(स्पॅनिश ताहो, पोर्तुगीज तेझू). आयबेरिया द्वीपकल्पातील सर्वांत मोठी नदी. लांबी १,००७ किमी. जलवाहनक्षेत्र ८१,६०० चौ. किमी. ही ७८५ किमी. स्पेनमधून, ४३ किमी. स्पेन-पोर्तुगाल सरहद्दींवरून व १७९ किमी. पोर्तुगालमधून वाहते. पूर्वमध्य स्पेनमधील अलबरॅसिन पर्वतश्रेणीत १,५९० मी. उंचीवर उगम पावून ती ग्वादालाहारा व स्पेनच्या मध्यभागातून पश्चिमेकडे चुनखडकाच्या घळ्यांतून वेगाने वाहते.
त्रील्योजवळ प्रवाह शांत झाल्यावर बोलार्केला पोहोचण्यापूर्वी तिच्यावर दोन धरणे बांधून ‘सी ऑफ कॅस्टील’ हा जलाशय निर्माण केला आहे. टोलीडोजवळच्या आरांगह्वेथ या स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध प्रदेशास पाणी देऊन मग क्वार्टझाईट व शेल खडकांच्या निरुंद घळ्यांतून गेल्यावर प्वेंता दे आल्कांतारा भागात तिच्यावर यूरोपातील सर्वांत मोठा मानवनिर्मित जलाशय आहे. यानंतर सरहद्दीवरून गेल्यावर बेईरा येथे पोर्तुगालमध्ये शिरून ती नैर्ऋत्यकडे वाहते.
अव्हरांटिशच्या सुपीक प्रदेशातून गेल्यावर व्हीला फ्रँका दे सीरा येथे ती अटलांटिकच्या लिस्बन खाडीला मिळते. खाडी प्रथम रुंद व लिस्बनजवळ अरुंद असल्यामुळे लिस्बन सुरक्षित बंदर झाले आहे. टेगस मुखापासून १६० किमी. नौसुलभ आहे. तिच्या खोऱ्यात उंच भागांत सूर्चिपर्णी वृक्ष, पॉप्लर व विलो तसेच निमओसाड भागात ओक आणि बुचाची झाडे आढळतात. ऑलिव्ह व द्राक्षवेली यांनी काही भाग समृद्ध आहे. धान्यही होते.
वनविभागात आयबेक्स, हरिण, शॅमॉय इ. प्राण्यांची व सरोवरात आणि नदीत विविध प्रकारच्या माशांची शिकार चांगली मिळते. खोऱ्यात ६२ धरणे असून जलसिंचन, वनसंवर्धन, जलविद्युत् यांवर भर दिला जातो. १२ लक्ष किवॉ. वीज उत्पादन होते. गाल्यो, झेझिरी हारामा, आलबेर्के, आलगॉन या उपनद्या आहेत.
यार्दी, ह. व्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/7/2020
कोको नदी : मध्य अमेरिकेतील व निकाराग्वा देशातील सर...
झँबीझी : आफ्रिकेतील एक मोठी नदी. लांबी सु. ३,५४० क...
डॅन्यूब : यूरोपातील व्होल्गाच्या खालोखाल दुसऱ्या क...
अफगाणिस्तान : नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश. लोक...