अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी आरकॅन्सॉ व मिसूरी राज्यांतून वाहणारी एक नदी. लांबी १,११० किमी.; जलवाहन क्षेत्र ७३,००० चौ.किमी. वायव्य आरकॅन्सॉमधील बॉस्टन पर्वतात उगम पावल्यानंतर ही नदी ईशान्येस मिसूरी राज्याकडे वाहत जाते. मिसूरी राज्याच्या दक्षिण भागातच वळण घेऊन ती आग्नेयीकडे वाहू लागून पुन्हा आरकॅन्सॉमध्ये प्रवेश करते. काही अंतर आग्नेय दिशेत वाहत गेल्यानंतर न्यूपोर्टजवळ ती दक्षिणवाहिनी होते. आरकॅन्सॉ-मिसिसिपी नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूस ती मिसिसिपीला मिळते. मुखाजवळचा तिचा एक फाटा आरकॅन्सॉ नदीला मिळालेला आहे.
व्हाइट नदीचा अर्ध्यापेक्षा अधिक प्रवाह उंच प्रदेशातून वाहतो. तेथे विशेषतः बॉस्टन पर्वतात व मिसूरी राज्यातील ओझार्क पठारावर तिने खोल दऱ्या व घळ्यांची निर्मिती केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील तिचा उतार दर किमी.ला ५ मी. आहे. मधल्या टप्प्यात प्रामुख्याने न्यूपोर्टजवळ नदीची दरी १५२ मी.पेक्षा अधिक खोल आहे.
उच्चभूमीच्या प्रदेशानंतर ही नदी मिसिसिपी मैदानात प्रवेश करते. या भागात तिचा उतार दर किमी.ला साधारण अर्धा मीटर आहे. येथे नदीला अनेक नागमोडी वळणे प्राप्त झाली असून तिच्या खोऱ्यात वनाच्छादित व दलदलयुक्त प्रदेश तयार झालेला आहे. व्हाइट नदीचा ४८० किमी. लांबीचा, म्हणजेच बेट्सव्हिलपर्यंतचा प्रवाह जलवाहतुकीस उपयुक्त आहे.
बफालो ही दक्षिणेकडून मिळणारी तर कॅश, लिट्ल रेड व नॉर्थ फोर्क या उत्तरेकडून मिळणाऱ्या व्हाइट नदीच्या प्रमुख उपनद्या होत. पूरनियंत्रण व जलविद्युतशक्ती निर्मितीसाठी नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत.
कॉटरच्या जलाशयाचा विस्तार २८८ चौ.किमी. आहे. त्याची जलविद्युत निर्माण क्षमता ३,४०,००० किवॉ. इतकी आहे. टेबल रॉक (मिसूरी राज्य) धरणाची (१९५९) जलविद्युत निर्माण क्षमता २,००,००० किवॉ. तर बीव्हर (आरकॅन्सॉ राज्य) धरणाची (१९६५) जलविद्युत निर्माण क्षमता १,१२,००० किवॉ. इतकी आहे. मिसूरी राज्यात ब्रॅन्सनच्या ईशान्येस ८ किमी.वर बांधलेल्या फॉरसिथ धरणामुळे टेनीकोमो सरोवर तयार झालेले आहे.
चौधरी, वसंत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/8/2020
आशिया खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक आणि जगातील सर्...
अक्कड : इराकमधील टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्य...
या विभागात नद्या, सरोवर व समुद्र यांची माहिती देण्...
राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात. (अ) उ...