टांझानियाच्या झांझिबार बेटाचे कारभाराचे ठाणे व व्यापारी बंदर. लोकसंख्या ६८,४९० (१९६७ अंदाज). बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे नैसर्गिक, सुरक्षित व खोल बंदर असून येथून मुख्यतः लवंगा, खोबरे, खोबरेल तेल व कच्छ वनस्पतीची साल निर्यात होते.
जगाला लवंगांचा पुरवठा येथूनच होतो. एकोणिसाव्या शतकात हे गुलामांच्या व्यापारासाठी कुप्रसिद्ध होते. हस्तिदंताचाही व्यापार चाले.
झांझिबार हे प्रमुख्याने मुस्लिम शहर आहे. शिया व सुन्नी या दोन्ही पंथांप्रमाणे अल्प प्रमाणात इस्माइली, खोजा, बोहरी, हिंदू, जैन, बौद्ध, शिख, ख्रिस्ती लोकही आहेत.
झांझिबारच्या अरबी लाकडी पेट्या आणि कोरीवकामाचे विशिष्ट दरवाजे प्रसिद्ध आहेत.
लिमये, दि. ह.; कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/6/2020