उत्तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे सरोवर. पृष्ठक्षेत्रफळ २५,६५२ चौ. किमी. अमेरिकतेली पंचमहासरोवरांपैकी हे एक असून मिशिगन, ओहायओ, पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क ही राज्ये व कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत ह्यांनी हे वेढलेले आहे. याची जास्तीत जास्त रुंदी ९२ किमी., लांबी ३८८ किमी. व सरासरी खोली १८ मी. भरत असली, तरी पंचमहासरोवरांत हे उथळ समजले जाते. ईअरीच्या उत्तरेकडील ह्यूरन सरोवरात उगम पावलेली सेंट क्लेअर नदी, सेंट क्लेअर ह्या छोट्या सरोवरात येते आणि ह्या सरोवरातून निघालेली डिट्रॉइट नदी ईअरीला वायव्येस मिळते. तसेच ईअरीच्या ईशान्येकडून नायगारा नदीप्रवाह सुरू होतो, तो आँटॅरिओ सरोवराला मिळतो.
आँटॅरिओमधून सेंट लॉरेन्स नदीमार्गे अटलांटिक महासागरात जाता येते. परंतु हा मार्ग हिवाळ्यात बर्फामुळे बंद असल्याने १८२५ मध्ये ईअरी सरोवराच्या पूर्वेकडून हडसन नदीला मिळणारा कालवा काढला आहे. ईअरी कालवा ५८१ किमी. लांब, १२ मी. रुंद व १.२ मी. खोल असून बर्फमुक्त असल्याने वाहतुकीस उपयुक्त आहे. ईअरी सरोवराला मिशिगन राज्यातून ह्यूरन वे रेझ्न, ओहायओतून मॉमी, पोर्टिज, सँडस्की, कायहोगा व ग्रँड या नद्या आणि न्यूयॉर्कमधून कॅटारॉगस खाडी मिळते. सरोवराच्या पश्चिम भागातच बेटे असून आँटॅरिओ प्रांताचे पीली (१३ किमी. लांब) हे सर्वांत मोठे बेट आहे.
हिमयुगीन घडामोडींत डेव्होनिअन काळात हे सरोवर तयार झालेले असून शैल, चुनखडी व डोलोमाइट ह्यांनी युक्त आहे. सरोवराची किनारपट्टी पुलिनमय सौम्य उताराची असल्याने सरोवराशेजारून दळणवळणाचे मार्ग जातात. ईअरी सरोवराकाठची सँडस्की, टोलीडो, ह्यूरन, लोरेन, क्वीव्हलँड, फेरपोर्ट, अॅश्टाब्यूला, ईअरी, बफालो ही अमेरिकेची व पोर्ट कोलबर्न हे कॅनडाचे बंदर आहे. अमेरिकेच्या लोखंडाच्या व कोळशाच्या खाणी ईअरी सरोवराच्या दक्षिणेस जवळच असल्याने ईअरीचे महत्व वाढले आहे.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/1/2019
डिट्रॉइट : अमेरिकेचे ‘मोटार सिटी’ म्हणून प्रसिद्ध ...
आँटॅरिओ सरोवर : उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवर...
उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत ल...