पूर्व आफ्रिकेतील टांगानिका आणि झांझिबार बेट (पेंबासह) मिळून १९६४ मध्ये अस्तित्वात आलेले संयुक्त प्रजासत्ताक. विस्तार १° द. ते ११° ४५' द. २९° २१' पू. ते ४०° २५' पू. यांदरम्यान द. उ. सु. १,१८४ किमी. पू. प. सु. १,२१६ किमी. असून क्षेत्रफळ ९,४५,२०८ चौ. किमी.–पैकी मुख्य भूमीचे क्षेत्रफळ ९,४२,०५६ चौ. किमी. आणि त्यापैकी ५९,०६५ चौ. किमी. पाण्याखाली आहे. झांझिबार बेटाचे क्षेत्रफळ सु. १,६५८ चौ. किमी. असून पेंबा बेटाचे सु. ९८४ चौ. किमी. आहे. मुख्य भूमी आणि ही बेटे यांदरम्यान सु. ३६ किमी. रुंदीची खाडी आहे.
यांच्या दक्षिणेचे सु. ५१८ चौ. किमी. माफीआ बेट टांझानियातच समाविष्ट आहे. संयुक्त प्रजासत्ताकाची लोकसंख्या १,२२,३१,३४२ (१९६७) असून त्यापैकी १,१८,७६,९८२ मुख्य भूमीवर व झांझिबारमध्ये ३,५४,३६० (झांझिबार १,९०११७; पेंबा १,६४,२४३) आहे. १९७३ चा अंदाज १,४३,७६,६०० चा आहे. टांझानियाच्या उत्तरेस केन्या आणि युगांडा असून व्हिक्टोरिया सरोवराचा जवळजवळ निम्मा भाग टांझानियात आहे.
पूर्वेस हिंदी महासागर असून दक्षिणेस मोझँबीक–टांझानिया सरहद्दीवर रूवूमा नदी आहे. नैऋत्येस झँबिया व मालावी असून मालावी न्यासा सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावर हक्क सांगत आहे, तर टांझानियाला टांझानिया, मालावी व मोझँबीक एकत्र येतात त्या ठिकाणापर्यंत सरोवरातून जाणारी सरहद्द हवी आहे. पश्चिमेस निम्मे टांगानिका सरोवर टांझानियाचे असून त्यापलीकडे झाईरे व वायव्येस रूआंडा, बुरूंडी आहे. डोडोमा ही टांझानियाची नवी राजधानी आहे; जुनी दारेसलाम होती.
पूर्वेकडील सु. १६ ते ६४ किमी. रुंदीची व सु. ८०० किमी. लांबीची सखल किनारपट्टी सोडल्यास मुख्य भूमीची (टांगा निकाची) उंची सु. ३३० मी. आहे. प्रदेश पठारी व डोंगराळ असून सर्वांत उंच भूभाग सु. १,००० ते १,५०० मी. उंच आहे.
आफ्रिकेतील सर्वांत उंच पर्वत किलिमांजारो (५,८९५ मी.) देशाच्या ईशान्येस केन्याच्या हद्दीजवळ असून त्याच्या पश्चिमेस ४,५६५ मी. उंचीचा म्वेरू पर्वत आहे. जवळच एन्गोराँगोरो ज्वालामुखीचे वर्तुळाकार विवर आहे. किलिमांजारोच्या पश्चिमेस आणि नेट्रॉन सरोवराच्या दक्षिणेस ऑल डॉइन्यो लेंगाई हा येथील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
किनाऱ्याजवळ वायव्य-आग्नेय दिशेने गेलेले पारे व ऊसांबारा पर्वत असून दारेसलामच्या पश्चिमेस सु. २०० किमी. ऊलूगूरू व त्याच्या पश्चिमेस रूबेहॉर्न पर्वत आहे. यांच्या उत्तरेस ऊकागूरू पर्वत असून अगदी दक्षिणेस न्यासा सरोवराजवळ किपेनगेरे व लिव्हिंग्स्टन पर्वत आहे. यांच्या पश्चिमेस एम्बेया व रुंग्वे पर्वत असून त्यांच्या वायव्येस टांगानिका व रूक्वा सरोवरांच्या दरम्यान ऊफीपा पठार आहे. सामान्यतः पश्चिम, आग्नेय व ईशान्य भाग डोंगराळ आहेत.
झांझिबार व पेंबा ही प्रवाळी बेटे असून झांझिबारचा पूर्व भाग सखल व पश्चिम भाग सु. ६० मी. उंचीच्या प्रवाळी कटकांचा आहे. सर्वांत उंच कटक मसिंगिनी सु. ११९ मी. उंच आहे. पेंबाची सर्वांत जास्त उंची सिनिओन्गानी सु. ९५ मी. असून नद्यांच्या क्षरण कार्यामुळे काही भाग टेकड्यांनी बनलेला वाटतो.
झांझिबारमधील प्रवाह उत्तरेकडे व पश्चिमेकडे वाहतात. पूर्वेकडील प्रवाह प्रवाळी खडकांत लुप्त होतात. पेंबा बेटावर छोटे छोटे प्रवाह आहेत. मुख्य भूमीवरील सर्वांत मोठी नदी रूफीजी बहुतेक सर्व दक्षिण भागाचे जलवाहन करते आणि हिंदी महासागरास मिळते. किलिमांजारोत उगम पावल्यामुळे वितळणाऱ्या बर्फाचे पाणी मिळणारी पान्गानी, वामी, रूव्हू, रूवूमा, ग्रेट रूआहा, बेंकुरू इ. नद्याही हिंदी महासागरासच मिळतात. कागेरा व इतर बऱ्याच लहान नद्या व्हिक्टोरिया सरोवरास मिळतात. बुबू, वेंबेरे व इतर काही नद्या अंतर्गत द्रोणीप्रदेशात वाहत जातात. मध्यवर्ती पठारावरून जाणारी ऊगाला नदी टांगानिका सरोवराला मिळणाऱ्या मालागारासी नदीला मिळते.
सरहद्दीवरील व्हिक्टोरिया, टांगानिका व न्यासा या सरोवरांशिवाय रूक्वा, इयासी, नेट्रॉन, मान्यारा व इतर छोटी सरोवरे देशात आहेत. न्यासा, टांगानिका, इफसी, नेट्रॉन ही आफ्रिकेच्या प्रसिद्ध खचदरीत साचलेली आहेत. मालागारासी दलदल टांगानिका सरोवराला मिळणाऱ्या मालागारासी नदीच्या पूर्वेचा बराच मोठा प्रदेश व्यापते. यासारखे काही खोलगट प्रदेश खचदरीमुळे निर्माण झाले आहेत.
आर्द्र आणि उंच प्रदेशात स्फटिकी खडकांवर साचलेल्या पिंगट ज्वालामुखी मृदा आणि लोहयुक्त मृदा या सर्वांत उत्पादनक्षम आहेत. सु. १४० सेंमी. पर्जन्याच्या प्रदेशात कमी सुपीक असलेल्या पिवळ्या पिंगट किंवा पिवळ्या तांबूस मृदा आहेत. उत्तरेकडील व ईशान्येकडील पठारी प्रदेशातील मृदा सुपीक आहेत.
परंतु त्यांच्यातील पाणी बाष्पीभवनामुळे व वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जनामुळे बरेच कमी होते. मध्य पठारावर व दक्षिणेकडे वालुकाश्मावर आणि स्फटिकी खडकांवर नापीक, अम्ल, जंगली मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यातील मृदा योग्य जलवाहनाने सुपीक राखाव्या लागतात. ठिकठिकाणी विखुरलेली खडकाळ, दगडधोंड्यांनी युक्त मृदाही दिसते.
झांझिबारमध्ये वालुकायुक्त दुमट व गडद तांबड्या रंगाच्या सुपीक मृदा उंच भागात आढळतात. नदीखोऱ्यांच्या तळावर कमी सुपीक, राखी व पिवळ्या वालुकायुक्त मृदा आढळतात. पेंबा बेटावर पिंगट, दुमट मृदा व मधूनमधून नापीक वाळूचे भाग आहेत. झांझिबारमध्ये मृदांचे दहा, तर पेंबात आठ प्रकार आहेत.
टांझानियाचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे आहे. मात्र उंचीप्रमाणे तपमान व पर्जन्यमान यांत फरक पडत जातो. मार्च ते सप्टेंबर येथे आग्नेयीकडून हिंदी महासागरावरून आर्द्र वारे येतात.
एरवी ईशान्येकडून आशियातून येणारे वारे कमी आर्द्र असतात. मासिक सरासरी तापमानात व्हिक्टोरिया सरोवराजवळ म्वांझा येथे २° सें., किनाऱ्यावर दारेसलाम येथे ४° से. तर मध्य भागात डोडोमा येथे ५° से. एवढाच फरक पडतो. दैनिक तपमानकक्षा मोठी असते. किनाऱ्याजवळ कमाल तपमान ३२° से., तर उंच प्रदेशात किमान तपमान २०° से. पर्यंत असते.
उत्तरेकडे पाऊस मार्च ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा दोनदा पडतो, तर दक्षिणेकडे तो एकदाच डिसेंबर ते एप्रिल पडतो. समुद्राच्या आणि सरोवरांच्या काठी मध्यवर्ती पठारांपेक्षा जास्त पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण उंची आणि सन्मुखता यांवर अवलंबून असते. ऊलूगूरू पर्वताच्या वाताभिमुख बाजूवर २५२ सेंमी. तर वातविन्मुख बाजूवर ५८ ते ७८ सेंमी. पाऊस पडतो. अंतर्भागातील पर्जन्यमान ३२ ते ४३ सेंमी. तर किनारी प्रदेशात ६४ ते ११३ सेंमी, असते.
झांझिबार बेटावर सरासरी तपमान २७° सें. व पर्जन्यमान १५० सेंमी. आणि पेंबा बेटावर सरासरी तपमान २६° से. व पर्जन्यमान २०० सेंमी. असते. एप्रिल ते मे मध्ये सर्वांत जास्त आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्वांत कमी पाऊस पडतो. आर्द्रता जास्त असते.
समुद्र किनाऱ्याला खाड्यांच्या काठी दाट खारफुटीकच्छ वनश्री असते. सखल भागात कठीण लाकडाचे आणि डोंगराळ भागात मऊ लाकडाचे वृक्ष आहेत. तथापि मुख्य भूमीवर गवत हीच मुख्य वनस्पती दिसते. गवताळ भागाच्या सु. निम्म्या भागात झाडे आढळतात. तो भाग उद्यानभूमीसारखा दिसतो.
अनेक प्रकारची छोटी अरण्ये ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. डोंगराळ भागात अरण्यरेषेच्या वर पर्वतवेष्टित तृणभूमी आहे. पारे, ऊसांबारा, किलिमांजारो यांच्या वातविन्मुख बाजूंवर निमओसाड प्रदेशीय वनस्पती आहेत.
पाणथळ भागात लव्हाळे व गवत आढळतात. झांझिबारच्या पूर्व भागात झुडुपे आहेत. परंतु इतर भागात व पेंबा बेटावर बहुतेक अरण्ये तुटली असून येथे लागवडी व मळे झाले आहेत.
मुख्य भूमीवर विविध प्रकारचे प्राणी विपुल आहेत.
हत्ती, गेंडा, रेडा, सिंह, बिबळ्या, तरस, रानटी कुत्रा, चित्ता, झेब्रा, जिराफ, अनेक प्रकारचे हरिण, चितळ सांबार असून चिंपांझी अल्प प्रमाणात आहेत, परंतु इतर माकडे पुष्कळ आहेत. नद्या-सरोवरांतून हिप्पो व सुसरी आहेत.
पक्षांच्या सु. दीडहजार जाती, कीटकांच्या हजारो जाती, साप, सरडे अनेक प्रकारचे असून समुद्रात व नद्या-सरोवरांत विविध प्रकारचे मासे सापडतात.
उत्तरेकडील एन्गोराँगोरो ज्वालामुखी विवर व त्याजवळचे सेरँगेटी नॅशनल पार्क तसेच आग्नेय भागातील सेलूस वन्यपशुसंरक्षण विभाग हे सर्व आफ्रिकेत वन्यपशुसंरक्षण आणि दर्शन यांसाठी प्रसिद्ध आहेत.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 12/31/2019
झांझिबार शहर : टांझानियाच्या झांझिबार बेटाचे कारभा...