३२४ (१९८२). फ्रान्सच्या वायव्य भागातील कोतांतँ द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाशी, इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. दिव्हेत ही छोटीशी नदी येथेच इंग्लिश खाडीला मिळते. प्राचीन काळापासून हे शहर अस्तित्वात असावे. सीमारक्षक चौकी म्हणून रोमनांनी याची स्थापना केली असावी.

मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे फ्रेंच व इंग्रज यांच्यात वारंवार येथे लढाया झाल्या. इ.स. तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत इंग्रजांनी वारंवार हल्ले करून ते आपल्या ताब्यात ठेवले होते. लाटांचा जोर कमी करून बंदरातील गोदी सुरक्षित राखण्यासाठी येथे कृत्रिम रोधक किंवा मोठा बांध (ब्रेकवॉटर) घालण्यात आला आहे. या बांधकामास चौदाव्या लूईच्या कारकीर्दीत सुरुवात झाली व सत्तर वर्षांनंतर बांध पूर्ण झाला. याच काळात शहराभोवती तटबंदी घालण्यात आली. सप्तवार्षिक युद्धात ब्रिटिशांनी शहराचा विध्वंस केला होता. १७७९ ते १८५३ या कालावधीत या बंदराचा हळूहळू विकास होत गेला. दुसऱ्या महायुद्धकाळात येथे जर्मनीचा लष्करी तळ होता.

१९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हे शहर मुक्त केले.

शेअरबुर्ग हे एक महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे. जहाजबांधणी व दुरुस्ती, वस्त्रनिर्मिती, धातु-उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, आण्विक पाणबुड्या निर्मिती व मासेमारी हे उद्योगधंदे येथे चालतात. इंग्लिश खाडीमार्गे अटलांटिककडे जाणाऱ्या जलमार्गावरील हे थांब्याचे ठिकाण असल्याने आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे उघडली आहेत. इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील आधुनिक बंदरांच्या मानाने आज हे बंदर लहान असले, तरी मध्ययुगीन काळात हे एक प्रमुख मासेमारी व व्यापारी बंदर होते.

आजही इंग्लिश खाडीवरील फ्रेंचांचे हे एकमेव आरमारी सागरी बंदर आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ' म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी अँड एथनॉग्राफी' येथे आहे. शहराच्या जवळच ला हेग येथे अणुशक्ती-प्रकल्प आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate