मध्य अमेरिकेतील व निकाराग्वा देशातील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ७४१ किमी. हिला सिगोव्हीया, वँक्स इ. नावेही आहेत. ही कॉर्डिलेरा पर्वतात उगम पावून सामान्यत: ईशान्येस वाहते.
प्रथम खोल दऱ्यांतून, दाट जंगलांतून व द्रुतवाहांवरून येऊन ती सांगसांग येथे विरळ वस्तीच्या मैदानात उतरते आणि काबो ग्रास्यास आद्योस भूशिराजवळ त्रिभुज प्रदेश तयार करून कॅरिबियन समुद्रास मिळते. तेथे प्वेर्तो कावेसास हे महत्त्वाचे बंदर आहे.
हिला हीकारो, पोटेका, एस्टेली, बोकी व वास्पूक या प्रमुख उपनद्या मिळतात. ती सु. ३२० किमी. नौकासुलभ आहे. ती मुख्यत: इमारती लाकडाच्या वाहतुकीस उपयोगी पडत असली, तरी तिच्या परिसरातील कॉफी, कोको, ऊस, तंबाखू, कापूस, कातडी, नारळ इत्यादींचा व्यापारही तिच्या मार्गे चालतो.
कोकोच्या तीरावर ओकोटाल, टेल्पानेका, वास्पान, बोकी ही प्रमुख गावे असून हिच्या वाळूत काही ठिकाणी सोने सापडते. पोटेका संगमानंतरचा कोकोचा प्रवाह निकाराग्वा व हाँडुरस यांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे, असा हाँडुरसचा दावा आहे.
कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/14/2019
डॅन्यूब : यूरोपातील व्होल्गाच्या खालोखाल दुसऱ्या क...
अफगाणिस्तान : नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश. लोक...
टेगस : (स्पॅनिश ताहो, पोर्तुगीज तेझू). आयबेरिया द्...
आयबेरियन द्विपकल्पातील एक मोठी नदी