অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हॅलपारेझो

व्हॅलपारेझो

व्हॅलपारेझो

चिलीमधील याच नावाच्या प्रांताची राजधानी, देशातील मोठे शहर व एक प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या २,८३,४८९ (१९९७ अंदाज) देशाची राजधानी सँतिआगोच्या वायव्येस १२० किमी. अंतरावर, व्हॅलपारेझो या उपसागराच्या किनाऱ्यावर हे वसले आहे. उपसागराच्या पार्श्वभागी असलेल्या टेकड्यांपर्यंत याचा विस्तार आढळतो.

स्पॅनिश जेता ह्वान दे साआव्हेद्रा इ.स.१५३६ मध्ये कँतँ या एका छोट्याशा मासेमारी खेड्यावर पोहोचला. स्पेनमधील आपल्या जन्मस्थळावरून त्याने या स्थळाला व्हॅलपारेझा (व्हॅली ऑफ पॅरडाइज) हे नाव दिले. वसाहतकाळात याला विशेष महत्त्व होते. १५७८ मध्ये सर फ्रान्सिस ड्रेक याने, तर त्यानंतर वीस वर्षांनी सर जॉन हॉकिन्झ याने हे आपल्या ताब्यात घेतले. इ.स. १६०० मध्ये व्हॅन नूर्त या डच चाच्याने येथे लुटालूट केली.

१८१८ मधील चिलीच्या स्वातंत्र्यापासून स्पॅनिशांची येथील व्यापारी मक्तेदारी कमी झाली. मेंदिझ नून्येथ याच्या नेतृत्वाखाली १८६६ मध्ये स्पॅनिश वसाहतकार येथे आले. शहराला भूकंप, जाळपोळ, चाचेगिरी व जोराची वादळे यांचा वारंवार तडाखा बसत राहिला. १८९१ मध्ये उसळलेल्या दंगलीत चिली लोकांनीच शहराच्या काही भागाचा विध्वंस केला. इ.स. १७३०, १८२२, १८३९, १९०६-०७ व १९७१ मध्ये झालेल्या भूकंपांमुळे शहराची खूपच हानी झाली. वसाहतकालीन शहराचे अवशेष अजूनही येथे पहावयास मिळतात.

नवीन व्हॅलपारेझा शहर एकोणीस टेकड्यांच्या उतारांवर वसविण्यात आले असून, त्याचा आकार साधारणपणे अर्धवर्तुळाकार आहे. भूमिस्वरूपामुळे सपाटीवरील शहर व जास्त उंचीवरील शहर असे ह्याचे दोन विभाग दिसतात. बंदर, प्रशासकीय इमारती व व्यापारी विभाग हे उत्तरेकडील उपसागर किनाऱ्यावर असून लॉस सेरॉस हा निवासी विभाग दक्षिणेकडे, टेकड्यांच्या तीव्र उतारांवर आहे.

उपसागर किनाऱ्यावरील विभाग व उंचावरील विभाग एकमेकांशी नागमोडी रस्ते, पायऱ्या, उत्थापक व तारेवर चालणाऱ्या गाड्यांनी जोडलेले आहेत. समुद्र हटवून आधुनिक बंदराचा विस्तार करण्यात आला असून, तेथे मोठ्या वखारी, शक्तिशाली विद्युत याऱ्या व ४,५०० टनी सुकी गोदी आहे.

९१० मी. लांबीच्या लाटारोधक बांधाने बंदर सुरक्षित केले आहे. चिलीची मोठी आयात या बंदरातून होत असून, देशांतर्गत किनारी प्रदेशातील व्यापार या बंदरातून चालतो.

निऱ्या मात्र या बंदरातून विशेष चालत नाही. पॅन अमेरिकन महामार्गांशी, चिलीतील दक्षिणोत्तर लोहमार्गांशी व्हॅलपारेझो जोडले असून, अर्जेंटिनातील ब्वेनस एअरीझपर्यंत जाणाऱ्या ट्रान्स अँडीयन लोहमार्गाचे हे पश्चिमेकडील अंतिम स्थानक आहे. हे देशातील महत्त्वाच्या ठिकाणांशी हवाई मार्गांनी जोडलेले आहे.

वस्त्रे, साखर, व्हार्निश, रंग, काचेचा मुलामा, सरकीचे तेल, बूट, कातडी कमावण्याचे पदार्थ, कातडी वस्तू, औषधे, सौंदर्यप्रसाधने, खनिजतेल, पदार्थ, धातूच्या वस्तू, रसायने इ. येथील प्रमुख उत्पादने आहेत. दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठे फ्रेदेरिको सांता मारिआ तंत्रशिक्षण विद्यापीठ (स्था. १९२६) येथेच आहे. त्याशिवाय व्हॅलपारेझो कॅथलिक विद्यापीठ (१९२८) व चिलीयन नाविक अकादमी, प्रकृतिविज्ञान व ललितकला यांची वस्तुसंग्रहालये येथे आहेत. शहराचा किनारी प्रदेश व व्हीन्य देल मार उपनगर ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate